कर्तव्यवादी नीतिशास्त्राची अभिजात स्वरूपाची मांडणी इमॅन्युएल कांट (१७२४−१८०४) या जर्मन तत्त्वचिंतकाने केली आहे. नीतिशास्त्रात कितीही नवीन नवीन मते आली, तरी त्यांतील कोणत्याही मताला कांटने सांगितलेल्या नैतिक उपपत्तींची उपेक्षा करून चालणार नाही. त्याच्या ‘निरपेक्ष आदेश’ या नैतिक सिद्धांताची मांडणी पुढीलप्रमाणे करता येईल : जिला विनाअट, निःसंदेहपणे, निरूपाधिकपणे सत् अथवा चांगले म्हणत येईल, अशी सत्संकल्पना ही एकच गोष्ट जगात आहे. बुद्धिमत्ता, शक्ती, संपत्ती, कीर्ती, रूप, यौवन अशा इतर गोष्टींनाही चांगले म्हणता येईल; पण त्यांचा चांगूलपणा सोपाधिक असतो, त्याला ‘जर-तर’ची मुरड असते. बुद्धिमत्ता चांगली खरी; पण तिचा चांगला उपयोग केला तर. शक्ती चांगली; पण दुर्बळांना छळण्यासाठी ती वापरली नाही तर. पण सत्संकल्पाचा चांगुलपणा अशा प्रकारच्या कोणत्याही उपाधीवर अवलंबून नसतो. सत्संकल्प हा एखाद्या रूपतारुण्यवती स्त्रीच्या ठिकाणी आढळला अथवा जराजर्जर हिडिंबेच्या ठिकाणी प्रतीत झाला, तरी स्वयंप्रकाश रत्नाच्या तेजाप्रमाणे त्याचा चांगुलपणा अविचल राहतो.
सत्संकल्प म्हणजे केवळ चांगली इच्छा नव्हे, इच्छा निराळी, संकल्प निराळा. संकल्प हा सत् कशामुळे ठरतो ? सत्संकल्पाची नियामक गोष्ट कोणती ? संकल्पात जे उद्दिष्ट अंतर्भूत असते (सुखनिर्मिती) त्याच्या स्वरूपामुळे संकल्पाचे सद्सदत्व ठरत नाही, तर त्याच्या पाठीमागे असलेल्या प्रेरणेच्या स्वरूपामुळे संकल्प सत् ठरतो. ही प्रेरणा अनुकंपा, करुणा अशांसारख्या नैसर्गिक प्रवृत्तींची असेल, तर तिच्यातून निघणाऱ्या संकल्पाला नैतिक मूल्य नाही. ‘कर्तव्यासाठी कर्तव्य’ या एकाच भावनेतून जो संकल्प प्रेरित होतो, तोच सत्संकल्प होय. कर्तव्य हे करावयाचेच. ते कशासाठी करावयाचे या प्रश्नास उत्तर नाही; कारण ‘अमक्यासाठी करावयाचे’ असे म्हटल्यास ज्याच्यासाठी ते करावयाचे ती गोष्ट कर्तव्याची उपाधी ठरेल. पण कर्तव्यप्रेरणेतून मिळणारा आदेश निरपेक्ष असतो. निरपेक्ष आदेशाच्या सिद्धांताने कर्तव्याची ही निष्कामता अथवा फलनिरपेक्षता सांगितली जाते.
कर्तव्य हे कर्तव्यपूर्तीसाठी करावयाचे असे म्हटले, तरी अमुक अमुक कृती ही कर्तव्य होय हे ठरवावयाचे कसे हा प्रश्न राहतोच. त्यासाठी कांटला नैतिक आचरणाचे परमतत्त्व शोधून काढावयाचे होते. त्या कृतीच्या परिणामावरून ते ठरणार नाही; कारण तसे झाल्यास नीतीच्या निरपेक्षतेस बाध येईल. म्हणून एखाद्या कृतीची कर्तव्यता त्या कृतीत अंतर्भूत असलेल्या तत्त्वावरून ठरते, असे कांटने म्हटले आहे. त्या तत्त्वाचे पालन करण्यासाठी त्याने खालील नियम सांगितला आहे :
१) ‘केव्हाही झाले तरी अशीच कृती करीत जा की, तिच्यामागील तत्त्व हे सार्वत्रिक नियम व्हावा अशी इच्छा तू करू शकशील.’ कृतीसंबंधीच्या या नियमास ‘निरूपाधिक आदेश’ असे नाव आहे. त्याला ‘नीतीचे परमतत्त्व’ असेही म्हणता येईल; कारण त्या आदेशात कृतीचा अमूक एक नियम सांगितला आहे असे म्हणण्यापेक्षा, तो नियम ठरवावा कसा याचे तत्त्व सांगितले आहे.
