भारतातील एक प्राचीन पौराणिक वंश. या वंशासंबंधीची माहिती मुख्यत्वे वैदिक वाङ्मयातून तसेच महाभारत यातून ज्ञात होते. ऋग्वेदातील अनेक सूक्तांत यदुवंशाचा उल्लेख येतो. यदुबरोबर बहुधा तुर्वशाचे नाव येते. दाशराज्ञ युद्धात मात्र यक्षू आणि तुर्वश याचा सुदासचे शत्रू म्हणून उल्लेख आहे. त्याही ठिकाणी यदुचीच यक्षू म्हणून विवक्षा असावी. यदूंचे निवासस्थान दक्षिण पंजाबात परुष्णीच्या पश्चिमेस होते. नंतरच्या काळात यदु आणि तुर्वश यांनी शरयू पार करून अर्ण आणि चित्ररथ यांचा पराभव केल्याचा ऋ. ४·३०·१८ मध्ये उल्लेख आहे. आर्यांच्या पंचजनात यदूंचा अंतर्भाव असावा.
नंतरच्या वाङ्मयात ययातीला देवायानीपासून झालेला पुत्र म्हणून यदूचा निर्देश येतो. ययातीने आपले साम्राज्य आपल्या पाच पुत्रांमध्ये वाटून दिले, तेव्हा यदूला नैर्ऋत्येचा-चर्मण्वती (चंबळा), वेत्रवती (बेतवा) आणि शुक्तिमती (केन) यांच्या काठचा प्रदेश मिळाला. त्यांचे वंशज यादव यांनी पुढे आपल्या राज्याचा विस्तार शशबिंदूच्या कारकिर्दीत पूर्वेस आणि उत्तरेस केला.
यादवांनी गुजरात–काठेवाडमधील आर्येतरांचा उच्छेद करून तेथे आपली सत्ता स्थापिली. यदूला कोष्ट आणि सहस्रजित असे दोन पुत्र होते. पुढे कोष्टपासून झालेल्या वंशाला यादव आणि सहस्रजितपासून झालेल्या वंशाला हैहय अशी नावे रूढ झाली. हैहयांनी माहिष्मती (पूर्वीच्या इंदूर संस्थानातील महेश्वर) येथे आपली राजधानी केली.
यादववंशी विदर्भ राजाने दक्षिणेत येऊन आपल्या नावाने पुढे प्रसिद्ध झालेल्या (विदर्भ) प्रदेशात आपला अंमल बसविला. त्याला क्रथ आणि कैशिक असे दोन पुत्र होते. त्यांच्यामध्ये विदर्भाची वाटणी झाली, तरी पुढे त्या दोन विभागांचे एकीकरण झाल्यावर विदर्भाला क्रथकैशिक हे नाव रूढ झाले.
यादवांचे राज्य उत्तर भारतात मथुरा येथे होते. तेथील राजा कंस याला मगधाचा राजा जरासंध याने आपली कन्या दिली होती. कंस हा दुर्वर्तनी होता. तो प्रजेचा छळ करीत असे. वसुदेवपुत्र कृष्णाने त्याचा शिरच्छेद करून त्याचा वृद्ध पिता उग्रसेन याला गादीवर बसविले. जरासंधाने मथुरेवर अनेक स्वाऱ्या करून त्याचा सूड घेतला, तेव्हा यादवांनी काठेवाडात प्रयाण करून द्वारका येथे आपली राजधानी केली.
यादव साम्राज्याच्या इतर विभागांवर भजमान, देवावृध, अंधक आणि वृष्णी असे सात्वत भीमाचे पुत्र राज्य करीत होते. वृष्णीच्या वंशातील शूरनामक राजाला मारीषा या भोजवंशी राजकन्येपासून वसुदेव हा पुत्र आणि पृथा, श्रुतदेवा आणि श्रुतश्रवा या कन्या झाल्या. पृथेला कुंतीभोज राजाने आपली कन्या मानल्यामुळे कुंती असे नाव पडले. तिचा विवाह पांडु राजाशी झाला. श्रुतश्रवा हिला ही बुंदेलखंड देशाचा राजा दमघोष याला दिली होती. तिला शिशुपालनामक पुत्र झाला. वसुदेवाने कुकुर देशाचा राजा देवक याच्या देवकीनामक कन्येशी विवाह केला होता. तिच्यापासून त्याला बलराम आणि कृष्ण असे दोन पुत्र झाले. त्याची कन्या सुभद्रा हिने अर्जुनाला वरले. त्यांचा मुलगा अभिमन्यु हा भारतीय युद्धात मारला गेला. पुढे त्याचा पुत्र परीक्षित हस्तिनापुरच्या गादीवर बसला.
भारतीय युद्धानंतर काही काळाने द्वारकेच्या यादवांत बंडाळी माजून त्यांत सर्वांचाच नाश झाला. तेव्हा एका वनात जाऊन ध्यानस्थ असलेल्या कृष्णाला दूर ठिकाणाहून हरिण समजून एका व्याधाने बाण मारल्यावर तो निजधामास गेला. नंतर अवशिष्ट राहिलेल्या वज्र नामक नातवाला पांडवांनी मथुरेच्या गादीवर बसविले.
उत्तरकालीन यादव सम्राट आपला संबंध या प्राचीन यादववंशाशी जोडत असत.
संदर्भ :
- Majumdar, R. C. Ed. Vedic Age, Bombay, 1972.
• मिराशी, वा. वि.