वेदांच्या अपौरुषेयत्वाविषयीच्या कल्पना : ऋग्वेदात सुरुवातीला सूक्ते ही ऋषींच्या वेगवेगळ्या पिढ्यांनी रचलेल्या रचना आहेत, ऋषींनी चाळणीतून धान्य निवडून घ्यावे तसे शब्द निवडून घेतले आहेत आणि ऋषी हे या रचनांचे ‘कारु’ किंवा कर्ते आहेत अशा कल्पना दिसतात. हळूहळू मंत्रांच्या व वाणीच्या दिव्य शक्तीवरील श्रद्धेवरून वैदिक रचनांचा प्रवास ऋषिकर्तृकत्वाकडून अपौरुषेयतेकडे होत गेलेला दिसतो. ऋग्वेदातल्या प्रसिद्ध पुरुषसूक्तात (१०.९०.९) अतिप्राचीन काळी देवांनी केलेल्या यज्ञातून ऋचा, यजुस् आणि सामन् यांची उत्पत्ती झाली असे सांगितले आहे. ही प्रवृत्ती पुढील वाङ्मयात वाढत गेलेली दिसते व यातूनच पुढील काळात वेद हे मनुष्यकर्तृक नसून ते ईश्वरकर्तृक किंवा पूर्णत: अनादी आणि अपौरुषेय आहेत अशा कल्पना प्रचलित झाल्या. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश हे पुन्हा पुन्हा चक्रगतीने होतच असतात आणि ईश्वर व वेद हे अनादी अनंत आहेत असे मत सार्वत्रिक होत गेलेले दिसते. वेदांच्या अनंततेच्या कल्पनेत केवळ कालिक अनंतता नसून मूळ वेदांचा विस्तार अनंत आहे व सध्या उपलब्ध असलेले वेदग्रंथ हे या अनंत वेदाचा काळाच्या ओघात शिल्लक राहिलेला एक अल्प भाग आहे ही कल्पनाही अंतर्भूत आहे. वेदांना इतिहास नाही आणि ते इतिहासाच्या पलीकडे असलेले असे स्वायत्त ग्रंथ आहेत अशी ही धार्मिक कल्पना आहे.

या कल्पनांची उत्क्रांती ब्राह्मणग्रंथांत होताना आणखी काही कल्पना पुढे आलेल्या दिसतात. यज्ञयाग करताना त्या यज्ञीय क्रियांच्या सोबत जे मंत्र म्हणायचे त्यांचा त्या यज्ञीय क्रियांशी काय संबंध आहे हे सांगताना रूपसमृ्द्धीची कल्पना पुढे येते. “कर्म क्रियमाणं ऋगभिवदति” म्हणजे केले जाणारे यज्ञीय कर्म आणि म्हटली जाणारी ऋचा यांमध्ये एक प्रकारचा सुसंवाद जर असेल तर त्यामुळे यज्ञीय कर्माच्या स्वरूपाची समृद्धी अथवा अभिवृद्धी होते. हे घडण्यासाठी मंत्रांचा अर्थ आणि केले जाणारे यज्ञकर्म या दोहोंचा काहीतरी अविभाज्य संबंध आहे, आणि त्यासाठी मंत्राचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे ही जाणीव व्यक्त होते. मंत्रांना जर अर्थच नसेल तर ही गरजच राहाणार नाही. मंत्रांतील शब्दांचा अर्थ उकलून पाहाण्यासाठी त्या शब्दांची निरुक्ती किंवा व्युत्पत्ती सांगण्याची पद्धत ब्राह्मण ग्रंथांपासून सुरू झालेली दिसते. मंत्रांचा अर्थ समजून घेण्याची जशी गरज जाणवलेली दिसते, तसेच त्या मंत्रांचे उच्चारण बिनचूक झाले पाहिजे, नाही तर मनातली इच्छा एक आणि देवतेकडे मागितले भलतेच असे होईल अशी भीती काही ब्राह्मणग्रंथांत दाखवली आहे. अशी एक कथा त्वष्टा या असुराने केलेल्या यज्ञाची आहे. आपल्याला मुलगा होवो आणि हा मुलगा इंद्राचा वध करो अशी कामना त्वष्टा यज्ञ करीत असताना मागत होता. मुलगा “इंद्रशत्रु” होवो असे म्हणताना त्याने या शब्दाचा चुकीचा स्वरोच्चार केला. हा शब्द जर अन्तोदात्त उच्चारला तर तो तत्पुरुष समास होतो आणि त्याचा अर्थ इंद्राचा शत्रू म्हणजे इंद्राला मारणारा असा होतो. परंतु हा शब्द जर आद्युदात्त उच्चारला तर तो बहुव्रीहि समास होतो आणि त्याचा अर्थ ज्याला इंद्र मारतो तो असा होतो. त्वष्टा हा स्वरोच्चारात चुकला आणि त्याने मागणी करताना बहुव्रीहि समासाचे स्वर उच्चारले. त्यामुळे त्याच्या मुलाने इंद्राचा वध न करता इंद्रानेच त्याच्या मुलाचा वध केला. अशी चूक होऊ नये म्हणून मंत्रांचे व मंत्रातील स्वरांचे उच्चारण बिनचूक झाले पाहिजे अशी अपेक्षा ब्राह्मणग्रंथांनी व्यक्त केली आहे. मंत्रांचा अर्थ कसा लावायचा व मंत्रांचे बिनचूक उच्चारण कसे करायचे या गरजेतून व्युत्पत्तीचे किंवा निरुक्तीचे शास्त्र, व्याकरणाचे शास्त्र, मंत्रांची वृत्तबद्धता समजण्यासाठी छन्द:शास्त्र आणि ध्वनींच्या बिनचूक उच्चारणासाठी शिक्षा व प्रातिशाख्ये ही अशाप्रकारची भाषाविज्ञानाची अनेक शास्त्रे प्राचीन भारतात निर्माण झाली.

भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे अनेक मार्ग या काळात उपलब्ध ज्ञालेले दिसतात. यज्ञकर्मातील विषय व आध्यात्मिक किंवा तत्त्वज्ञानातले विषय यांबद्दल चर्चा किंवा वादविवाद करणाऱ्या सभांचा उल्लेख ब्रह्मोद्य या नावाने ब्राह्मण-आरण्यक-उपनिषद् ग्रंथांत दिसून येतो. याज्ञवल्क्य आणि त्याचे प्रतिस्पर्धी यांच्यातले बृहदारण्यक उपनिषदातले वादविवाद फार प्रसिद्ध आहेत. उपनिषदांमध्ये ब्रह्मन् या शब्दाचा अर्थ मंत्र ह्या मूळ अर्थापासून बदलत जगाच्या निर्मितीमागे असलेले अंतिम सत्य किंवा परतत्त्व असा झालेला दिसतो. त्या परतत्त्वाचे शाब्दिक प्रतीक म्हणून ॐकाराची उपासना सांगितलेली आहे.  या ॐकाराचे घटक अ+उ+म् हे वर्ण आहेत आणि या वर्णांचे अनेक वेगवेगळे अर्थ आहेत असे उपनिषदांत दिसते. भाषाविज्ञानाच्या दृष्टीने ॐकाराचे अ+उ+म् या वर्णांमध्ये केलेले विश्लेषण आणि हे तीन वर्ण एकत्र होऊन किंवा त्यांचा संधी होऊन ॐकार तयार होतो ही समजूत भाषारचनेच्या काही नियमांचे ज्ञान अस्तित्वात आल्याची खूण म्हणून आपण पाहू शकतो. या ॐकाराच्या संदर्भात आणि वेदातल्या वृत्तांविषयीच्या उल्लेखामध्ये येणारी दुसरी महत्त्वाची संज्ञा म्हणजे अक्षर. ॐकाराला अक्षर म्हणताना syllable हा जसा अर्थ आहे तसेच हे अक्षर क्षर नाही म्हणजे ते अनादि-अनंत आहे अशी पण समजूत अभिप्रेत आहे. भाषाविषयक संज्ञांना अशा प्रकारे जसा भाषावैज्ञानिक अर्थ असतो तसाच या प्राचीन वाङ्मयात या संज्ञांना आध्यात्मिक किंवा तत्त्वज्ञानपर अर्थही असतो. प्राचीन भारतीय भाषाविषयक चिंतनाच्या ह्या दोन्ही बाजू ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

संदर्भ :

  • D’sa, Francis X., Śabdaprāmāṇyam in Śabara and Kumārila : Towards a Study of the Mīmāṃsā Experience of Language.  Publications of the de Nobili Research Library, Vienna, 1980.

Key words: #अपौरुषेयत्व, #वेदांचे ईश्वरकर्तृकत्व, #वेदांचे नित्यत्व