समजा, वचन पाळण्याचा प्रश्न उपस्थित झाला, तर निरपेक्ष आदेशाच्या तत्त्वाप्रमाणे वचन पाळावे असे निघेल; कारण वचन पाळण्याचे तत्त्वच सार्वत्रिक होऊ शकेल. दिलेले वचन मोडावे असा नियम करू गेल्यास वचने दिली व घेतली जाणार नाहीत. त्यामुळे ती मोडताही येणार नाहीत. अर्थात, वचन मोडण्याच्या तत्त्वास सार्वत्रिकता येणार नाही, म्हणून वर सांगितलेल्या निरपेक्ष आदेशाच्या तत्त्वानुसार वचन पाळावे हे कर्तव्य होय असे ठरते. याच पद्धतीने नीतीच्या या परमतत्त्वापासून आपणास इतर विशिष्ट कर्तव्यांचा बोध होऊ शकेल.
दुसऱ्याने आपल्याशी जसे वागावे अशी तुझी इच्छा असते, तसे तू दुसऱ्याशी वर्तन ठेव अशी धर्माज्ञा आहे. तिला सुवर्णनियम म्हणतात. तिचा अर्थ कांटच्या आदेशाशी मिळताजुळता आहे. महाभारतात म्हटले आहे की, ‘जे आपणास प्रतिकूल असते, ते दुसऱ्याच्या बाबतीत योजू नये. थोडक्यात, हाच धर्म होय; धर्माहून अन्य जे आचरण ते स्वैर होय’ (‘अनुशासनपर्व’ ११३.८).
२) ‘अशा रीतीने कृती कर की, तुझ्या कृतीमागील तत्त्व जणू तुझ्या संकल्पामुळे एक निसर्गनियम होणार आहेत’. कर्तव्यासाठी कर्तव्य या भावनेतून प्रेरित होऊन वर दिलेल्या रीतीने ठरणारे कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प म्हणजे सत्संकल्प होय. ज्या वस्तूगत तत्त्वाने संकल्प नियत होतो, त्याला नियम म्हणता येईल. मनुष्य केवळ विवेकशील एवढाच असता, तर त्याचे संकल्प या वस्तूगत नियमाला अनुसरून झाले असते; पण माणसात विवेकाबरोबर विकाराचा अंशही आहे. त्यामुळे तो वस्तूगत नियम ‘आदेश’ म्हणून बुद्धीला प्रतीत होतो. विशिष्ट उद्देश साधण्याची अपेक्षा त्या आदेशाच्या बुडाशी असेल, तर तो सोपाधिक आदेश होय; जसे आरोग्य पाहिजे असेल, तर नेहमी व्यायाम करत जा. नीतीच्या आदेशात बंधकत्व असते; कारण तो कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नसतो. आदेशाच्या या दुसऱ्या प्रकारास कांट निश्चितार्थक आदेश असे नाव देतो. या ठिकाणी उद्दिष्ट असते; पण त्याच्या बाबतीत ‘जर ते असेल, तर …., असे म्हणावे लागत नाही. सुख हे उद्दिष्ट होय. तेव्हा सुख मिळवावेस हा आदेश निश्चितार्थक आहे. निरूपाधिक आदेश मात्र कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नसतो. कृतीत अनुस्यूत असलेल्या तत्त्वासाठीच ती करावी, असा तो आदेश असतो. ते तत्त्व म्हणजे नियमाच्या नियमपणाचे अथवा सार्वत्रिकतेचे तत्त्व होय.
