शशी कपूर : (१८ मार्च १९३८ – ४ डिसेंबर २०१७). हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते. त्यांचे मूळ नाव बलबीर राज होय. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि मातोश्री रामसरनी कपूर. चित्रपट व नाट्यकलेशी निगडीत असणाऱ्या नामांकित कपूर घराण्यात जन्म झाल्यामुळे अभिनयकलेचा व चित्रपटाचा समृद्ध वारसा शशी कपूर यांनाही लाभला. माटुंगा, मुंबई येथील ‘डॉन बॉस्को’ हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. १९४८ च्या राज कपूरनिर्मित आणि दिग्दर्शित आग या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका करून त्यांनी चित्रपटांत पदार्पण केले. त्यानंतरच्या १९५१ मध्ये आलेल्या आवारा या चित्रपटात त्यांनी त्यांच्या जेष्ठ बंधूची, राज कपूर यांची कुमारावस्थेतील भूमिका वठवली. १९५४ पर्यंत त्यांनी बालकलाकार म्हणून काही चित्रपटांत कामे केली. त्यानंतर ते त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर या रंगभूमीशी निगडीत मंडळाशी जोडले गेले.

ख्यातनाम अभिनेते सुनील दत्त यांच्या पदार्पणाचा पहिला चित्रपट असलेल्या पोस्ट बॉक्स ९९९ या चित्रपटासाठी शशी कपूर यांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. त्यानंतर १९६१ पर्यंत गेस्ट हाउस, दुल्हा-दुल्हन, श्रीमान सत्यवादी यांसारख्या चित्रपटांतून साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते कार्यरत राहिले. १९६१ सालच्या यश चोप्रा दिग्दर्शित बी. आर. चोप्रा निर्मित धर्मपुत्र या चित्रपटातून त्यांनी नायकाच्या भूमिकेत पदार्पण केले. त्यानंतर तब्बल एकशे सोळा हिंदी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. पैकी ६१ चित्रपटांतून ते नायकाच्या भूमिकेत चमकले. द हाउसहोल्डर, शेक्सपिअर वाला, प्रेटी पॉलीसारख्या काही इंग्रजी चित्रपटांतूनदेखील त्यांनी विविध भूमिका साकारल्या. साठच्या दशकात नंदा या अभिनेत्रीसोबत त्यांची रुपेरी जोडी जमली. ज्यामुळे त्यांची कारकीर्द बहरली. पैकी चार दिवारी आणि मेहंदी लगी मेरे हाथ हे सुरुवातीचे चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरले, तर मोहब्बत इसको कहते है, नींद हमारी ख्वाब तुम्हारे, रुठा ना करो या चित्रपटांना साधारण स्वरूपाचे यश मिळाले. सूरज प्रकाश दिग्दर्शित जब जब फुल खिले या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी यशाने शशी कपूर ‘स्टार’ म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला अनेक प्रमुख अभिनेत्यांना (मल्टीस्टारकास्ट) घेऊन बनविलेला चित्रपट, यश चोप्रा दिग्दर्शित वक्त या यशस्वी चित्रपटातही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली. सत्तरच्या दशकात शशी कपूर यांच्या कारकीर्दीने चांगले वळण घेतले. काही चित्रपटांत नायक तर काही चित्रपटांत एक सहनायक अशी त्यांची वाटचाल सुरू झाली. या काळात त्यांनी आशा पारेख, राखी, शर्मिला टागोर, मुमताज, रेखा, हेमा मालिनी, झीनत अमान, शबाना आझमी, परवीन बॉबी, रीना रॉय, नीतू सिंह, मोसमी चटर्जी, सुलक्षणा पंडित अशा आघाडीच्या अभिनेत्रींसोबत भूमिका साकारल्या. १९७५ च्या गुलशन राॅय निर्मित, यश चोप्रा दिग्दर्शित आणि सलीम जावेद लिखित दीवार या हिंदी चित्रसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टर रवी ही विशेष भूमिका साकारली. विजय या अमिताभ बच्चन यांनी गाजवलेल्या प्रमुख पात्राच्या, परिस्थितीने गुन्हेगारी जगताकडे वळलेल्या युवकाच्या लहान भावाची तितकीच तोलामोलाची पण विरुद्धांगी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन या जोडीने रोटी कपडा और मकान, कभी कभी, सुहाग,शान,नमक हलाल, दो और दो पाच, सिलसिला, इमान धरम, त्रिशूल, काला पत्थर, अकेला अशा एकूण बारा चित्रपटांत एकत्र काम केले. शशी कपूर यांनी तत्कालीन लोकप्रिय मनोरंजक चित्रपटांचे दिग्दर्शक उदा., राज कपूर, नासिर हुसेन, यश चोप्रा, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, शक्ती सामंत, मनोजकुमार, ब्रीज सदनाह, सुभाष घई, सी. पी. दीक्षित, अनिल गांगुली, दुलाल गुहा यांच्या चित्रपटांतून भूमिका साकारल्या.

शशी कपूर हे केवळ एक चांगले अभिनेतेच नव्हते, तर एक व्यासंगी आणि कलासक्त, विद्वत व्यक्तिमत्त्व होते. स्वतःच्या ‘फिल्मवालाज’ या चित्रपट निर्मितीसंस्थेद्वारे त्यांनी आशयघन आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांपैकी १९७८ च्या शाम बेनेगल दिग्दर्शित जुनून या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर कलयुग या १९८१ मधील त्यांच्या निर्मितीस त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. त्यांनी निर्मिलेल्या १९८४ च्या उत्सव या, प्राचीन संस्कृत नाटककार शूद्रक यांच्या मृच्छकटिक या नाटकावर आधारित वेगळी वाट चोखाळणाऱ्या, चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे कलादिग्दर्शन नचिकेत व जयू पटवर्धन या जोडीने, तर दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केले होते. परंतु, दुर्दैवाने या निराळ्या प्रयोगाला अपयश पाहावे लागले. परिणामी शशी कपूर यांना त्याकाळी बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आपल्या ‘फिल्मवालाज’ या बॅनरखाली त्यांनी विजेता या चित्रपटाचीही निर्मिती केली.

कारकीर्दीच्या उत्तरार्धात शशी कपूर यांनी १९८६ च्या न्यू दिल्ली टाईम्स यासारख्या समीक्षकांनी नावाजलेल्या वेगळ्या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. पत्रकारिता, जनसंपर्क माध्यमे आणि राजकारण यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार या वेगळ्या विषयावर स्पष्ट भाष्य करणारा हा चित्रपट सुरुवातीला वितरक आणि दूरदर्शन या दोहोंनीही प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. गुलजार लिखित आणि रमेश शर्मा दिग्दर्शित या धाडसी चित्रपटात शशी कपूर यांनी पत्रकाराच्या प्रमुख भूमिकेत आपले विशेष अभिनय कौशल्य दाखवले. या चित्रपटात त्यांच्यासोबतच शर्मिला टागोर, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, मनोहर सिंह या दिग्गज कलाकारांच्याही भूमिका आहेत.

१९९१ साली सोविएत रशियातील चित्रपटकर्ते गेनाडी वासिलएव यांच्या सहदिग्दर्शनात शशी कपूर यांनी अजूबा हा अतिभव्य फॅन्टसी चित्रपट निर्माण केला. अरेबियन लोककथेवर आधारित ह्या चित्रपटाची रशियामध्ये दोन भागात निर्मिती झाली. दुर्दैवाने या चित्रपटास म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. दिग्दर्शक म्हणून शशी कपूर यांचा हा एकमेव चित्रपट होय.

१९५६ साली कोलकाता येथे पृथ्वी थिएटरचे प्रतिनिधित्व करत असताना, शेक्सपिरिअन मंडळाच्या जेफ्री केंडल यांच्या जेनिफर या कन्येशी शाशी कपूर यांचे प्रेमसंबंध जुळले. काहीशा विरोधानंतर १९७८ साली त्यांनी विवाह केला. त्यांना एकूण तीन अपत्ये. त्यांच्या कुणाल व करण या मुलांनी काही हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या. तर कन्या संजना कपूर यांनी पृथ्वी थिएटरची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली व आजही ती त्या समर्थपणे सांभाळत आहेत. १९८४ साली जेनिफर यांचे कर्करोगाने निधन झाले. या घटनेने शशी कपूर निराशेच्या गर्तेत ढकलले गेले.

पिता पृथ्वीराज कपूर यांच्या स्मरणार्थ शशी कपूर यांनी जुहू येथे दर्जेदार नाटकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सत्तरच्या दशकात ‘पृथ्वी थिएटर’ची स्थापना केली. मुंबईतील एक प्रतिष्ठित असे ते नाट्यगृह आहे. १९९८ साली जिन्नाह आणि साईड स्ट्रीटस् या आंतरराष्ट्रीय चित्रपटात भूमिका केल्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट जीवनातून निवृत्ती घेतली. २०१० च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. २०१५ साली शासनाने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. भारत सरकारने २०११ साली पद्मभूषण या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा सन्मान केला.

शशी कपूर यांना अखेरच्या काळात यकृताच्या विकाराने ग्रासले. त्यांचे याच विकाराने मुंबईत निधन झाले.

समीक्षण : दिलीप ठाकूर