मीनाकुमारी : (१ ऑगस्ट १९३३ – ३१ मार्च १९७२). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. त्यांचा जन्म दादर, मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अली बक्श आणि आई प्रभावती देवी (लग्नानंतर इकबाल बानो). मीनाकुमारी हे या दांपत्याचे तिसरे अपत्य. त्यांनी त्यांचे नाव महजबी बानो असे ठेवले. अली बक्श पारशी रंगभूमीवर काम करीत. त्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे मीनाकुमारींना शालेय शिक्षण घेता आले नाही आणि चित्रपटात काम करण्यास सुरुवात करावी लागली. मात्र चित्रपटात काम करू लागल्यावर जुजबी लिहिण्यावाचण्याचे शिक्षण त्यांना घरी देण्यात आले. छोट्या महजबीला विजय भट्ट यांच्या लेदरफेस  या चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली (१९३९). पुढे भट्ट यांच्याच एक ही भूल  या चित्रपटातही काम मिळाले (१९४०). त्यावेळी त्यांनीच महजबीचे नामकरण बेबी मीना असे केले. १९४६च्या बच्चों का खेल  या चित्रपटातून त्यांना मीनाकुमारी म्हणून ओळख मिळाली. त्यावेळी त्या तेरा वर्षांच्या होत्या. या चित्रपटामुळे त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यानंतर मीनाकुमारींना अनेक चित्रपट मिळाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी हनुमान पाताल विजय, श्री गणेश महिमा, वीर घटोत्कच अशा पौराणिक चित्रपटांतून कामे केली.

१९५२च्या बैजू बावरा  चित्रपटाने मीनाकुमारींचा चित्रपट प्रवास बहरला. यातील ‘गौरी’ या भूमिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. हा चित्रपट तब्बल शंभर आठवडे चालला. याच चित्रपटासाठी १९५४मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री आहेत. दायरा, दो बीघा जमीन, परिणीता  हे १९५३ साली प्रदर्शित झालेले मीनाकुमारींचे चित्रपट आहेत. सामान्य महिलांचा रोजच्या जगण्यातील संघर्ष त्यांनी परिणीतामधून लीलया साकारला. त्यांची खास अभिनयशैली आणि साजेसा आवाज यामुळे भूमिकेचे सोने होत होते. या चित्रपटाकरिता सलग दुसऱ्यांदा मीनाकुमारींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले.

१९५४ ते १९५६ या कालावधीत मीनाकुमारींनी विविधांगी भूमिका साकारल्या. समाजातील कुप्रथांवर प्रहार करणारी स्त्री त्यांनीचाँदनी चौक (१९५४), एक ही रास्ता (१९५६) या चित्रपटांतून साकारली. अद्ल-ए-जहांगीर (१९५५), हलाकू (१९५६) या चित्रपटांतील भूमिकाही वेगळ्या ढंगाच्या होत्या. १९५५च्याआजाद  या विनोदी चित्रपटामुळे अभिनेत्री म्हणून त्यांच्या कारकीर्दीस वेगळे वळण मिळाले. दिलीपकुमार आणि मीनाकुमारी या दोघांनी यात विनोदाची झालर असलेली भूमिका साकारली. या चित्रपटातील ‘अपलम चपलम’, ‘राधा ना बोले ना बोले’ ही गाणी चांगलीच गाजली.

१९५७ला दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांच्या मिस मेरी आणि शारदा  या चित्रपटांतून मीनाकुमारींचे दर्शन घडले. मिस मेरीमध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते शिवाजी गणेशन आणि किशोरकुमार यांच्यासोबत मीनाकुमारींनी काम केले. शारदाने खऱ्या अर्थाने मीनाकुमारींवर भारतीय चित्रपटांची ट्रॅजिडी क्वीन म्हणून शिक्कामोर्तब केले. यात त्यांनी अभिनेता राज कपूर यांच्यासोबत पहिल्यांदाच काम केले. प्रियकराचीच सावत्र आई होण्याचे दुर्दैव नायिकेच्या नशिबी येते. यातून होणारी तिची घुसमट, परिस्थिती सांभाळून घेण्याचा तिचा प्रयत्न इत्यादी भावच्छटा मीनाकुमारींनी शारदामध्ये ताकदीने साकारल्या. या चित्रपटासाठी त्यांना बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