आक्षेप : कांटच्या प्रथम सांगितलेल्या दोन निरपेक्ष आदेश तत्त्वांवर पुढील आक्षेप घेतले जातात : १) अ) कांटने सांगितलेला नीतीचा नियम एक निशेधात्मक निकष म्हणून आचरणास लावता येईल. जे आचरण आत्मविसंगत असेल, ते करू नये असा त्याचा अर्थ होईल. असा अर्थ केल्यास त्याचा उपयोग फारच मर्यादित होईल. ब) ते तत्त्व पराकाष्ठेचे आकारिक आहे. नैतिक जीवनाचा आशय काय असावा, यासंबंधी या आदेशात मुग्धता स्वीकारली आहे. नैतिक वर्तन हे नियमानुसार असावे, म्हणजे ते सुसंगत असावे, असा आदेश आहे. ठीक आहे; पण ते नियम कशाशी सुसंगत असावेत? केवळ एकमेकांशी? ‘होय’ असे म्हटल्यास विशिष्ट प्रसंगी मी कसे वागावे?, कोणता नियम पाळावा? यासंबंधीचे मार्गदर्शन त्या नियमातून मिळत नाही. म्हणून ते निव्वळ आकारिक होत; त्यामुळे त्यांचा उपयोग झालाच तर तो निषेधक रीतीने होईल. जी गोष्ट स्वतःशी विसंगत आहे, जी गोष्ट सार्वत्रिक करता येणार नाही, ती आचरू नये एवढेच कळेल; पण अमुक अमुक गोष्टी आचरणात आणाव्यात, असे भावरूप मार्गदर्शन त्यातून मिळणार नाही.
या आक्षेपास दोन तऱ्हेने उत्तर देता येईल. अ) विशिष्टप्रसंगी कोणती कृती योग्य आणि कोणती अयोग्य हे सांगण्यासाठी कांट प्रवृत्त झाला नव्हता. नैतिक कृतीमागील सामान्य तत्त्व म्हणजे तिचा आकार सांगावा, हेच त्याचे उद्दिष्ट होते. तर्कशास्त्राकडून विशिष्ट प्रसंगी वापरण्यास उपयोगी पडणारे युक्तिवाद मिळणार नाहीत, केवळ युक्त विचाराची सामान्य तत्त्वेच मिळतील, हे उत्तर सी. डी. ब्रॉडचे आहे. आ) मनुष्य हा वासनाविरहित प्राणी आहे, असे कांट समजून राहीला नव्हता. आपल्या वर्तनाचा आशय आणि ओघ वासनांनी ठरतो; पण त्याला आकार मिळतो व त्याचे उदात्तीकरण होते ते नीतितत्त्वाकडून, असे सांगण्याचा कांटचा रोख होता.
२) कांटचे नीतितत्त्व अकारण कठोर आहे, असा दुसरा आक्षेप आहे. ती कठोरता दोन प्रकारची आहे. अ) नैतिक नियमाला अपवाद करणे कांटला मान्य नाही; पण नियम माणसासाठी असतो, हे जाणून व्यवहारात आपण अनेक नियमांना मुरड घालतो. तसे न करणे कठोरपणाचे होईल. या आक्षेपावर असे उत्तर देता येईल की, कांटचे परमनीतितत्त्व कोणताही अनुल्लंघनीय नियम घालून देत नाही. ‘माझ्या विशिष्ट परिस्थितीत दुसरी एखादी व्यक्ती असती, तर तिने जसे वागावे अशी मी इच्छा करीन तसे मी वागावे’ असे सांगण्याने कोणताही सामान्य नियम प्रतिपादला जात नाही. नैतिक दृष्टीकोन हा विश्वतोमुख अथवा अहंकारविरहित असावा, एवढेच सांगितले आहे. त्यामुळे आंधळ्याला नियमपालनाचा दोष येत नाही. आ) मैत्री, अपत्यप्रेम अशांसारख्या भावनांतून एखाद्या कृतीस प्रेरणा मिळाली, तर तिला कांट नैतिक मूल्य देत नाही. अशा रीतीने भावनांची कदर न करण्याने नीतीला अकारण उग्रता येते. या आक्षेपावर कांटच्या बाजूने उत्तर देता येईल की, करुण, कोमल भावनांचे अस्तित्व नीतिविरोधी मानले नाही. मात्र विशुद्ध कर्तव्यभावनेचे सह-अस्तित्व नसेल, तर इतर भावनांचा अतिरेकही होऊ शकतो. म्हणून कृतीस नैतिक मूल्य प्राप्त होण्यासाठी कर्तव्यप्रेरणेची आवश्यकता आहे. शिवाय, कर्तव्यप्रेरणेविषयी आदर ही एक मनोरम भावना आहेच.
