लँडर, रिचर्ड लेमन (Lander, Richard Lemon) : (८ फेब्रुवारी १८०४ – ६ फेब्रुवारी १८३४). पश्चिम आफ्रिकेतील नायजर नदीचे समन्वेषण करणारे ब्रिटिश समन्वेषक. त्यांचा जन्म इंग्लंडच्या कॉर्नवॉल परगण्यातील ट्रुरो येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी औपचारिक शिक्षण विशेष घेतले नव्हते. लहानपणापासूनच त्यांना प्रवासाची आवड होती. वयाच्या तेराव्या वर्षी (इ. स. १८१७) वेस्ट इंडीजला जाणाऱ्या एका व्यापाऱ्याचा सेवक म्हणून लँडर त्यांच्याबरोबर गेले होते. त्या वेळी त्यांना मलेरिया झाला. त्यामुळे त्यांची मलेरियाविरुद्धची प्रतिकारशक्ती वाढली. त्याचा फायदा त्यांना नंतरच्या काळात आफ्रिकेतील दाट जंगलातून काढलेल्या सफरींमध्ये झाला. इ. स. १८१८ मध्ये घरी परतल्यानंतर त्यांना लंडनमधील काही सधन कुटुंबांत एक सेवक म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांच्याबरोबर लँडर यांचा यूरोपमध्ये बराच प्रवास झाला.

एकोणिसाव्या शतकात आफ्रिका खंडाच्या अंतर्गत भागाची माहिती यूरोपीयन देशांना नव्हती. दाट जंगले व आदिवासींच्या टोळ्या यांच्या भितीमुळे यूरोपीयन राष्ट्रांचा संबंध केवळ किनाऱ्यावरील बंदरांशीच येत असे. त्यामुळे आफ्रिकेला ‘काळे खंड’ असे संबोधले जात असे. मेजर डब्लू. एम. कोलब्रूक हे इ. स. १८२३-२४ मध्ये सांप्रत दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील केप ऑफ गुड होप येथील ब्रिटिश केप कॉलनीला भेट देण्यासाठी गेले होते. त्यांचा खाजगी सेवक म्हणून लँडर त्यांच्यासोबत प्रवासाला गेले होते. स्कॉटिश समन्वेषक ‌बेन ह्यू क्लॅपरटन यांच्या इ. स. १८२५ – १८२८ या कालावधीतील पश्चिम आफ्रिकेतील नायजर नदीच्या प्रवाहमार्गाच्या समन्वेषणासाठी गेलेल्या दुसऱ्या सफरीत एक सेवक म्हणून लँडर सहभागी झाले होते. लँडर यांची ही पहिलीच समन्वेषण सफर होती. लँडर यांना समन्वेषणात रुची असल्यामुळे ते अल्पावधीत क्लॅपरटन यांचे विश्वासू सहकारी बनले. या सफरीतील क्लॅपरटन आणि लँडर यांचे यूरोपीयन सहकारी आजारी पडून सफरीच्या सुरुवातीच्या काळातच ते सर्वजण मृत्यू पावले. त्यामुळे त्यांची ही सफर विशेष यशस्वी होऊ शकली नाही. लँडर व क्लॅपरटन हे दोघेही आजारी पडले. त्यातच क्लॅपरटन यांचे एप्रिल १८२७ मध्ये सांप्रत नायजेरियातील सोकोटोजवळ निधन झाले. त्यामुळे या सफरीतील लँडर हे एकमेव सदस्य उरले. लँडर यांना तेथील स्थानिक आफ्रिकन जमातींच्या त्रासालाही सामोरे जावे लागले. लँडर यांनी आग्नेयीकडील कानोपर्यंतचा आपला प्रवास तसाच चालू ठेवला. त्यानंतर योरूबा लोकांच्या प्रदेशातून ते किनाऱ्याकडे परत आले आणि नंतर जुलै १८२८ मध्ये ब्रिटनला परतले. क्लॅपरटन यांच्या प्रवासाविषयीच्या नोंदी लँडर यांनी जतन करून ठेवल्या होत्या. त्याआधारे त्यांनी जर्नल ऑफ रिचर्ड लँडर फ्रॉम कानो तू सी कोस्ट (१८२९) आणि रेकॉर्ड्स ऑफ कॅप्टन क्लॅपरटन्स लास्ट एक्स्पिडिशन टू आफ्रिका, वुइथ द सब्सिक्वेंट ॲडव्हेंचर्स ऑफ ऑथर (१८३०) ही पुस्तके प्रकाशित केली.

