सेनगुप्त, नरेश्चंद्र : (३ मे १८८२ – १९ सप्टेंबर १९६४). विख्यात बंगाली साहित्यिक. जन्म बोग्रा येथे. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान विषयातील एम्. ए.  ही पदवी १९०३ मध्ये प्राप्त केली. नंतर शासकीय शिष्यवृत्ती मिळवून प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांनी नवजर्मन व भारतीय तत्त्वज्ञान या विषयांत १९०५ पर्यंत संशोधन केले. कायदा विषयाची पदवी मिळवून त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला आणि त्याच काळात कोलकाता विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात अध्यापनही केले. १९१४ मध्ये त्यांना त्यांच्या ‘प्राचीन भारतातील समाज व सामाजिक प्रथा’ या विषयातील संशोधनाबद्दल डीएल्. ही पदवी मिळाली. १९१७ मध्ये त्यांची डाक्का (ढाका) विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली. डाक्का विद्यापीठाच्या विधी विभागात प्राध्यापक म्हणून त्यांनी १९२१–२४ या काळात अध्यापन केले. तसेच विधी विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर अल्पावधीतच ते कोलकाता येथे उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी परतले. १९५० मध्ये कोलकाता विद्यापीठात ‘टागोर’ विधी प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि १९५६ मध्ये भारतीय विधी आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. निष्णात विधिज्ञ असा त्यांचा लौकिक सर्वदूर होता. १९५१ मध्ये यूनेस्कोतर्फे अमेरिकेतील एका चर्चासत्रात भाग घेण्यासाठी कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे इव्होल्यूशन ऑफ लॉ  हे पुस्तक एक मान्यताप्राप्त ग्रंथ म्हणून नावाजले गेले आहे.

सेनगुप्त हे बंगाली साहित्यातील वास्तववादी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. ढाका येथे असताना त्यांनी एका नव्या वाङ्‌मयीन चळवळीचे बीजारोपण केले. बंगाली साहित्यात ही चळवळ प्रगतिवादी म्हणून ओळखली जाते. कथासंग्रह, कादंबऱ्या, नाटके, निबंध व लेखसंग्रह अशा विविध प्रकारची त्यांची एकूण साठ पुस्तके प्रकाशित झाली. द्वितीय पक्ष (१९१९, म. शी. ‘दुसरी पत्नी’) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. या संग्रहातील ‘ठानदिदी’ (म.शी. ‘आजी’) ही कथा नारायण या मासिकात १९१८ साली प्रथम प्रसिद्ध झाली व असभ्यतेच्या कारणास्तव टीकास्पद ठरली. साहित्यातील सभ्यता व नैतिकता यांचा भंग केल्याच्या आरोपावरून त्या काळी झालेल्या वादाच्या ते केंद्रस्थानी राहिले व त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. नंतर त्यांनी शुभा (१९२०) व शास्ति (१९२१) या कादंबऱ्या लिहिल्या. त्यांत स्त्रीपुरुषांतील लैंगिकतेसंबंधी काही नव्या असांकेतिक कल्पना धुसर, अस्पष्ट स्वरूपात मांडल्या होत्या. त्यामुळे दुखावलेल्या काही जुन्या परंपरावादी समीक्षकांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांची नंतरची कादंबरी पापेर छाप (१९२२, म. शी. ‘पापाचा ठसा’) ही प्रथमतः मेघनाद  या शीर्षकाने क्रमशः प्रसिद्ध झाली होती. या कादंबरीत स्त्रीपुरुषांतील लैंगिक संबंध व गुन्हेगारी वृत्ती यांविषयी त्यांनी अधिक मोकळेपणाने व धीटपणाने लिहिले आहे ; पण नंतरच्या काळात मात्र तत्कालीन बंगाली कादंबरीकारांच्या लोकमान्य, चाकोरीबद्ध व रूढ मळवाटेने जाऊन त्यांनी लेखन केले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय साहित्यात तरुणी भार्या, रक्तेर ऋण, स्त्री भाग्ये, अग्निसंस्कार (१९१९), अभयेर बिये (१९५७) इ. कादंबऱ्या आनंद मंदिर (१९२३), ठाकेर मेला (१९२५) इ. नाटके रूपेर अभिशाप  इ. कथासंग्रह यांचा समावेश होतो. बेसिक ऑफ सेल्फ रूल इन इंडिया  हा इंग्रजी ग्रंथ त्यांनी लिहिला. तसेच बंकिमचंद्र चतर्जींच्या आनंदमठ (१८८२) या बंगाली कादंबरीचे ॲबी ऑफ ब्लिस  या शीर्षकाने इंग्रजी भाषांतर केले. शुभा, पापेर छाप  व अभयेर बिये  या कादंबऱ्यांतून त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक समस्या हाताळल्या. अनेक वर्षांचा वकिलीव्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी आपल्या लिखाणातून गुन्हेगारी जग व गुन्हेगाराची मनोविकृती यांचे, तसेच लैंगिक वासनांचे वास्तव चित्रण केले. बंगाली साहित्यातील नैसर्गिक वास्तववादी प्रवाहाचे ते आद्य प्रवर्तक मानले जातात. त्यांनी ज्या प्रगतिवादी लेखकसंघाचे नेतृत्व केले, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे टागोरांचे साहित्य व त्यांची वाङ्‌मयीन भूमिका नाकारण्याची बंडखोरी होय. टागोरांची भूमिका पारंपरिक देशीवादी होती व प्रगतिवादी लेखकसंघ आधुनिक यूरोपीय साहित्याने भारावलेला होता. टागोरांनी ‘साहित्येर धर्म’ हा निबंध (विचित्रा, जुलै १९२८) लिहून आपल्या भूमिकेचे समर्थन केले. सेनगुप्त यांनी प्रत्युत्तरादाखल ‘साहित्य धर्मेर सीमाना’ (म. शी. ‘साहित्यधर्माची मर्यादा’ विचित्रा, ऑगस्ट १९२८) हा निबंध लिहून टागोरांच्या भूमिकेचा प्रतिवाद केला व आपली वेगळी भूमिका मांडली. १९३६ मध्ये अखिल भारतीय प्रागतिक लेखक संघटनेची स्थापना झाली. तिचे ते अध्यक्ष होते. बंगाली साहित्यात प्रागतिक विचारसरणी व नवा दृष्टिकोण रुजविण्यात या संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली.

सेनगुप्त हे काही काळ राजकारणातही सक्रिय होते. बंगालच्या फाळणीच्या विरोधी आंदोलनकाळात (१९०५–१२) ते काँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते होते. नंतरच्या काळात त्यांनी शेतकरी–कामगार पक्षाचे अध्यक्ष (१९२५–२६) व भारतीय मजूर पक्षाचे अध्यक्ष (१९३४) म्हणूनही काम केले.

संदर्भ :

  • http://en.banglapedia.org/index.php?title=Sengupta,_Naresh_Chandra

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.