ज्या बालकांना कोणत्याही कारणाने शारीरिक अथवा मानसिक व्यंग असते त्यास उपजत व्यंग किंवा जन्मजात विकृती असे म्हणतात. बाह्य शरीररचनेतील विकृती लगेचच निदर्शनास येतात तसेच अंतर्गत शरीररचनेतील विकृती जन्मानंतर काही तासांत लक्षात येतात परंतु मानसिक किंवा बौद्धिक विकृती समजून येण्यास वेळ लागतो.

उपजत व्यंगाची कारणे : याचे निश्चित कारण स्पष्ट झाले नसले तरी साहाय्यभूत कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

 1. आनुवंशिक : माता-पित्याकडील गुणसूत्रात्मक दोष आपत्यांमध्ये विकृतीच्या स्वरूपात उतरलेली दिसतात. तशी व्यंगाची माहिती माता किंवा पित्याकडील कुटुंबातील व्यक्तींमध्ये असल्याचे समजते. गुणसूत्रांमुळे उपजत व्यंग निर्माण होऊ शकते.
 2. मूल गर्भाशयात असतानाचे कारणीभूत घटक :
 • जंतूसंसर्ग : मातेला गरोदरपणी गोवर, रूबेला, एड्स इ. सारख्या विषाणूंचा संसर्ग (विशेषत: पहिल्या तीन महिन्यांत) झाल्यास.
 • क्ष-किरण : गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यांत माता क्ष-किरणांच्या संपर्कात आल्यास तसेच तिला रेडीएशन उपचार चालू असल्यास किंवा माता रेडीएशन संपर्कात येण्याजोग्या विभागात काम करीत असल्यास.
 • औषधांचा परिणाम : गरोदरपणाच्या सुरुवातीला मातेला ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविके, झोपेची औषधे इ. दिली गेल्यास.
 • मातेचे कुपोषण : अन्नघटकांच्या कमतरतेमुळे जन्मास येणाऱ्या बाळात उपजत व्यंग आढळते. उदा., फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे तंत्रिका नलिका विकृती आढळते (Neural Tube Defect).
 • चयापचयाचे विकार : मधुमेह, अवटुअतिक्रियता (Hyperthyroidism) इ. चयापचय विकार असणाऱ्या मातेचे मूल उपजत व्यंग असणारे होऊ शकते.
 • गर्भाशयांतर्गत अस्वाभाविकता : अतिगर्भादक (Polyhydramnios), कमी गर्भादक (Oligohydramios) अस्थानी गर्भधारणा (Ectopic Pregnancy) इत्यादींमुळे गर्भाची स्थिती अस्वाभाविक असल्याने गर्भामध्ये विकृती निर्माण होऊ शकते.
 • इतर कारणे : 1) जास्त वयाची माता (30 पेक्षा अधिक). 2) गर्भास ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यास.

उदा., सगर्भापस्मार (Eclampsia), सगर्भापस्मार पूर्व (Pre-eclampsia), गरोदरपणातील व प्रसवपूर्व रक्तास्राव, वारेचे विकार (Placental Disorders), मातेस असणारा हृदयविकार इ.

प्रतिबंधक उपाय : उपजत व्यंगास प्रतिबंध करण्यासाठी त्याचे कारणीभूत घटक टाळणे गरजेचे असते.

परिचर्येद्वारा अनुवांशिक समुपदेशन व आरोग्य शिक्षण :

