रझा, सैयद हैदर : (२२ फेब्रुवारी १९२२ – २३ जुलै २०१६). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बाबरिया (जि. मंडला) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव ताहिरा बेगम. वडील सैय्यद मोहम्मद जिल्हा उपवनाधिकारी म्हणून काम करीत होते. रझा यांना शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयात अधिक रस होता. त्यांचे शालेय शिक्षण दमोह येथील शासकीय विद्यालयात झाले. नागपूर येथील कला महाविद्यालय  (१९३९-४३) व मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी आपले कलाशिक्षण पूर्ण केले.त्यानंतर १९५० मध्ये त्यांना कलेतील उच्च शिक्षण घेण्यासाठी फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आणि ते पुढील शिक्षणासाठी पॅरिसला गेले. तेथील इकोल नॅशनेल स्युपेरिअर दे ब्यू आर्ट्स या संस्थेत त्यांनी कलाशिक्षण घेतले (१९५०-५३). कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यागत व्याख्याते म्हणूनही त्यांनी काम केले (१९६२).

१९४६ मध्ये रझा यांचे पहिले एकल चित्रप्रदर्शन (वन मॅन शो) बाँबे आर्ट सोसायटीमध्ये भरले. त्यात त्यांना रजतपदक प्राप्त झाले. १९४७ च्या दरम्यानचा भारतातील स्वातंत्र्यलढ्याच्या तीव्रतेचा काळ त्यांनी अनुभवला होता. याच पार्श्वभूमीवर रझा यांच्यासोबत के. एच. आरा., एफ. एन. सोझा, एम. एफ. हुसेन इत्यादी चित्रकार एकत्र आले आणि त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ या प्रागतिक चित्रकार संघाची स्थापना केली. १९४८ मध्ये या ग्रूपचे पहिले प्रदर्शन भरले. आई-वडिलांच्या निधनानंतर, फाळणीच्या काळात रझाकुटुंबीय पाकिस्तानात गेले, पण रझा मात्र पॅरिसला वास्तव्यास होते. या काळात ते पाश्चात्त्य आधुनिक चित्रशैलीकडून अभिव्यक्तिवादी चित्रशैलीकडे झुकले. १९४१ ते १९५० च्या काळात फिक्या आणि गडद रंगछटांचा, त्यात काळ्या रंगाचा सर्रास वापर करून त्यांनी निसर्गचित्रे काढली. मुख्यतः फ्रान्समधील निसर्गचित्रण त्यांनी केले. जलरंगमाध्यमातील त्यांच्या चित्रांमध्ये फाळणीची दाहकता अधोरेखित झाली आहे. पुढील काळात त्यांनी निसर्गचित्रणाकडून अमूर्त चित्रशैलीकडे आपला चित्रप्रवास सुरू केला.

१९७० नंतर रझा यांनी गूढ आध्यात्मिक परंपरेवर आधारित योग आणि तंत्र हे विषय घेऊन चित्रनिर्मिती केली. तांत्रिक पंथातील आकारांच्या प्रतिमा, अक्षरे, मंडले, प्रतीके, रंगांचे प्रतीकात्मक अर्थ आणि संदर्भ घेत, त्यांची आधुनिक कलाप्रवाहाशी नाळ जोडत त्यांनी जास्पर, जोन्स, फ्रांक स्टेला या उल्लेखनीय चित्रांची निर्मिती केली. परंतु या रूळलेल्या वाटेचा त्यांना लवकरच कंटाळा आला आणि आपल्या चित्रांमध्ये अधिक सखोलता यावी, असे त्यांना वाटू लागले.

ब्लॅक सन, कॅनव्हासवर ॲक्रिलीक रंग (सु. १९९४).

रझा यांनी भारतातील अजिंठा-वेरूळची लेणी, बनारस, गुजरात, राजस्थान अशा ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यातूनच त्यांना बिंदू-उत्क्रांतीची प्रेरणा मिळाली. २००७ मध्ये त्यांनी ‘बिंदू’ हा चित्रनिर्मितीचा  आरंभबिंदू मानला. त्याला केंद्रस्थानी ठेवून रझा यांनी अनेक चित्रांची रचना केली. चौकटीतील काळ्या बिंदूच्या भोवताली रंगछटांच्या विविध लहरी निर्माण करत, सोबत त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा विविध गडद रंगांच्या आकर्षक, तेजस्वी भौमितिक आकारांतील त्यांनी केलेली चित्रनिर्मिती ही त्यांच्या कलाकारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली. या केंद्रबिंदूतूनच रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश आदी माध्यमांद्वारे आंतरिक अनुभवाची प्रभावी अभिव्यक्ती करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या संपूर्ण चित्रात काळा बिंदू हा त्याचे प्रभावशाली अस्तित्व निदर्शनास आणतो. नादबिंदू, जलबिंदू, शांतिबिंदू अशा त्यांच्या चित्रांमधून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भाव प्रत्ययास येतात. सिम्फनी इन व्हाइट  या मालिकेत मात्र त्यांनी काळ्या बिंदूच्या जागी पांढरा करड्या रंगाचा बिंदू निर्माण केला आणि पूर्वीच्या गडद रंगांची जागा मंद, शांत रंगांनी घेतली.

“माझे काम म्हणजे माझा आंतरिक अनुभव आणि निसर्गातील गूढ तत्त्व यांची रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश यांद्वारे साधलेली अभिव्यक्ती होय”, अशा समर्थ शब्दांत स्वतःच्या कलेवर त्यांनी भाष्य केले.

रझा यांना चित्रकलेतील त्यांच्या योगदानाबद्दल अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. त्यांत बाँबे आर्ट सोसायटी-सुवर्णपदक (१९८१); प्रिक्स दे ला क्रितिक पुरस्कार, पॅरिस (१९५६); भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९८१), पद्मभूषण (२००७), पद्मविभूषण (२०१३), ललित कला अकादमी, नवी दिल्ली यांची अधिछात्रवृत्ती, तसेच मध्य प्रदेश सरकारतर्फे ‘कालिदास सन्मान’ (१९८१); ललित कलारत्न पुरस्कार (२००४); डी. लिट्. (ऑनोरिस कॉसा)-इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, खैरगढ (छत्तीसगढ, २०१४) तसेच शिव नाडर विद्यापीठ, ग्रेटर नॉइडा (उत्तर प्रदेश, २०१५); फ्रान्स सरकारतर्फे लिजन ऑफ ऑनर (२०१५) इत्यादी प्रमुख पुरस्कार होत. २०१० मध्ये रझा भारतात परतले आणि दिल्ली येथे स्थायिक झाले. नवचित्रकारांना उत्तेजन देण्यासाठी रझा यांनी भारतात रझा फौंडेशनची स्थापना केली. या फौंडेशनद्वारे नवीन चित्रकारांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. त्यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पॅरिसमध्ये रझा समितीची स्थापना करण्यात आली (२०१६). या समितीद्वारे त्यांच्या चित्रांचे जतन आणि संवर्धन केले जाते.

संदर्भ :

  • बहुळकर, सुहास; घारे, दीपक, संपा., दृश्यकला – चित्रकला, शिल्पकला, उपयोजित  कला, मुंबई, २०१३.

समीक्षक – महेंद्र दामले

प्रतिक्रिया व्यक्त करा