कुर्डीकर, मोगूबाई : ( १५ जुलै १९०४– १० फेब्रुवारी २००१ ). हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका. त्यांचा जन्म कुर्डी (गोवा) येथे झाला. त्यांचे पाळण्यातले नाव मोगा. त्यांच्या मातोश्री व गायिका जयश्रीबाई यांचा आवाज गोड असला, तरी व्यासंग करण्याजोगी त्यांच्या घरची परिस्थिती नव्हती; मात्र आपल्या मुलीने अभिजात संगीत क्षेत्रात मोठे नाव कमवावे, या तळमळीने त्यांनी खूप धडपड केली. गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात आणि सोमेश्वर-रवळनाथाच्या देवळात चालणाऱ्या भजनांच्या वातावरणात वाढल्याने मोगूबाईंवर लहान वयातच सुरांचा संस्कार झाला. मोगूबाई नऊ वर्षे वयाच्या असताना जयश्रीबाईंनी त्यांच्यासह गोव्याच्याच ‘चंद्रेश्वर भूतनाथ संगीत नाटक मंडळीत’ प्रवेश केला. भक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद इ. नाटकांमधील मोगूबाईंची कामे व गाणी त्याकाळी गाजली. तिथेच प्रख्यात तबलावादक लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी मोगूबाईंना शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे धडे दिले. परिणामी मोगूबाईंच्या अंगभूत लय-ताल गुणांना प्रोत्साहन मिळून त्यांत त्यांनी पुढे असामान्य प्रावीण्य मिळविले. मोगूबाईंची घरची स्थिती हलाखीची होती. त्यातच वयाच्या दहाव्या वर्षी आईचे छत्रही नाहीसे झाले. १९१७ ते १९१९ या काळात मोगूबाई ‘सातारकर स्त्री नाटक मंडळी’त होत्या. तिथे ‘शारदा’, ‘सुभद्रा’, ‘किंकिणी’ अशा यशस्वी भूमिका त्यांनी केल्या. १९१९ मध्ये मोगूबाई सांगलीत आल्या. मोगूबाईंची त्या वयातील गाण्याची तयारी व समज पाहून जयपूर घराण्याचे ख्यातनाम गायक अल्लादियाखाँ यांनी त्यांना तालीम सुरू केली. १९२१ मध्ये खाँसाहेब मुंबईस आले. मोगूबाईही तालमीसाठी मुंबईस आल्या. दोन वर्षांची ही तालीम नंतर खंडित झाल्याने आग्रा घराण्याचे बशीरखाँ व विलायत हुसेनखाँ यांची त्यांनी तालीम घेतली. १९२७ ते १९३२ या काळात अल्लादियाखाँसाहेबांनी आपले बंधू हैदरखाँ यांची तालीम मोगूबाईंना देवविली. अल्लादियाखाँसाहेबांनी १९३४ मध्ये गंडाबंधन करून मोगबाईंना तालीम सुरू केली, ती खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत (१९४६), अधूनमधून व्यत्यय येत गेल्याने ही तालीम खंडित स्वरूपात दिली गेली.

लयप्राधान्य हे मोगूबाईंच्या गाण्याचे खास वैशिष्ट्य असून, लयीचे अवघड प्रकारही त्या सहजतेने करून जात असत. कमीतकमी स्वरयोजनेच्या अर्थवाही उपजा, कणस्वरांची प्रभावी योजना, आवाजाचा अकृत्रिम, अनुनासिकविरहित लगाव, खणखणीत असूनही हळुवार असा स्वर, सुरेल स्वरांचा डौल व लयीचा तोल एकाच वेळी सांभाळण्याचे कसब, लयीशी लडिवाळपणे खेळत केलेले बाल-आलाप व लयीत गुंफलेल्या बोल-ताना, प्रचंड दमसासाच्या ताना, बंदिशीची व ख्यालाची प्रमाणबद्ध मांडणी ही त्यांच्या ख्यालगायनाची ठळक वैशिष्ट्ये होती. अस्ताई-अंतऱ्यातील शब्दांचा भावार्थ व स्वरार्थ लक्षात घेऊन लयीच्या विविध अंगांनी चीजेचे बोल फिरवून अलगद समेवर येणे, तानफिक्र्यांमध्ये प्रत्येक फिक्र्यातील अंतर्गत लडींची सतत बदलती ठेवण ठेवणे, ही त्यांची खासियत होती.

मोगूबाईंनी सावनी नट, जयतकल्याण, शुद्ध नट, बसंत बहार, भूप नट, संपूर्ण मालकंस अशा अनेक अनवट रागांतून द्रुत चिजा बांधल्या. त्या त्यांच्या सर्जनशीलतेच्या निदर्शक आहेत. स्वतः आयुष्य भर केवळ ख्यालगायकीचा पाठपुरावा करत असतानाही त्यांनी ठुमरी, भजन आदी उपशास्त्रीय प्रकारांकडेही रसिक व मर्मग्राही दृष्टीने लक्ष पुरवले.

मोगूबाईंना रसिकांकडून ‘गानतपस्विनी’ ही सन्मान्य उपाधी मिळाली. जयपूर घराण्याची गानपरंपरा सातत्याने टिकावी, यासाठी त्यांनी मुक्तहस्ताने गानविद्या दिली. ख्यातनाम गायिका किशोरी आमोणकर ह्या त्यांच्या कन्या व शिष्या होत. मोगूबाईंच्या अन्य शिष्यवर्गात कौसल्या मंजेश्वर, वामनराव देशपांडे, सुशीलाराणी पटेल, कमल तांबे, सुहासिनी मुळगावकर, पद्मा तळवलकर, सुलभा पिशवीकर इ. गायक गायिकांचा अंतर्भाव होतो.

मोगूबाईंना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांमध्ये संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९६८), भारत सरकारकडून पद्मभूषण (१९७४) हा सन्मान, गोव्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात संगीत रिसर्च अकादमीचे पारितोषिक (१९८०) इत्यादींचा समावेश होतो.

मोगूबाईंचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ : इनामदार, कल्याणी, गानतपस्विनी, पुणे, १९८६.

समीक्षण : श्रीकांत डिग्रजकर