बंग, अभय : ( २३ सप्टेंबर १९५० – ) अभय बंग हे महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक आरोग्यासाठी ते चार दशकांपासून कार्यरत आहेत. त्यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन, ऍक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेची स्थापना केली.

अभय बंग आणि राणी बंग 

अभय बंगांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. त्यांचे वडील अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी गांधीजींचे आशीर्वाद घ्यायला गेले तेव्हा गांधीजींनी ‘तुला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर भारतातील खेड्यात जा’ असा सल्ला दिला आणि ठाकूरदासांनी खरोखरच अमेरिकेला जायचे रद्द करून भारतातच खेड्यांमध्ये अभ्यास केला.

अभय बंग यांचे बालपण वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात गांधीजींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांच्या सोबत गेले. लहानपणा पासूनच अभय आणि अशोक बंग या भावंडांमध्ये आपण आयुष्यात काय करावे या विषयी चर्चा चाले. अशोकने शेतकी क्षेत्रात काम करायचे ठरवले तर अभयने खेड्यातील रहिवाश्यांचे आरोग्य या क्षेत्रातकाम करायचे ठरवले.

अभय बंगांनी नागपूर विद्यापीठातून एम.बी.बी.एस. आणि एम.डी. (वैद्यकशास्त्र) या पदव्या संपादन केल्या. त्यांच्या सहचारिणी राणी बंग यांनीही एम. डी. (स्त्रीरोगतज्ज्ञ) ही पदवी मिळवली. दोघांनीही आपापल्या विषयांत सुवर्णपदक मिळवले.

अभय आणि राणी बंग या दोघांनाही सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करण्यामध्ये आवड होती. या दिशेने परिणामकारकरीत्या काम करण्यासाठी या विषयामध्ये अभ्यास करण्याची गरज लक्षात घेऊन १९८४ मध्ये दोघांनीही बाल्टिमोर येथील हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून सामाजिक आरोग्य’ या विषयात पदव्युत्तर अभ्यास केला. पुढील आयुष्यात प्रत्येक कार्यामध्ये यांनी एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे इथे जरी बंग असा उल्लेख झाला असला तरीही जवळपास सर्व कामांचे श्रेय त्या दोघांनाही आहे.

अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे कामाला सुरुवात केली. त्यांनी सर्च या संस्थेची स्थापना डिसेंबर १९८५ मध्ये केली. आदिवासी आणि खेडोपाड्यातील आरोग्यविषयक अडचणींवर तोडगा काढायच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनी या कामामध्ये तेथील रहिवाश्यांना साथीदार बनवले. त्यांच्या गरजेनुसार क्लिनिक्स आणि दवाखान्याची स्थापना केली. या भागांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. खोलवर अभ्यास केल्यावर गरिबी, संक्रमक रोग, हगवण, न्यूमोनियापासून दवाखान्याचा अभाव इत्यादी १८ कारणे त्यांना सापडली. सर्च संस्थेने संशोधन करून संसाधनांचा अभाव असतानाही बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्यक्षात उतरविण्यासारखे उपाय शोधले. त्यात नवजात बालसंगोपनामध्ये खेड्यातील बायकांना प्रशिक्षण देणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या संदर्भात त्यांनी जॉन हॉपकिन्समधले त्यांचे गुरु कार्ल टेलर यांचा सल्ला विचारला तेव्हा टेलर म्हणाले, “हे तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य ठरेल.” नवजात बालकांच्या संगोपनासाठी घरगुती उपाय (होम बेस्ड नियोनेटल केअर) बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यामध्ये परिणामकारी ठरले. या उपायांनी जगभरातील तज्ज्ञाना संशोधनासाठी प्रेरित केले. सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांनी बंगांच्या या अपारंपरिक उपायांना आक्षेप घेतला, परंतु पुढे या उपायांचे प्रत्यक्ष परिणाम पाहिल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात समाजाला मदत करण्याच्या त्यांच्या कृतीला सर्वांनी मनापासून मान्यता दिली. आता बंगांच्या या आदर्शाच्या आधारे खेड्यातील सुमारे एक लक्ष महिला भारत सरकारद्वारे ‘आशा’ या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित केल्या गेल्या आहेत. बंगांच्या या कृतीने जगाला पटवून दिले की नवजात शिशुंच्या उपचारासाठी मोठमोठ्या दवाखान्यांची आणि उच्च तंत्रज्ञानाची गरज असतेच असे नाही किंबहुना साध्या, व्यावहारिक उपायांनी खेड्यांमध्येही  उपचार दिले जाऊ शकतात. गडचिरोली जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण त्यांनी दर हजारी १२१ वरून (लाईव्ह बर्थस्) ३० वर आणले.

द लान्सेट  या जगप्रसिद्ध जर्नलने या संशोधनाला उत्कृष्ट निबंधांचा दर्जा दिला आणि म्हटले की या क्षेत्रातील संशोधनामध्ये हा निबंध हा एक मैलाचा दगड आहे. बंगांची ही पद्धती भारत सरकारने आपल्या राष्ट्रीय योजनांमध्ये स्वीकारली आहेच परंतु डब्ल्यू.एच.ओ., युनिसेफ, यु.एस.एड. इत्यादी जागतिक संस्थांनी सुद्धा प्रगतिशील राष्ट्रांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी याचा अवलंब केला आहे. मे २०१७ मध्ये मुंबई हायकोर्टाने बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाय सुचवण्यासाठी बंगांना निमंत्रित केले आणि त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला.

