प्रस्तावना : सामाजिक आरोग्य परिचर्येमध्ये कौटुंबिक आरोग्य सेवा हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक समाजात किंवा देशात कुटुंब व्यवस्था ही स्थळ आणि वेळ याप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक कुटुंब हे समाजाचा अविभाज्य घटक असतो. त्याच्या पद्धती, संरचना व प्रकार याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होत असतो व त्याचा जाणतेपणी अथवा अजाणतेपणी समाजाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

कुटुंब आरोग्य सेवेचे हेतू :

१. आजारांपासून संरक्षण                   २. जीवनमान वाढविणे

३. आरोग्य संवर्धन करणे                   ४. कुटुंबाची कार्यक्षमता वाढविणे

कौटुंबिक परिचर्येचे हेतू (Family Nursing Care) :

 • उत्तम आरोग्याचा दर्जा राखण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, संवर्धनात्मक व पुनर्वसनात्मक सेवा पुरविण्यासाठी मदत करणे.
 • कुटुंबातील सदस्यांना आरोग्य समस्या व गरजा स्वतंत्रपणे पूर्ण करण्याची क्षमता वाढविण्यासाठी मदत करणे.
 • कुटुंबातील आरोग्यासाठी जोखमीचे घटक ओळखून सदस्यांच्या सहभागाने आरोग्य सेवेचे नियोजन करणे.

कौटुंबिक परिचर्येची उद्दिष्ट्ये :

 • कुटुंबातील विविध वयोगटातील सदस्यांच्या आरोग्याच्या गरजा ओळखणे.
 • पुरविण्यात आलेल्या आरोग्यसेवांची प्राधान्यता व उपयोगिता तपासून पाहणे.
 • ज्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही किंवा घेता येत नाही अशा व्यक्तींचा शोध घेणे.
 • कुटुंबात आजाराचा प्रसार होण्याची कारणे शोधणे.
 • उत्तम आरोग्य सेवा मिळविण्यासाठी नियोजन करणे.
 • सदस्यांना आरोग्यातील समस्या व रोग्याच्या गरजा यांची जाणीव कुटुंब प्रमुखास करून देणे.
 • आरोग्य सेवांमध्ये कुटुंबातील व्यक्तीला सहभागी करणे.
 • आरोग्य शिक्षणाचे धडे देऊन प्रेरणा देणे.
 • आरोग्य संवर्धनासाठी सुरक्षित, सांस्कृतिक प्रथा, रूढी परंपरांचेच पालन करण्यासाठी आग्रह धरणे.

कुटुंब आरोग्य सेवेसाठी तत्त्वे :

 • कुटुंबातील सदस्याबरोबर चांगले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आरोग्य सेवेसाठी मदत करणे.
 • सेवा देण्यापूर्वी खालील सर्वसाधारण माहिती जाणून घ्यावी. जसे की कुटुंबाचा आकार (सदस्य संख्या), कुटुंबाचा प्रकार (विभिन्न – एकत्र पध्दती), शैक्षणिक, धर्म-जात, प्रमुख व्यवसाय इ.
 • कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य समस्या प्राधान्यक्रमाने समजुन घेणे.
 • कुटुंबातील प्रमुख व्यक्तीबरोबर आरोग्य समस्येवरती चर्चा करणे व त्यांचे त्यावरील उपाययोजने विषयीचे विचार किंवा निर्णय जाणून घेणे.
 • उपाययोजनेविषयी आवश्यक ती माहिती पुरविणे.
 • कुटुंबास आरोग्य संवर्धनासाठी आत्मनिर्भर बनविणे.
 • आरोग्य सेवा देण्यासाठी गृहभेटी देतांना आवश्यकतेनुसार आरोग्य शिक्षण देण्याचे नियोजन करणे.

कुटुंब आरोग्य परिचर्या संदर्भातील तत्त्वे :

 • कुटुंब हा आरोग्य सेवा देण्याचा मूलभूत घटक समजावा.
 • कुटुंब सेवा प्रदान करण्यात व्यावसायिकता सांभाळावी.
 • कुटुंबातील सदस्यांचा आदर करून संभाषण करणे.
 • आरोग्य समस्या ऐकून घेऊन सहानुभूतीपूर्वक वागावे.
 • आरोग्याच्या गरजा पूर्ण करतांना त्यांच्या संस्कृतीचा आदर करावा.
 • समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदस्यांचा दृष्टीकोन जाणावा.
 • सामाजिक आरोग्य परिचर्येची उद्दिष्टे व कुटुंब आरोग्य सेवेचे ज्ञान असावे.
 • वास्तवतावादी सेवा देण्याचा प्रयत्न करावा ज्यामध्ये आरोग्य समस्येचे स्वरूप, त्यासाठी उपलब्ध सेवा, लागणारा खर्च इ. गोष्टींची कुटुंबास माहिती द्यावी.
 • आरोग्य सेवेविषयी निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा कुटुंबाचा आहे हे लक्षात घ्यावे व त्यांचा त्यात सहभाग असावा.
 • कुटुंब आरोग्य सेवा ही सातत्यपूर्ण/निरंतर असावी.
 • समाजशास्त्राचे ज्ञान असावे ज्यायोगे कौटुंबिक पार्श्वभूमी समजून कुटुंब कल्याणाच्या आरोग्यसेवा देता येतील.
 • आरोग्य सेवा देताना जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा भेद नसावा.
 • दिलेल्या आरोग्य सेवेचे नियमित मूल्यमापन करावे.
 • समुपदेशन व आरोग्य शिक्षण याचा उपयोग करून कुटुंब सदस्यांना मार्गदर्शन करावे.
 • कुटुंब सदस्यांच्या सहकार्याने कौटुंबिक परिचर्या देण्याचा प्रयत्न करावा.

 

संदर्भ :

 • Spradley, Barbara, Community Health Nursing : Concept and Practice, 1995.