स्पीक, जॉन हॅनिंग (Speke, John Hanning) : (४ मे १८२७ – १५ सप्टेंबर १८६४). ब्रिटिश समन्वेषक आणि लष्करी अधिकारी. पूर्व आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवरापर्यंत जाणारे पहिले यूरोपीय. नाईल नदीचा उगम व्हिक्टोरिया सरोवरातून झाल्याचे पहिल्यांदा स्पीक यांनी दाखवून दिले. १८४४ मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये अधिकारपदावर त्यांची नेमणूक झाली. पंजाबमध्ये कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी हिमालय पर्वत आणि तिबेटमध्ये प्रवास केला. क्रिमियाच्या युद्धात तुर्की रेजिमेंटमध्ये ते कॅप्टनपदावर होते. १८५४ मध्ये आफ्रिकेतील सोमालीलँड प्रदेशाचे समन्वेषण करण्यासाठी रिचर्ड फ्रान्सिस बर्टन यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या सफरीत स्पीक एक सदस्य म्हणून सहभागी झाले. त्या वेळी सोमालींनी केलेल्या हल्ल्यात स्पीक गंभीर जखमी झाले (एप्रिल १८५५). त्यामुळे त्यांना ही सफर सोडून द्यावी लागली.

डिसेंबर १८५६ मध्ये झांझिबार बेटावर स्पीक पुन्हा बर्टन यांच्या सफरीत सामील झाले. जून १८५७ मध्ये सर्वजण झांझिबार येथून निघाले. आफ्रिकेच्या मध्यात एक मोठे सरोवर असल्याचे ऐकिवात होते. त्या सरोवराचा आणि त्या अनुषंगाने नाईल नदीच्या उगमाचा शोध घेणे हा त्यांच्या या सफरीचा मुख्य उद्देश होता. आफ्रिकेच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी चांगला मार्ग शोधण्याच्या उद्देशाने सुमारे सहा महिने पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्याचे समन्वेषण केल्यानंतर फेब्रुवारी १८५८ मध्ये ते टांगानिका (उजीजी) सरोवरापर्यंत पोहोचले. तेथून परतीच्या प्रवासात स्पीक यांनी बर्टन यांची साथ सोडली आणि एकटेच उत्तरेच्या दिशेने गेले. ३० जुलै रोजी ते एका मोठ्या सरोवराजवळ पोहोचले. व्हिक्टोरिया राणीच्या सन्मानार्थ त्यांनी त्या सरोवराला व्हिक्टोरिया असे नाव दिले.

व्हिक्टोरिया सरोवरातूनच नाईल नदीचा उगम होत असल्याचा निष्कर्ष स्पीक यांनी काढला; परंतु बर्टन यांनी स्पीक यांचा हा निष्कर्ष नाकारला. इंग्लंडमध्ये हा वादाचा विषय झाला. रॉयल जिऑग्रॅफिकल सोसायटीने मात्र स्पीक यांच्या सफरीची पाठराखण केली. तसेच त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल त्यांचा सन्मान केला.

दुसऱ्या सफरीच्या वेळी (१८६०) स्पीक आणि ब्रिटिश समन्वेषक जेम्स ग्रांट यांनी व्हिक्टोरिया सरोवराच्या पश्चिम आणि उत्तर काठाचे समन्वेषण करून त्यांचा नकाशा तयार केला. बुगांडा राज्यालाही त्यांनी भेट दिली. ग्रांट यांची सोबत न घेता व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावरून पुढचा प्रवास करत असताना २८ जुलै १८६२ रोजी त्यांना व्हिक्टोरिया सरोवराच्या उत्तर भागातून धबधब्याच्या स्वरूपात नाईल नदी बाहेर पडत असल्याचे आढळले. त्यांनी त्या धबधब्याला ‘रिपन फॉल्स’ असे नाव दिले. त्यांच्या पथकाने नंतर या नदीच्या प्रवाहमार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथील जमातींमध्ये उद्भवलेल्या संघर्षामुळे स्पीक यांना आपल्या प्रवासाचा मार्ग बदलावा लागला. फेब्रुवारी १८६३ मध्ये ते दक्षिण सूदानमधील नाईल नदीच्या काठावरील गन्डॉकरो येथे पोहोचले. तेथे त्यांची भेट नाईलचे समन्वेषक सर सॅम्युएल व्हाइट बेकर आणि फ्लॉरेन्स फॉन सास (बेकर यांची नंतर झालेली पत्नी) हे दोघे भेटले. स्पीक व ग्रांट यांनी व्हिक्टोरिया सरोवराच्या पश्चिमेस असलेल्या दुसऱ्या सरोवराविषयी त्यांना सांगितले. बेकर यांच्या पथकाला या माहितीचा उपयोग अॅल्बर्ट सरोवरातून बाहेर पडणाऱ्या नाईल नदीच्या दुसऱ्या प्रवाहाचे उगमस्थान निश्चित करण्यासाठी झाला.

नाईल नदीच्या उगमाचा शोध लावल्याच्या स्पीक यांच्या दाव्याला इंग्लंडमध्ये पुन्हा आव्हान देण्यात आले. या विषयावर स्पीक यांची रिचर्ड बर्टन यांबरोबर ज्या दिवशी जाहीर चर्चा होणार होती, त्याच दिवशी स्पीक यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या समन्वेषणाचा वृत्तान्त जर्नल ऑफ द डिस्कव्हरी ऑफ द सोअर्स ऑफ द नाईल (१८६३) आणि व्हाट लेड टू द डिस्कव्हरी ऑफ द सोअर्स ऑफ द नाईल (१८६४) या ग्रंथांमधून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

समीक्षण : माधव चौंडे