ईजिप्शियन चंद्रदेव थोथ हा विज्ञान, कला आणि इतिहास इत्यादींची नोंद ठेवणारा देवांचा लेखनिक होता. त्याने लिहिलेल्या ग्रंथाला थोथचे पुस्तक  म्हणतात. ईजिप्शियन इतिहासकार मॅनेथो (इ.स.पू. ३००) ह्याच्या मते थोथने एकूण ३६,५२५ पुस्तके लिहिली असून त्यात अनेक मंत्र, विधी, मंदिरस्थापत्य, ज्योतिषशास्त्र, भूगोल, विविध उपचार पद्धति व औषधे ह्यांची माहिती आहे.

थोथ देवता आणि ‘ज्ञानप्रेमी’ (The One Who loves Knowledge) ह्या दोघांमधील संवाद स्वरूपातील ह्या पुस्तकात विविध देवतांची वैशिष्ट्ये, त्यांचे पवित्र पशू, मृतांचे जग (Duat) अशा विविध विषयांवरील चर्चा आहे.

या पुस्तकाचा उल्लेख टॉलेमी काळातील नेफरकप्ताह (Nefarkaptah), सेटने खमवस (Setne Khamwas) ह्या राजपुत्रांच्या एका आख्यायिकेत येतो. ह्या आख्यायिकेनुसार या पुस्तकात दोन मंत्र आहेत. पहिल्या मंत्राच्या मदतीने स्वर्ग आणि पृथ्वीची सर्व रहस्ये आणि पशुपक्ष्यांची भाषा अवगत होते, तर दुसऱ्या मंत्रामुळे देवतांचे संपूर्ण ज्ञान आणि त्यांची विविध गुपिते जाणण्याची क्षमता प्राप्त होते.

आख्यायिकेनुसार हे पुस्तक नाईल नदीच्या तळाशी कॉप्टोस नावाच्या स्थळाजवळ होते. लोखंड, कांस्य, कीट नावाचे खास लाकूड, हस्तिदंत, शिसव, चांदी व सुवर्ण अशा विविध प्रकारचे एकात एक असे अनेक पेटारे होते. त्यांतील सर्वांत आतल्या सुवर्णपेटीत हे पुस्तक होते. बाहेरील लोखंडी पेटीचे संरक्षण कधीही मृत न होणारा एक महाभयंकर साप आणि इतर असंख्य साप, विंचू करत होते.

ईजिप्शियन राजपुत्र नेफरकप्ताह ह्याने सर्पाशी लढून हे पुस्तक प्राप्त केले; पण ह्या चौर्यकर्माची शिक्षा म्हणून थोथच्या आज्ञेवरून इतर देवतांनी नेफरकप्ताहची पत्नी अव्हेरे/अहुरा आणि मुलगा मेरीब/मेराब ह्यांना मारून टाकले. हे पाहून दु:खी झालेल्या नेफरकप्ताहने आत्महत्या केली आणि टोटचे ते पुस्तक मेंफिस येथे नेफरकप्ताहच्या थडग्यात त्याच्या शवासोबत पुरण्यात आले.

त्यानंतर शेकडो वर्षांनी ईजिप्शियन राजा रॅमसीझ याचा पुत्र सेटने खमवस या पुस्तकाच्या शोधात निघतो. तो अतिशय शूर, धाडसी व जादू अवगत असलेला बुद्धिवान राजपुत्र होता. जेव्हा त्याला या पुस्तकाविषयी कळते, तेव्हा तो ते हस्तगत करायचे ठरवतो. तो नेफरकप्ताहचे थडगे शोधून काढतो. नेफरकप्ताहच्या शवाशेजारी त्याची मृत पत्नी अव्हेरे आणि मुलगा मेरीब ह्यांचे आत्मा (Ka) बसलेले त्याला दिसतात. नेफरकप्ताहच्या शवावर असलेले पुस्तक घेण्याची परवानगी अव्हेरेने द्यावी अशी विनंती तो तिच्याजवळ करतो. अव्हेरेचा आत्मा त्याला पुस्तक घेण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करतो; पण तो नेफरकप्ताहच्या इच्छेविरुद्ध पुस्तक हस्तगत करतो. त्यामुळे त्याला पुस्तकातील सर्व दैवी ज्ञान अवगत होते.

ह्या घटनेनंतर सेटने खमवसच्या आयुष्यात एक अतिशय सुंदर स्त्री येते. तिच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून तो स्वतःच्या पत्नी व मुलांची हत्या करण्यास तयार होतो आणि आपल्या पित्यासमोर त्याची स्थिती अत्यंत लाजिरवाणी होते. अखेरीस त्याला जेव्हा कळते की, हे सगळे नेफरकप्ताहच्या आत्म्याने सूडरूपाने घडवून आणलेले आहे, तेव्हा तो हादरतो आणि पुढे आणखी काही विपरीत घडू नये म्हणून पुस्तक नेफरकप्ताहच्या थडग्यात परत नेऊन ठेवतो व त्याची क्षमा मागतो. तसेच नेफरकप्ताहच्या विनंतीवरून त्याची पत्नी आणि मुलगा ह्यांचे कॉप्टोसजवळ असलेले मृतदेह शोधून तेदेखील नेफरकप्ताहच्या थडग्यात त्याच्या शेजारी आणून ठेवतो. त्यानंतर नेफरकप्ताहचे थडगे आपोआप कायमचेच बंद होते.

ह्या आख्यायिकेने देवदेवतांच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करून त्यांचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्यास काय होऊ शकते, हे सामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

संदर्भ :

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे