व्यक्तीच्या आयुष्यात कामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्ती आपली उपजीविका किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे काम करीत असतो. सर्वसामान्यपणे, मानवाकडून करण्यात येणाऱ्या शारीरिक वा बौद्धिक कार्यामुळे त्याच्या बदल्यात त्याला वस्तू किंवा पैसा या स्वरूपात मोबदला मिळतो; या संज्ञेला काम असे संबोधले जाते. ज्या कामांमधून आर्थिक मोबदला मिळत नाही, अशी कामे या संज्ञेमधून वगळली जातात किंवा ती अदृश्य राहतात. त्यातीलच एक काम म्हणजे ‘घरकाम’ होय. ख्रिस्टीन डेल्फी यांनी ‘आर्थिक दृष्ट्या उत्पादक’ आणि ‘भावनिक काम’ अशी घरकामाची व्याख्या केली आहे.

मुख्यतः बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी केल्या जाणाऱ्या श्रमाला उत्पादक काम म्हटले जाते. म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या ‘विनियोग’ मूल्याला महत्त्व दिले गेल्याचे दिसते, तर ‘उपयोगिता’ मूल्य हे दुर्लक्षिले जाते. घरकामातून ‘उपयोगिता’ मूल्य तयार होत असते. त्यामुळे घरकाम अदृश्य राहून ते विनामोबदला केले जाते आणि ते बाजारपेठेच्या कक्षेबाहेर राहते.

स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून घरकाम ही संकल्पना अधिक व्यापक आहे. अनेक स्त्रीवादी अभ्यासकांनी घरकाम या संकल्पनेची चिकित्सक रित्या उकल केलेली आहे. घरकाम हे लिंगाधारित श्रमविभागणीशी संबंधित असून पुरुषांकडून केले जाणारे काम आणि महिलांकडून केले जाणारे काम याला लिंगाधारित श्रमविभागणी असे म्हणतात. घरामध्येही स्त्री आणि पुरुष यांच्या कामाची विभागणी केलेली दिसून येते. ही विभागणी नैसर्गिक नसून ती समाजरचित आहे. या विभागणीनुसार घरकाम हे मुख्यतः स्त्रियांचे काम समजले जाते. त्यामुळे घरकामाची जबाबदारी प्रामुख्याने स्त्रियांवर दिलेली दिसते. म्हणूनच घरकाम हे लिंगभावाशी संबंधित असल्याचे आढळून येते.

भांडवलशाही विकासाच्या काळामध्ये खाजगी व सार्वजनिक या दोन क्षेत्रांची विभागणी झाली. त्यानंतर कुटुंब हे उपभोगाचे तर कारखाना उत्पादनाचे केंद्र बनले. यामध्येदेखील लिंगाधारित श्रमविभागणीचा विपरीत परिणाम झालेला दिसतो. त्या वेळी भांडवली उत्पादन पद्धतीमध्ये उत्पादक आणि पुनरुत्पादक कामे एकत्रित करणे कठीण असल्याने स्त्रियांना कौटुंबिक क्षेत्रापुरते सीमीत करण्यात आले. पाश्चिमात्य देशांमध्ये व्हिक्टोरियन कालखंडात सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषाला शारीरिक, भावनिक आधार देणे हेच आदर्श गृहिणीचे काम मानले जाऊ लागले. त्यातूनच मध्यम वर्गाकडून ‘गृहिणी’ची आदर्श व्याख्या निर्माण झाल्याचे कॅथरिन हॉल नमूद करतात.

घरकाम या संज्ञेत सुमारे ३५ प्रकारच्या कामांचा समावेश केला जातो. त्याचबरोबर घरकामाचे स्वरूप हे सर्वत्र एकसारखे दिसून येत नाही. त्यामध्ये स्थल, काल, जाती, वर्ग, आर्थिक व राजकीय सत्ता इत्यादींनुसार बदल घडून येत आहेत. चौदाव्या शतकामध्ये म्हणजेच औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी युरोपातील गृहिणी घरातील कामांबरोबरच वेगवेगळी पेये बनविणे, कुक्कुटपालन करणे अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे करत होती. वसाहतिक कालखंडामध्ये भारतात देखील ‘आदर्श’ पत्नीमध्ये कोणकोणती गुणकौशल्य असावीत यांविषयक अनेक मासिके, नियतकालिके यांमधून लिहले जात होते. आज ‘आदर्श गृहिणी’ बनण्यासाठी स्त्रीया वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहेत. उदा., वेगवेगळ्या देशांचे खाद्य पदार्थ बनविणे, गृहसजावट, घरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादी. यासाठी आजच्या काळातही वेगवेगळी मासिके, पुस्तके, दूरदर्शन, फुड चॅनल, ट्रॅव्हल चॅनल इत्यादींवरील पाककलेसंबंधित वेगवेगळे कार्यक्रम, पाककलेच्या खाजगी शिकविण्या इत्यादी साधने उपलब्ध आहेत.

