वेदविषयक कौत्साचे मत : वेदांचा अर्थ लावण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत असे निरुक्त  या ग्रंथात सांगणाऱ्या यास्काने कौत्स नावाच्या आचार्याचे याच्या उलट असलेले मतही सांगितले आहे. कौत्साचे मत असे आहे की वेदांना मुळातच काही अर्थ नाही, वेद अनर्थक आहेत (अनर्थका हि मन्त्रा:), व त्यामुळे अर्थ लावण्यासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ आहेत. कौत्साने स्वत:च्या मताच्या समर्थनासाठी दिलेली कारणे विचारात घेण्यासारखी आहेत. कौत्स म्हणतो की रोजच्या संस्कृत भाषेतल्या शब्दांचा क्रम ठरलेला नसतो, तो बदलला जाऊ शकतो ; पण वेदातील वाक्ये ही बदलता येत नाहीत. वेदातल्या मंत्रांना अर्थ असता तर त्यांचा अर्थ पुन्हा सांगण्याचा प्रयत्न ब्राह्मण ग्रंथांनी केलाच नसता. वेदातले कित्येक मंत्र अनुभवाच्या विरुद्ध अर्थाचे वाटतात आणि कित्येक मंत्र परस्पर विरोधी अर्थाचे आहेत. अशा परिस्थितीत मंत्रांना अर्थच नसतो असे मानणे हेच अधिक सोयीचे आहे. निरुक्ताने जरी कौत्साच्या मताला खंबीरपणे विरोध केला असला, तरी पुढच्या काळात वेदमंत्रांची फल देण्याची शक्ती त्यांच्या अचूक उच्चारणात आहे असे मत काही परंपरांत दिसून येते. व्याकरणमहाभाष्यात पतंजलीने आणि मीमांसासूत्रात जैमिनीने यास्काची बाजू उचलून धरली आहे, आणि त्यामुळे पुढच्या परंपरेत कौत्साचे अनुयायी फारसे दिसत नाहीत. या सर्व चर्चेतून इतका तरी निष्कर्ष अवश्य निघतो की काळाच्या ओघात वेदांचा अर्थ लावण्याचे काम अधिकाधिक कठीण होत गेले आहे.

संदर्भ :

  • Deshpande, Madhav M., Sanskrit & Prakrit Sociolinguistic Issues, Motilal Banarsidass, Delhi, 1993.