या व्यतिरिक्त दारूबंदीसाठी देखील बंग दंपतीने श्रम घेतले. १९९२ मध्ये लोकाग्रहास्तव दारूबंदी जारी केलेला गडचिरोली भारतातील पहिला जिल्हा ठरला. दारु आणि तंबाखू / धूम्रपान बंदीसाठी डॉ. बंग झटत आहेत, कारण भारतामध्ये रोग आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पहिल्या दहा घटकांपैकी हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. तंबाखूचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्ती यांबाबत जनजागृतीचे कार्य चालू आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासींमध्ये मलेरियाचे प्रमाण अधिक होते. त्याच्या उपायासाठी बंग दंपतीने तेथील लोकांना मलेरिया नियंत्रण व उपचार या विषयी जागृत केले. मलेरिया, कुपोषण, बालमृत्यू इ. जुन्या अडचणींबरोबरच आरोग्य विषयक नवीन अडचणीसुद्धा या भागामध्ये उद्भवत आहेत. हा बाहेरील जगाचा सांस्कृतिक व सामाजिक प्रभाव आहे असे बंगांचे मत आहे. जीवनशैलीशी निगडित आजार, उदा., मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादीचे प्रमाण या भागात वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ८६ खेड्यांमधून केलेला अभ्यास दर्शवतो की अर्धांगाचा झटका सर्वांत जास्त प्रमाणात मृत्यूला कारणीभूत आहे. दर ७ मृत्यूंपैकी एक अर्धांगाचा झटक्यामुळे होतो. यावर सोपा तोडगा काढण्यासाठी सर्च संस्था, वेलकम ट्रस्ट लंडन आणि जैविक तंत्रज्ञान विभाग भारत सरकार मिळून कार्यरत आहेत.

बंगांनी २००६ मध्ये ‘निर्माण’ नावाची संस्था स्थापित केली. तरुण, होतकरू, समाजासाठी वेगळे काही करू इच्छिणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्याचे काम ही संस्था करते. अमृत बंग या संस्थेचे व्यवस्थापन सांभाळत आहे. तरुण डॉक्टरांनी आर्थिक उन्नती सोबत आपल्या  सामाजिक कर्तव्यांचाही विचार करावा असे बंगांचे मत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये ग्रामीण व आदिवासी भागामध्ये काम करण्याचे अनिवार्य केल्यास विद्यार्थ्यांना या भागांतील अडचणी व आव्हाने लक्षात येतील असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच कॉर्पोरेट जगाकडे पाठ फिरवून जे डॉक्टर्स ग्रामीण भागात कार्यरत आहेत, त्यांची नोंद घेऊन त्यांना यथोचित सन्मान/मोबदला देणेही तितकेच आवश्यक आहे. बंग दंपतीने सर्च संस्थेच्या माध्यमातून माँ दंतेश्वरी हा दवाखाना उघडला आहे. येथे अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची सोय आहे. महाराष्ट्रातील अनेक डॉक्टर्स या दवाखान्यात येऊन शस्त्रक्रिया करतात.

बंग दंपतीची त्यांच्या कामाची व संशोधनाची क्षेत्रे : १. ग्रामीण भागातील बालमृत्यू, २. मुलांमधील श्वसनसंस्थेचे विकार, ३. गुप्तरोग, ४. आदिवासी आरोग्य, ५. मद्यपान/तंबाखू, ६. पाठदुखी, ७. मातेचे आरोग्य, ८. स्त्रियांचे आजार इत्यादी.

बंग दंपती सर्च संस्थेचे संस्थापक – निदेशक तर आहेतच, या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय संघटनांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यात खालील संस्था आहेत :

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब नियोजन विभागाची आदिवासी आरोग्य संघटना, ग्रामीण आरोग्य विभाग, राष्ट्रीय आशा प्रशिक्षण गट, लोकसंख्या कमिशन, महाराष्ट्र सरकारचे चंद्रपूर जिल्ह्यातील दारू  नियंत्रण समिती, बालमृत्यू मूल्यमापन समिती, डब्ल्यू.एच.ओ.ची उष्णकटिबंधातील आजार संशोधन समिती आणि यू.एस.ए. ची नवजात बालक बचाव सल्लागार समिती.

बंग यांनी लिहिलेली पुस्तके पुढीलप्रमाणे : १. माझा साक्षात्कारी हृदयरोग, २. आशा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठीचे पुस्तक, ३. सेवाग्राम ते शोधग्राम, ४. कोवळी पानगळ, ५. त्यांचे अनेक शोधपत्र व लेख वेगवेगळ्या जर्नल्समधून प्रसिद्ध झाले आहेत.

बंग दंपतीला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही पुरस्कार असे: सह्याद्री दूरदर्शनचा संजीवनी सन्मान, नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार, बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार, बाबा आमटे मानवता पुरस्कार,जॉन हॉपकिन्स संस्थेचा प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार, सीएनएन-आयबीएनतर्फे जीवन गौरव पुरस्कार, रिलायन्स फॉउंडेशनचा पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि आयसीएमआरचे डॉ. शेषाद्री सुवर्णपदक.

संदर्भ :

समीक्षक : आशिष फडके