ब्रिटिश शासनाने इ. स. १८३० मध्ये रिचर्ड यांना पुन्हा पश्चिम आफ्रिकेच्या सफरीवर पाठविले. या वेळी त्यांचा धाकटा भाऊ जॉन त्यांच्यासोबत होता. ९ जानेवारी १८३० रोजी त्यांनी पोर्टस्मथ सोडले. २२ मार्च १८३० रोजी सांप्रत नायजेरियातील बादाग्री येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी अंतर्गत भागातील नायजर नदीच्या डाव्या तीरावरील बूसापर्यंत प्रवास केला. नायजर नदीच्या खालच्या टप्प्यातील या बूसा ठिकाणापासून वरच्या दिशेने, नदीच्या उगमाकडे सुमारे १६० किमी. अंतरापर्यंतचा प्रवास करून या प्रवाहमार्गाचे समन्वेषण केले. त्यानंतर धोकादायक अशा डोंगी होडीतून ते पुन्हा बेन्वे नदी व नायजर नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेशापर्यंत आले. त्रिभुज प्रदेशाजवळ ओरा या स्थानिक आदिवासींनी त्या दोघांना पकडले. तेथील राजाने मोठ्या खंडणीची मागणी केली आणि खंडणी मिळेपर्यंत जॉन यांना ओलीस ठेवले. तेथून सुटका झाल्यानंतर ते फरनँदो पो बेटापर्यंत आले. फरनँदो पो बेटावरून रीओ दे जानेरोमार्गे ते इ. स. १८३१ मध्ये ब्रिटनला परतले. ओरा आदिवासींचा अडथळा वगळता या सफरीत नायजर नदीच्या प्रवाहमार्गाच्या समन्वेषणात ते यशस्वी झाले होते. ब्रिटनला परतल्यानंतर त्यांनी आपल्या सफरीचा तपशीलवार वृत्तांत जर्नल ऑफ न एक्स्पिडिशन टू एक्स्प्लोअर द कोअर्स अँड टर्मिनेशन ऑफ द नायजर (१८३२) मध्ये लिहून ठेवला. त्यांनी आपल्या लेखनातून नायजर नदीचा प्रवाहमार्ग आणि त्रिभुज प्रदेश यांची माहिती पाश्चिमात्य जगाला करून दिली.

नायजर आणि बेन्वे नद्यांच्या संगमाजवळ व्यापारी वसाहती स्थापन करण्याच्या उद्देशाने मॅकग्रेगर लेअर्ड आणि लिव्हरपुदलिअन या व्यापाऱ्यांनी इ. स. १८३२ मध्ये एका सफरीचे आयोजन केले होते. त्यांनी या सफरीचे नेतृत्व लँडरकडे दिले. सफरीसाठी क्वोरा व अल्बर्का या दोन शस्त्रसज्ज आगबोटी वापरण्यात आल्या होत्या. लँडर यांना या सफरीत अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. तापामुळे अनेक सहकारी मरण पावले. त्यामुळे बूसा येथे जाणे शक्य झाले नाही. डोंगी होडीमधून नदीच्या पात्रातून वरच्या दिशेने जात असताना तेथील स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. मांडीला बंदुकीची गोळी लागून लँडर जखमी झाले. त्यांनी किनाऱ्यावर परतण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. फरनँदो पो येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रिचर्ड लँडर यांच्या स्मरणार्थ ट्रुरो या त्यांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यात आले आहे. नायजर नदीचा प्रवाहमार्ग आणि तिच्या मुखाचा शोध घेण्याच्या बाबतीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना इ. स. १८३२ मध्ये ‘रॉयल जिऑग्रॅफिकल सोसायटी फाऊंडर्स मेडल’ या पदकाने गौरविण्यात आले. या पदकाचे तेच पहिले मानकरी होते.

समीक्षक : वसंत चौधरी