प्रस्तावना : समाजशास्त्र म्हणजे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. समाजशास्त्र हे व्यक्ती व त्याच्या सभोवतालचे वातावरण याचा अभ्यास करते. परिचारिका व्यक्तीच्या आरोग्यासाठी सेवा देते. त्या देताना प्रत्येक व्यक्ती ही समाजाचा एक घटक व त्याचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याचा परिचर्येमध्ये अंतर्भाव केला जातो. तसेच परिचारिका किंवा परिचारक हे सुद्धा समाजाचे एक घटक असतात. त्यामुळे आरोग्य सेवा देताना त्याचा परस्पर संबंध लक्षात घेणे जरूरी आहे. या पार्श्वभूमीवरती परिचर्येच्या प्रत्येक शिक्षणक्रमात व प्रशिक्षणामध्ये समाजशास्त्र विषयाचा अंतर्भाव केलेला आहे.

परिचर्या व समाज : परिचारिका आरोग्य सेवा देताना महत्त्वाचा वाटा उचलतात. परिचारिका ह्या आपल्या सेवेतून प्रत्येक व्यक्ती ही समाजाचा एक घटक म्हणुन त्याकडे बघतात.

 • परिचारिका सेवा देताना त्यांचे सहकारी, डॉक्टर, तंत्रज्ञ व आजारी किंवा निरोगी व्यक्ती यांचेशी त्यांचा अगदी जवळुन संबंध येतो. ह्या सर्व व्यक्ती समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या असतात.
 • प्रत्येक व्यक्तीचे निरोगीपण व आजार होण्याची स्थिती ह्या त्या त्या समाजातील कुटुंबव्यवस्था भौगोलिकता, सरकारी व खाजगी आरोग्य यंत्रणा यावर अवलंबून असते. या महत्त्वाच्या सामाजिक घटकांचे ज्ञान परिचारिकेला असणे गरजेचे असते.
 • परिचारिका आरोग्य सेवा देताना समाजातील प्राथमिक समुह उदा., कुटुंब, त्यांचे शेजारी यांचेशी सहयोग करून जास्तीत जास्त व्यक्तीभिमुख सेवा पुरवितात.
 • समाजातील दुय्यम समुह किंवा गट जसे, शाळा, कॉलेज, कार्यालये अथवा कारखाने व त्यात काम करणाऱ्या व्यक्ती यांची गुणवैशिष्टे, होणारे सर्वसाधारण आजार आणि त्यांचा प्रतिबंध कसा करावा यासाठी सेवा पुरवितात.
 • आरोग्य सेवा देताना परिचारिका ह्या आरोग्याच्या गरजा वैयक्तिक स्तर (एका व्यक्तीसाठी), कौटुंबिक गरजा व सर्व सामाजिक गरजा यांचा विचार करतात व पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा शुश्रूषा ह्या सर्वंकश कशा होतील याचा विचार समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून करतात.
 • परिचारिकेला रुग्णसेवा करण्यासाठी त्या रुग्णाची सामाजिक पार्श्वभूमी समजल्यामुळे त्याच्या आजाराचा संदर्भ समजुन शुश्रूषा करण्यास मदत होते.
 • आजारी व्यक्ती दवाखान्यात दाखल असताना त्याची वागणुक व झालेला आजार व आरोग्य सवयी समजुन परिचर्येची आखणी करता येते.
 • रुग्ण घरी जाताना त्याला द्यावयाचे आरोग्य शिक्षण ही परिचारिकेची महत्त्वाची जबाबदारी असते. त्याकरिता त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, राहणीमान यांचा विचार करून पुढील उपचार व उपाययोजना आरोग्य शिक्षणात समाविष्ट करता येतात.
 • एखाद्या व्यक्तीला आजारपणानंतर पुनर्वसन करण्यासाठी परिचारिका ही त्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक घटकांचा विचार करू शकते व त्याप्रमाणे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करून स्वावलंबी बनविण्यास मदत करणे.
 • आजारी व्यक्ती किंवा निरोगी व्यक्ती ही त्याच्या आरोग्याविषयी किंवा आरोग्याच्या समस्येविषयी कसा स्विकार करते, त्याचा दृष्टीकोन कसा असू शकतो वगैरे गोष्टी समाजशास्त्राच्या मदतीने परिचारिका समजुन घेते.
 • परिचारिका समाजशास्त्राच्या अभ्यासातून विविध लोकांशी संभाषण चातुर्य, सहकार्यभाव व विशिष्ट कौशल्ये अंगिकारू शकते. विशेषतः याचा उपयोग आदिवासी किंवा इतर मागास समाजातील रुग्णांना सेवा पुरविताना करता येतो.
 • परिचारिका ह्या समाजातील गरजेप्रमाणे लोकांना सेवा पुरविणारा महत्त्वाचा घटक म्हणुन कार्यरत राहण्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यास हा महत्त्वाचा असून पूरक ठरतो.
 • समाजातील बदलांप्रमाणे सेवा देण्याचे शास्त्र आत्मसात करणे हे परिचर्येचे गमक असते.

संदर्भ  :

 • के. पी. निरजा, समाजशास्त्र – पाठ‌्यपुस्तक,  २०१०.
 • डी. आर. सचदेवा, समाजशास्त्राची तोंडओळख , २०१४.