हिवताप या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो. हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम केले जातात.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २००८ मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. त्यापूर्वी २५ एप्रिल हा दिवस केवळ ‘आफ्रिकन हिवताप दिवस’ म्हणून ओळखला जात असे. २००७ मध्ये आयोजित जागतिक आरोग्य परिषदेत हिवतापाचा जागतिक प्रादुर्भाव या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले. परिणामी हा दिवस ‘जागतिक हिवताप दिवस’ म्हणून ओळखण्यात यावा, असा ठराव सदर परिषदेत मांडण्यात आला. तेव्हापासून हिवतापाची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांबद्दल सामाजिक जागृती करणे आणि संपूर्ण जगभरात हिवतापाविरुद्ध चाललेल्या मोहिमेचा आढावा घेणे, ही जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्टे ठरवण्यात आली.
यूनायटेड नेशन्सचे तत्कालीन महासचिव (Secretary General) बान कि-मून (Ban Ki-moon) यांच्या पुढाकाराने जागतिक हिवतापविरोधी कृती योजना (Global Malaria Action Plan — GMAP) विकसित झाली. हिवतापाच्या जागतिक प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नियंत्रण, निर्मूलन आणि संशोधन ही त्रिसूत्री कृती योजनेचा पाया म्हणून स्वीकारण्यात आली. अधिकाधिक परिणामकारक औषधे आणि रोगप्रतिबंधाची साधने तयार करण्यासाठी ‘संशोधन सातत्य’ ही हिवताप निर्मूलन कृती योजनेची मूलभूत गरज आहे. परंतु, संशोधनासाठीकरिता करण्यात आलेल्या आर्थिक गुंतवणुकीत घट झाल्याने २०१५ पर्यंत जग हिवतापमुक्त करण्याचे ध्येय पूर्ण होऊ शकले नाही. अल्पविकसित देशांमध्ये हिवतापग्रस्त दुर्गम भागांत आरोग्यसुविधा पोहोचवणे हे हिवतापाविरोधातील मोहिमेतील आव्हान आहे.
पहिल्या जागतिक हिवताप दिवसानिमित्त बान कि-मून यांच्याकडून हिवतापग्रस्त प्रदेशामध्ये मच्छरदाण्या, औषधे, कुशल आरोग्यसेवक आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला होता. तसेच वार्षिक रूपरेखांना (Theme) अनुसरून योग्य औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांद्वारे हिवतापावर नियंत्रण करणे सुलभ होते, याबाबत देखील जनजागृती केली जाते. हिवतापाशी निगडित आरोग्यसुविधांबरोबरच भित्तिपत्रके, समाजमाध्यमे आणि इतर जनसंपर्क साधनांद्वारे जागृतीसंदेश सर्वदूर प्रसारित करण्यात येतात. तसेच स्थानिक समुदायांना प्रभावी हिवताप नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्याचेही प्रयोग करण्यात येतात.
जागतिक हिवताप दिवसानिमित्त आखण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण रूपरेखा पुढीलप्रमाणे : सीमाहीन आजार : हिवताप (२००८); भविष्यातील गुंतवणूक : हिवतापाचा पराभव (२०१३-१५); हिवतापाच्या पराभवासाठी सज्ज (२०१८); हिवताप निर्मूलनाची सुरुवात, स्वत:पासून (२०१९-२०).
पहा : हिवताप.
संदर्भ :