स्त्रिया घरकामाबरोबरच घरातली आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी शेती, शिवणकाम, मेणबत्त्या बनविणे, पापड लाटणे, बिडी वळणे, किराणा दुकान चालविणे, खानावळ चालविणे इत्यादी कुटुंबाच्या व्यवसायांमध्ये मदत करत आहेत; मात्र त्या बदल्यातला त्यांना मिळणारा मोबदला हा अदृष्य असतो. म्हणून तीने केलेल्या कामामुळे व कामातून निर्माण झालेल्या उत्पादनामुळे बाजारपेठेमधून मूल्य जरी मिळत असले, तरी त्या कामाकडे केवळ ‘घरात आणि फावल्या वेळात केली जाणारी कामे’ या दृष्टीकोनातून बघितले जाते. या प्रकारची कामे अदृश्य राहून स्त्रियांची ‘कामगार’ म्हणून नोंद होत नाही. जयती घोष यांच्या मते, घरादाराच्या चौकटीत जी आर्थिक उलाढाल होते, त्याचे मोजमाप किमान स्वरूपात केले जाते. त्याच प्रमाणे एखाद्या कामात स्त्रिया सहभागी होण्याच्या प्रमाणाचे मोजमापही योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या घरातील उत्पादित कामांचे अदृश्यीकरण होते.

घरकाम हे विनावेतन असते, तर त्याच कामाला घराबाहेर आर्थिक मोबदला दिला जातो. म्हणून बाहेर केलेले काम हे ‘काम’ या वर्गवारीमध्ये गणले जाते. घरकाम करणारी व्यक्ती आणि तिचे काम हे दोन्ही असंघटीत क्षेत्रामध्ये समाविष्ट केले जाते. जिथे कामगार कायद्यानुसार कोणतेही नियम लागू होत नाहीत. घरकामात कामाचे तास आणि वेतन निश्चित नसणे, रजा, पेन्शन यांची तरतूद नसणे, कायद्याचे कोणतेही संरक्षण नसणे इत्यादी बाबी दिसून येतात. असे जरी असले, तरी भारतात बहुसंख्य स्त्रिया घरकामगार म्हणून काम करताना दिसतात.

मार्क्सवादी स्त्रीवादाने १९७० च्या काळात घरकामाला दृश्यता येणे, त्याला दर्जा आणि वेतन मिळणे या दृष्टीकोनातून केलेली घरकामाविषयक चिकित्सक मांडणी महत्त्वाची आहे. त्या वेळी मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी घरकामाचा संबंध भांडवलशाहीशी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामध्ये पेगी नॉर्टन आणि मार्गारेट बेन्स्टन या दोन कॅनडीयन अभ्यासकांनी आपल्या निबंधात स्त्रियांचे जैविक पुनरुत्पादन व दैनंदिन पुनरुत्पादन, तसेच घरातील विनावेतनाच्या कामांमुळे स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दुय्यमत्त्वाची मांडणी केली होती. त्यामुळे घरकामावरील या चर्चेला १९७० च्या उत्तरार्धात ब्रिटनमध्ये विद्यापीठीय दर्जा प्राप्त झाला.

