प्रसिद्ध ब्रिटिश तत्त्वज्ञ थॉमस हॉब्स यांच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी लेव्हायथन  हा एक ग्रंथ. १६४२ ते १६५१ दरम्यान यादवी युद्ध अनुभवलेल्या हॉब्स यांनी चार भागांत लिहिलेला हा ग्रंथ १६५१ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथात त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानाचे व्यापक विवेचन केले असून त्यांनी या ग्रंथास एका प्रचंड जलचर प्राण्याचे नाव दिले आहे. दुःसह्य रानटी अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसांत करार केला आणि त्यातून सार्वभौम सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाजिक कराराचे विवेचन या ग्रंथात त्यांनी केले आहे.

समस्त मानवतेला बांधून ठेवणारी शक्ती जर नसली, तर उद्योग टिकत नाही, संस्कृतीचा ऱ्हास होतो, इमले, इमारती राहात नाहीत, ज्ञान लोपते, काळाचे भान हरपते, कलेचा मागमूस नसतो, लेखनकला, पत्रव्यवहार ठप्प होतो, समाज नसतो, धास्ती असते, मृत्यूच्या घाल्याची भीती असते. मानवी आयुष्य असे एकांडे, दळभद्री, खुजे, पाशवी व हीन असते, असे हॉब्स यांचे म्हणणे आहे व निसर्गतः माणूस हा स्वार्थी, आपलपोटी असतो, हे त्यांचे मतही प्रसिद्ध आहे. असा दृष्टिकोण वरकरणी निराशावादी वाटतो; पण हॉब्स माणसाचे आशादायी चित्रही रेखाटतात.

हॉब्स यांनी रेखाटलेला माणूस समाजापासून सुटा, स्वार्थी, आत्मकेंद्री, सुखलोलुप व सत्तालोलुप आहे. त्याचा इतरांशी सतत संघर्ष होत राहतो. तो स्वतः कायमच स्थैर्याच्या शोधात असतो. परस्परविश्वास, साहचर्य यांचा नामोनिशाणा स्वभावतः नसतो. अशा वेळी सर्वांना बांधून ठेवणारी जी शक्ती कार्यरत असते, ती शक्ती म्हणजे राज्यशक्ती होय. त्या शक्तीचे नाव म्हणजे ‘लेव्हायथन’. सरकारदरबारी ही शक्ती आढळते, असे हॉब्स यांचे मत आहे.

त्यांच्या मते मनुष्य जात्याच स्वतःपुरते पाहतो; पण सर्वांचा विचार करून समाजाभिमुख होत जातो. तो स्वतःपुरते का पाहतो, तर त्यामुळे, त्याला समाजासोबत राहिल्यामुळे, जी किंमत मोजावी लागते, ती चुकवावी लागत नाही; पण अंतिमतः असे एकट्याने राहाणे लाभदायी नसते. इतरांवर कुरघोडी करून संधिसाधू वृत्तीने स्वतःचे उखळ पांढरे करून घेतल्याने कोणाचेच भले होत नाही; कारण प्रत्येक जण फक्त स्वतःपुरता विचार करतो. ना इतरांवर विश्वास असतो, ना कुठले करार-मदार, परस्परसंमती, सहमती. अशा वेळी सहकार्य, शांती, सलोखा प्रस्थापित करण्यासाठी स्वार्थ सोडून इतरांच्या सुरात सूर मिसळावा लागतो आणि सर्वांनी एकजुटीने सार्वभौम सत्तेपुढे झुकावे लागते; आज्ञापालन करावे लागते. सर्वांची मिळून असणारी सामूहिक शक्ती राजसत्तेस प्रमाण मानते व संघटित होते. ही सार्वभौम सत्ता म्हणजे ‘लेव्हायथन’. व्यक्ती व समाज (किंवा व्यष्टी व समष्टी) परस्परविरुद्ध असू नयेत म्हणून जणू सामाजिक करार केला जातो, त्याचे विवरण रूसोने १७६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या द सोशल कॉन्ट्रॅक्ट  या ग्रंथात केले आहे. हॉब्स यांच्या मते राजसत्तेच्या नियंत्रणामुळे माणसाच्या पाशवी वृत्तीचे दमण शक्य होते; तर रूसोच्या मते माणसातील पाशवी वृत्ती हाही सामाजिक परिपाक असतो. त्यावर उतारा म्हणून ‘सामाजिक करार’ अंमलात आणणे म्हणजे पुन्हा समाजाकडे वळणे होय. ख्रिस्ती धर्मासंबंधीची हॉब्सची मते विवाद्य आहेत. त्याच्या विचारांचे विविध आयाम उलगडून दाखविणारे हॉब्स स्टडीज  हे नियतकालिक सुरू आहे.

संदर्भ :

  • Byron, M. Submission and Subjection in Leviathan : Good Subjects in the Hobbbesian Commonwealth, New York, 2015.
  • Curley, E. Ed. Leviathan : With Selected Variants from the Latin Edition of 1668, Indianapolis, 1994.
  • Gauthier, D. The Logic of Leviathan : The Moral and political Theory of Thomas Hobbes, Oxford, 1969.
  • Hirschmann, N.; Wright, J. Eds. Feminist Interpretations of Thomas Hobbes, Pennsylvania, 2012.
  • Lloyd, S. A. Ed. Hobbes Today : Insights for the 21st Century, Cambridge, 2012.
  • Macpherson, C. B. Ed. Leviathan, Harmondsworth, 1968.
  • Rogers, G. A. J. Ed. Leviathan : Contemporary Responses to the Political Theory of Thomas Hobbes, Bristol, 1995.
  • Springboard, P. Ed. The Cambridge Companion to Hobbes’s Leviathan, Cambridge, 2007.

                                                                                                                                                                        समीक्षक : हर्षा बाडकर