१९५१ साली तमाशा  या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान मीनाकुमारींची प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी भेट झाली.  दरम्यान २१ मे १९५१ रोजी मीनाकुमारींचा महाबळेश्वर येथे अपघात झाला. यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी कायमस्वरूपी वाकली. या आजारपणात मीनाकुमारी आणि अमरोही या दोघांतील संपर्क वाढून त्याची परिणती त्यांच्या प्रेमविवाहात झाली (१४ फेब्रुवारी १९५२). मात्र, १९६४ च्या सुमारास हे दोघे वेगळे झाले. १९६२ मध्ये मीनाकुमारींचा साहिब, बीबी और गुलाम  हा चित्रपट आला. यात त्यांनी जमीनदार घराण्यातील सुनेची भूमिका केलेली होती, की जी पतीच्या प्रेमाखातर व्यसनाच्या आहारी जाते. या भूमिकेकरिता त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर चित्रपट पाकिजा  याची सुरुवात मीनाकुमारींना घेऊन अमरोही यांनी केली होती. मात्र, दोघांतील दुराव्यामुळे अमरोही यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले होते. दीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट बनला (१९७२). यामध्ये मीनाकुमारींनी एक कोठ्यावर जन्मलेली नर्तकी साहिबजान ही भूमिका केली होती. तिला या व्यवसायातून बाहेर पडण्याची संधी प्रियकराच्या रूपाने मिळते, मात्र ते शक्य होत नाही. ही होणारी घुसमट त्यांनी या चित्रपटात प्रभावीपणे साकारली.

सौंदर्य आणि कलेचा उत्कृष्ट मिलाफ म्हणून मीनाकुमारी यांना ओळखले जाते. प्रत्येक भूमिका समरसून करणे हे मीनाकुमारींचे अभिनयवैशिष्ट्य होते. अनेक कलाकृती त्यांच्या अभिनयामुळे गाजल्या. जेवढी अभिनयात सरसता, तेवढ्याच त्या नृत्यातही निपुण होत्या. त्याची झलक पाकिजामध्ये दिसलीच. ‘चलते चलते यूं ही कोई मिल गया…’ या गाण्यातील मुद्राभिनय अन् पदलालित्य लाजवाब आहे. केवळ शोकांत भूमिकाच नाही, तर विनोदी भूमिकाही आपण ताकदीने साकारू शकतो, हेही त्यांनी दाखवून दिले.

मीनाकुमारी यांना काजल  या चित्रपटाकरिता १९६५ मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनने शारदा  या चित्रपटाशिवाय १९६३ साली आरती, १९६५ साली दिल एक मंदिर  याही चित्रपटांकरिता सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून त्यांना गौरविले.

सत्तरीच्या दशकात मीनाकुमारींची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना मुंबईच्या सेंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यापूर्वी त्यांनी आपल्या बहुतांश चित्रपटांचे अर्धवट राहिलेले चित्रीकरण पूर्ण केले होते. अपवाद फक्त दुश्मन  या चित्रपटाचा होता. आजारपणात त्यांनी तो चित्रपट पूर्ण केला. हाच त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. त्यांचे मुंबई येथे निधन झाले. मीनाकुमारींचा चरित्रपट असलेले पुस्तक मीना कुमारी – द क्लासिक बायोग्राफी  हे विनोद मेहता यांनी १९७२ साली लिहिले. त्याची सुधारित आवृत्ती २०१३ साली प्रकाशित केली गेली. भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ २०११ मध्ये एक विशेष टपाल तिकिट प्रसारित केले. मीनाकुमारी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच संवेदनशील कवयित्री अन् पार्श्वगायिकाही होत्या. मात्र, त्यांनी आपल्या कविता अप्रकाशितच ठेवल्या. त्यांनी ‘नाज’ या टोपणनावाने काही उर्दू कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांचा संग्रह नंतर तनहा चाँद  या नावाने प्रकाशित झाला. शोकात्म चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर आहेत. मीनाकुमारींना भारतीय सिनेमाची ट्रॅजिडी क्वीन म्हटले जाते. १९३९ ते १९७२ या ३३ वर्षांच्या काळात मीनाकुमारींनी आपल्या अदाकारीने भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली.

https://www.youtube.com/watch?v=0R04XbzDNjU

समीक्षक – संतोष पाठारे

#शारदा_चित्रपट #पाकिजा_चित्रपट


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.