घरकाम करण्यासाठी नोकर नेमण्याची पद्धत राजे-महाराजे यांच्या काळापासून दिसून येते. सुरुवातीच्या टप्यावर श्रीमंत घरातील कुटुंबात घरकाम करण्यासाठी स्त्री-पुरुष नेमले जात असत; मात्र कालांतराने जसजसे औद्योगिकीकरण, शहरीकरण वाढत गेले, तसतसे मध्यम वर्गातही घरकाम करण्यासाठी स्त्री-पुरुष नेमण्याचे प्रमाणही  वाढत गेले. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदल झालेले दिसतात. त्यामुळे सामाजिक संरचनांमध्येही बदल झालेला दिसून येतो. त्याचा परिणाम म्हणून व्यक्तीचे जीवनमान, लिंगभावी नातेसंबंध आणि भूमिका यांमध्येही बदल घडून येत आहेत. सद्यस्थितीत स्त्रियांचे शिक्षण घेऊन नोकरी करण्याचे प्रमाण वाढत आहे; परंतु घरातील लिंगाधारित श्रमविभागणी बदलेली दिसत नाही. त्याचबरोबर असाही एक समूह मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसतो की, ज्यांच्याकडे शिक्षण आणि इतर कौशल्यांच्या अभावामुळे उपजीविकेसाठी साधन उपलब्ध नाही. ज्यामध्ये कनिष्ठ वर्गीय-जातीय लोकांसह स्त्रियांचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे शहरी भागांमध्ये असंख्य कनिष्ठ वर्गीय-जातीय स्त्रिया घरकामगार म्हणून काम करताना आढळून येतात. त्यामध्ये काही घरकामगार दिवसभरात सात-आठ तास घरी कामाला जातात, काही एकाच घरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत काम करून परत स्वतःच्या घरी जातात, तर काही घरमालकाच्या घरीच कायम स्वरूपी निवासी असतात. अश्या प्रकारे विविध प्रकारच्या श्रमांनी भरलेले हे क्षेत्र आहे.

भारतीय जनगणना, २००१ नुसार भारतामध्ये १२,४८,४७३ स्त्रिया घरकामगार म्हणून काम करीत होत्या. आज महाराष्ट्रातील घरकामगारांची संख्या सुमारे ४० लाख एवढी झाली आहे. घरकामाला दुय्यम दर्जा दिला गेला असून त्यास संघटीत क्षेत्रातील कामांइतके महत्त्व दिले गेल्याचे दिसत नाही. त्यामुळे घरकामगार स्त्रियांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यांच्या कामाचे स्वरूप आता फक्त धुणीभांडी, केर, फरशी पुसणे इतकेच मर्यादित न राहता त्यात अनेक कामांची भर पडलेली दिसते; मात्र त्या तुलनेत त्यांच्या वेतनात वाढ झाली नाही.

शासनाने २००८ मध्ये ‘घरेलू कामगार कायदा’ लागू केला; परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आजही घरकामगाराला कामाचे स्वरूप आणि तास यांनुसार वेतन मिळत नाही. त्यांची कामगार म्हणून दखल न घेतल्यामुळे ‘कामगार’ म्हणून दर्जा नाही; तसेच कामगार कायद्याचे संरक्षण नाही; त्याचप्रमाणे त्यांचे हक्कही नाकारले जातात. त्यामुळे पुणे शहर मोलकरीण संघटना, पुणे जिल्हा घरकामगार संघटना, महाराष्ट्र घरेलू कामगार संघटना, मोलकरीण पंचायत, तसेच विदर्भ मोलकरीण संघटना अशा विविध घरकामगार संघटना शासनापुढे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे यांद्वारे झटताना दिसून येत आहेत. घरकामगार स्त्रियांना ‘कामगार’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उदा., आठवड्यातून एक दिवस हक्काची रजा, किमान वेतन निश्चिती, दरवर्षी महागाईनुसार पगारवाढ, वर्षातून एकदा बोनस (एक पगार), आजारपणाची रजा, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिके प्रमाणे जीवननिर्वाह कार्ड, नोंदणी वयाची अट १८ ते ६५ वर्षे, नोंदणीसाठी प्रत्येक जिल्हा कामगार आयुक्तालयात पुरेसा कर्मचारी वर्ग व प्रभारी अधिकारी असावा, घर कामगारांसाठी कामगार न्यायालय, कामाच्या प्रकारनिहाय किमान वेतन निश्चिती, दर पाच वर्षांनी सर्वेक्षण, घर कामगारांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सामाजिक सुरक्षेंतर्गत आरोग्य विमा, वृद्धापकाळाची पेन्शन आणि त्रिपक्षीय प्रॉव्हिडंट फंड, प्रत्येक घरकामगाराला आरोग्य ओळखपत्र द्यावे इत्यादी.