कांटने सांगितलेल्या निरूपाधिक आदेशाच्या तत्त्वाचा आपण काय अर्थ घेतो, यावर ते अवलंबून राहील. एक अर्थ असा होईल की, जी कृती करावी असे मला वाटते, त्या सामान्य प्रकारची कृती दुसऱ्या कोणीही अशी इच्छा मी करू शकलो, तर माझी कृती युक्त होय आणि मी अशी इच्छा करू शकत नसेन, तर माझी कृती युक्त नाही. असा व्यापक अर्थ घेतल्यास नियमास अपवाद सहन होणार नाही. म्हणून एखाद्या विशिष्ट प्रसंगी, ‘खोटे बोलू नये’ या नियमास अपवाद करून जर मी खोटे बोललो, तर कांटच्या सूत्राप्रमाणे माझी कृती अनैतिक ठरलीच पाहिजे, असे होईल; पण कृतीचे सामान्यीकरण निरनिराळ्या पातळ्यांवर होते हे लक्षात घेतले, तर त्या कृतीचे सामान्यीकरण केल्यास जो नीतीचा नियम मिळेल त्याला अपवाद करण्याची गरज नैतिक जीवनात भासणार नाही. म्हणून कांटच्या नीतिमीमांसेत अपवादास स्थान नाही, असा आक्षेप उरणार नाही.
निरपेक्ष आदेशाच्या या मांडणीशिवाय आणखी दोन रीतीने कांटने ते तत्त्व सांगितले आहे.
३) ‘मनुष्यव्यक्तीला, मग ती स्वतः असो वा इतर कोणीही असो, केवळ साधन म्हणून न वागवता ती एक साध्यमूल्य आहे या दृष्टीने तुझे वर्तन असू देत’. प्रथम सांगितलेल्या निरपेक्ष आदेशाहून हा आदेश भिन्न आहे; पण कांटच्या म्हणण्याप्रमाणे त्या पहिल्या आदेशाची ही केवळ फेरमांडणी आहे. त्या दोहोंचा संबंध लावावयाचा झाला, तर असा लावता येईल की, माझी स्वतःची कृती आणि इतरांची कृती यांकडे सहसा मी भिन्न दृष्टीने पाहतो. याचाच अर्थ असा की, दुसऱ्या व्यक्तीकडे आपण साधन या दृष्टीने पाहतो. महत्त्व जे काही आहे ते आपल्याला. मी जितका आणि ज्या कारणाकरता महत्त्वाचा आहे, तितकीच दुसरी व्यक्तीही महत्त्वाची आहे आणि त्याच कारणाकरता महत्त्वाची आहे, हे कारण म्हणजे ती दुसरी व्यक्तीही साध्यमूल्य आहे. मानवी व्यक्ती निरपेक्षपणे अंतिम मूल्य असल्याने तिला केवळ साधन म्हणून वापरू नकोस हा आदेश निरपेक्षच ठरतो, असे समर्थन तो करतो.
४) ‘साध्यमूल्यांच्या एका सुव्यवस्थित जगाचा स्वतःला एक घटक समजून तू वागवत जा’. स्वतंत्र नीतितत्त्व म्हणून यास मान्यता देणे शक्य आहे; पण कांटने प्रथम सांगितलेल्या निरपेक्ष आदेशाच्या तत्त्वाशी याचा संबंध कसा लावावयाचा? एक पद्धत अशी शक्य आहे की, परिपूर्ण नैतिक जगात संघर्ष असता कामा नये. एका व्यक्तीची उद्दिष्टे आणि दुसऱ्या व्यक्तीची उद्दिष्टे यांच्यात विरोध येता कामा नये. साध्यमूल्यांचे सुव्यवस्थित जग याच्यातून हा अर्थ निघतो. जगात मी एकटाच नाही. आणखी अनेक व्यक्ती आहेत; म्हणून माझ्या आचरणाची रीत अशी व्हावी की, त्यांनाही ती मान्य व्हावी. असे न झाल्यास संघर्ष अटळ आहे.
कर्तव्यतेचा निरपेक्ष आदेश समर्थनीय ठरविण्यासाठी १) आत्मस्वातंत्र्य, २) ईश्वराचे अस्तित्व आणि ३) आत्म्याचे अमरत्व या तीन गोष्टी गृहीत धरल्या पाहिजेत, असे कांट म्हणतो : १) आत्मस्वातंत्र्य : जर कर्तृत्व हे निरपेक्षपणे बंधनकारक आहे, तर कोणत्याही परिस्थितीत मला ते करता येणे शक्य असले पाहिजे, याचेच नाव आत्मस्वातंत्र्य होय. २) ईश्वराचे अस्तित्व : सुखाची आशा ही कर्तव्याची प्रेरणा नव्हे; पण नीतिमान व्यक्ती असुखीच राहील, तर विश्वमांगल्यात उणेपणा आल्यासारखे होईल. पण नीती आणि सुख यांच्यात पुरे साहचर्य या जगात दिसत नाही. इतरत्र ते घडवून आणण्यासाठी ईश्वरास्तित्व मानणे अगत्याचे आहे. ३) आत्म्याचे अमरत्व : नीती ही पूर्णतेसाठी चाललेली धडपड होय; पण आपले जीवस्वरूप लक्षात घेता केवढ्याही दीर्घ अवधीत पूर्णता प्राप्त होणे अशक्य आहे. म्हणून जीवाचे अनंतकालपर्यंत अस्तित्व मानणे नीतीस आवश्यक आहे.