 • योग्य वयात लग्न व गरोदरपण असावे. कारण मातेचे वय जितके जास्त तितका उपजत व्यंगाचा धोका जास्त.
 • आधीचे मूल उपजत व्यंग असलेले असल्यास सध्याच्या गरोदरपणात लवकरात लवकर व्यंगासाठी गर्भाची सोनोग्राफी करून घेणे.
 • गर्भामध्ये व्यंग आढळल्यास लवकरात लवकर वैद्यकीय गर्भपाताचा सल्ला देणे.
 • नात्यामध्ये लग्न न करण्याचे समाजात जनजागृती करणे, जेणेकरून अशा विवाहांमधून पुढच्या पिढीमध्ये , दात्र-कोशिका पांडुरोग (Sickle Cell Anemia), हिमोफिलिया (रक्तामध्ये गोठण्याच्या गुणधर्माचा अभाव) इ. सारखे अनुवंशिक रोग संक्रमित होणार नाहीत.
 • माता गरोदर राहिल्यास लवकरात लवकर नोंदणी व तपासण्या करून घेणेचा सल्ला देणे.
 • सकस, पुरेसा आहार, विश्रांती, धनुर्वात प्रतिबंधक लस, लोह व फॉलिक ॲसिड आणि कॅल्शिअमच्या गोळ्या इ. घेणेस सांगावे.
 • किरणोत्सर्गी विभागात कामास असल्यास गरोदरपणात विभाग बदलून घेणेचा सल्ला देणे.
 • सांसर्गिक व्यक्तींपासून दूर राहणे, सुरुवातीच्या काळात वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणताही औषधोपचार घेऊ नये.
 • आधीपासूनच काही आजार असल्यास योग्य औषधोपचार व आहार – विहार ठेवून तो नियंत्रणात ठेवणे.
उपजत व्यंगाचे प्रकार

उपजत व्यंगाचे प्रकार :

 • मज्जासंस्थेचे व्यंग : १) तंत्रिका नलिका विकृती , २) जलमस्तिष्क (Hydrocephalus), ३) अमस्तिष्कता (Anencephaly), ४) डॅण्डी वॉकर लक्षणसमूह (Dandy Walker Syndrome) इ.
 • हृदराभिसरण संस्थेचे व्यंग : १) महाधमनी वल्लसंकोचन (Aortic Stenosis), २) फुप्फुसप्रकांड संकोचन (Pulmonary Stenosis), ३) फॅलोची चतुःसूत्री (Tetralogy of Fallot), ४) हृदयाला छिद्र असणे (Ventricular Septal Defect / Atrioventricular Septal Defect).
 • मूत्रमार्ग व जननमार्गाचे व्यंग : १) किडनी तयार न होणे (Renal Agenesis), २) जलवृक्क (Hydronephrosis), ३) जन्मजात कोष्ठीय वृक्क (Congenital Cystic Kidney), ४) योनि-मूत्राशय नाल (Vesicovaginal Fistula), ५) अधश्छिद्रता किंवा उपरिछिद्रता (Hypospadias / Epispadias, ६) मूत्राशय विवर्तन (Exstrophy of Bladder) इ.
 • अन्नमार्गाचे व्यंग : १) तुटका ओठ, फाटका टाळा, २) अन्ननलिका अच्छिद्रता असणे (Esophageal Atresia), ३) जठरनिर्गमी संकोच (Pyloric Stenosis), ४) आद्यांत्र अच्छिद्रता (Duodenal Atresia),  ५) गंडिकाविरहित महाबृहदांत्र स्फिती (HirschsPrung’s Disease) ६) गुद्-मलाशय विकृत निर्मिती (Anorectal Malformation) इ.
 • श्वसन मार्गाचे व्यंग : १) ग्रासनलिका व श्वासनलिका यांची विकृत जोडणी (Tracheoesophageal Fistula (TOF)), २) काचाभ पटल विकार (Hyaline Membrane Disease) इ.
 • हाडांचे व्यंग : १) पादव्यंग (Talipes), २) उपास्थि अविकसन (Achondroplasia), ३) अल्पविकासी ऊर्वस्थि (Hypoplastic Femur), ४) अधिकांगुलियता / युक्तांगुलिता (Polydactyly / Syndactyly).
 • इतर व्यंग : १) डाउन्स सिन्ड्रोम, २) स्त्रीलिंग गुणसूत्राअभावी होणारा एक विकार (Turner Syndrome) इ.

वरीलपैकी काही उपजत व्यंग टाळता येणारी, काही शस्त्रक्रियेने दुरुस्त करता येणारी तर काहींमुळे आजन्म अपंगत्व निर्माण होणारी अशी आहेत. काही व्यंगांमुळे बालक उपजत मृत्यू किंवा जन्मानंतर लवकरच मृत्यूमुखी पडते.

संदर्भ :

समीक्षक : सरोज उपासनी