आज स्त्रियांच्या घरकामाचे मोजमाप करण्यासाठी जगभरात ‘वेळ वापर सर्वेक्षण’ या पद्धतीचा वापर केला जात आहे. याद्वारे स्त्रियांनी घरातील वेतन आणि विनावेतन कामासाठी, तसेच घराबाहेरील वेतनीय व इतर कामांसाठी किती वेळ खर्च केला याचे मोजमाप केले जाते. त्यातून पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया वेतन आणि विनावेतनासाठीच्या कामामध्ये किती वेळ खर्च करतात, याची आकडेवारी मिळते. त्यावरून स्त्रिया कामासाठी खर्च करत असलेला वेळ आणि त्या तुलनेत त्यांना मिळणारे उत्पन्न यांतील तफावत निदर्शनास आणता येते. कामाचे मापन करण्यासाठी अभ्यासक स्त्री पुरुषांच्या एका दिवसातील, आठवड्यातील किंवा एका महिन्यातील याप्रकारे कामाच्या तासांचे मापन करतात. याच पद्धतीचा वापर करून ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को- ऑपरेशन अँड डेव्हलपमेन्ट’ या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार भारतातील स्त्रिया दर दिवसाला ३५२ मिनिटे घरगुती कामांवर खर्च करतात. पुरुषांच्या विनावेतनाच्या कामांच्या तुलनेत ५७७ टक्के अधिक वेळ स्त्रिया या कामांवर खर्च करत असतात. यावरून लक्षात येते की, स्त्रियांचा बराचसा वेळ घरातील विनामोबदला कामांमध्ये जात असतो. तरीही घरकामासारखे महत्त्वपूर्ण काम अदृश्य व दुय्यम दर्जाचे ठरविले जाते. याप्रकारे वेळ वापर सर्वेक्षण पद्धतीद्वारे स्त्रियांच्या कामाचे मोजमाप करून स्त्रियांच्या कामाला दृश्यता मिळवून देण्यासाठी, त्यांची कामगार म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी, तसेच अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान नोंदवण्यासाठी सांख्यिकीय नोंद होणे गरजेचे आहे व तसे प्रयत्न केले जात आहेत.

आज घरकामगारांच्या हितार्थ अनेक संघटना, अर्थतज्ज्ञ, स्त्री अभ्यासक, नियोजनकर्ते, धोरण निर्माते इत्यादी समाजसेवी झटत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी ‘घरकाम कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम’ हा अभ्यासक्रम राबवून या व्यवसायातील कौशल्य आणि घरकामाबद्दल शास्त्रीय दृष्टीकोन विकसित केला आहे. घरकामगारांना घरकामासाठी योग्य वेतन मिळणे, कामगार म्हणून ओळख मिळणे आणि मानवी प्रतिष्ठा मिळवून देणे हे मानवहितासाठी व मानवतेसाठी अत्यंत गरजेचे आहे.

संदर्भ :

  • देहाडराय, स्वाती; तांबे, अनघा (संपा.), स्त्रिया, श्रम आणि अर्थकारण, पुणे, २०११.
  • Deshmukh Randive, J., Spaces for Power : Women’s Work and Family Strategies in South and South-East Asia, Noida, 2002.
  • Ghosh, J, Conceptual Issues in Assessing Women’s Work, In Never Done and Poorly Paid : Women’s Work in Globalising India, New Delhi, 2009.
  • Gole, Sneha; Roy-Choudhury, Sugeeta, Making Familial Spaces : Lives, Labour and Desires, Pune, 2011.
  • Gothoskar, S., New initiatives in organizing strategy in the informal economy : Case study of domestic workers organizing, 2005.
  • Naila Kabeer; Ramya, S. (eds.), Institutions, Relations and Outcomes, New Delhi, 1999.
  • Mahanta, Upasana; Indranath Gupta, Recognition of the Rights of Domestic Workers in India : Challenges and the Way Forward, Springer, 2019.
  • Mies, Maria and others, Women : The last colony, 1988.
  • Raghuram, Parvati, Caste and gender in the organisation of paid domestic work in India, 2001.
  • Shirlena, Huang; Kanchana N. Ruwanpura, Handbook on Gender in Asia, 2020.

समीक्षक : वैशाली दिवाकर