गीतेशी संबंध : कांटच्या मते शुद्ध बुद्धीच नीतिनिर्णयाचा निकष ठरवते. या शुद्ध बुद्धीनुसार वागण्याची ज्याला सवय पडलेली असते, त्याच्या दृष्टीने भावनेचे ध्येय ते प्रेयस ते अर्थशून्य ठरत असल्यामुळे त्याच्या आंतरिक जीवनातील संघर्ष नष्ट होतो. आता त्याची शुभ संकल्पशक्ती म्हणून न राहता तिची परिणती पवित्र संकल्पशक्तीमध्ये होते. आता त्याला त्या बुद्धीने दिलेल्या निरपेक्ष आदेशाच्या पालनाशिवाय अन्य अस्तित्वच नसते. तो नियमरूप आलेला असतो. गीतेतसुद्धा ज्याने वासनेचा त्याग केलेला आहे, इंद्रिय विषयांपासून आवरून घेतलेली आहेत. ज्यांची प्रज्ञा ज्ञानयुक्त झालेली आहे, स्थिरत्व पावलेली आहे, आत्मरत झालेली आहे, अशा पुरूषाला आदर्शवत मानून त्याला ‘स्थितप्रज्ञ’ म्हणून संबोधले आहे. कांटची ही विचारसाणी शुद्ध स्वरूपाची आहे. त्याच्या या विचारसरणीनुसार कर्माची नैतिकता कर्माच्या बाह्य परिणामात साठविलेली नसते, तर आत्माच स्वतः ज्यातून अभिव्यक्त होतो असा संकल्पात साठविलेला असते, संकल्पशक्तियुक्त अशा शुद्ध बुद्धीत साठविलेली असते. गीतासुद्धा कर्माची नैतिकता कर्माच्या बाह्य फलावरून निश्चित न करता कर्त्र्याच्या बुद्धीवरून ठरवते. बाह्य फलाची कामना मनात न ठेवता म्हणजे निष्काम बुद्धीने केलेले कर्म श्रेष्ठ होय, तेच निष्काम कर्म होय. म्हणून कांटचे कर्तव्यशास्त्र व गीतेचा कर्मयोग ही दोन्ही सारखीच बुद्धिवादी वाटतात.
https://www.youtube.com/watch?v=eWvtqZ2HODY
संदर्भ :
- Kant, Immanuel; Gregor, Mary, Trans. Groundwork of the Metaphysics of Morals, Cambridge, 1997.
- Kant, Immanuel; Paton, H. J. Trans. The Moral Law or Kant’s Groundwork of the Metaphysics of Morals, New York, 1950.
- Sedgwick, Sally S. ‘Hegel’s Critique of Kant’s Empiricism and the Categorical Imperative’, Zeitschrift für philosophische Forschung, 1996.
- Wood, Allen W. ‘The Emptiness of the Moral Will’ The Monist, 1989.
- कृष्णकृपामूर्ती, भगवद्गीता, मुंबई, २०१६.
- चौधरी, पांडूरंग, नीतिमीमांसा, नागपूर, १९९८.
- जोशी, ग. ना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, खंड २, पुणे, १९७५.
- टिळक, बाळ गंगाधर, श्रीमद्भगवद्गीतारहस्य, कोल्हापूर, २०१३.
- दीक्षित, श्रीनिवास हरि, नीतिमीमांसा, कोल्हापूर, २००२.
- रेगे, मे. पुं. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास, पुणे, १९७४.
- वाडेकर, दे. द. संपा. मराठी तत्त्वज्ञान महाकोश, खंड १ ते ३, पुणे, १९७४.
- https://www.utm.edu/staff/jfieser/class/300/categorical.htm
- https://plato.stanford.edu/entries/kant-moral/
- http://myweb.ecu.edu/mccartyr/GW/CategoricalImperative.asp
समीक्षक : वत्सला पै