दत्त, नर्गिस : ( १ जून १९२९ – ३ मे १९८१ ). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहनबाबू. त्यांची आई जद्दनबाई या उत्कृष्ट गायिका, निर्मात्या आणि संगीतकार होत्या. नर्गिस यांचे मूळ नाव फातिमा अब्दुल रशीद. वयाच्या पाचव्या वर्षी जद्दनबाई यांची निर्मिती असलेल्या तलाश-ए-हक़ (१९३५) या चित्रपटामधून नर्गिस यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

१९४३ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मेहबूब खान यांनी नर्गिस यांना तकदीर या चित्रपटातील प्रमुख भूमिकेकरिता निवडले. त्यावेळी नर्गिस चौदा वर्षांच्या होत्या. मेहबूब खान यांनी त्यांचे फातिमा अब्दुल रशीद हे नाव बदलून ‘नर्गिस’ असे नामकरण केले. या चित्रपटात त्यांचे नायक मोतीलाल ३३ वर्षीय होते. या चित्रपटातील नर्गिस यांची भूमिका गाजली. त्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील अभिनय पाहून त्यांना अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. मेहबूब खान यांच्याच हुमायूँ  या चित्रपटामध्ये नर्गिस यांनी अशोक कुमार यांच्यासोबत काम केले. या काळात लीला चिटणीस, शोभना समर्थ, नूरजहाँ, सितारा देवी या दिग्गज अभिनेत्रीही चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. राज कपूर अभिनीत आणि त्यांचे पहिलेच दिग्दर्शन असलेला आग (१९४८) या चित्रपटामध्ये नर्गिस यांनी त्यांच्या नायिकेची भूमिका केली.

१९४९ – १९५० च्या कालावधीमध्ये नर्गिस अणि दिलीपकुमार यांनी एकत्रितपणे हलचल  आणि मेला  या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत काम केले. या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटांमधील नैसर्गिक अभिनय आणि मनमोहक हास्यामुळे नर्गिस यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बरसात (१९४९) या चित्रपटामध्ये नर्गिस यांनी राज कपूर यांच्या प्रेमिकेची भूमिका प्रभावीपणे साकारली. हा चित्रपट खूप गाजला. नर्गिस आणि राजकपूर यांनी अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपट आर. के. चित्रपट निर्मिती संस्थेसोबत केले. तीन दशकातील चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अंदाज (१९४९), जोगन (१९५०), आवारा (१९५१), दीदार (१९५१), अनहोनी (१९५२), श्री ४२० (१९५५), चोरी चोरी (१९५६), मदर इंडिया (१९५७) अशा व्यावसायिक दृष्टया यशस्वी चित्रपटांमधून काम केले. त्यांतील बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांचे नायक-अभिनेते राजकपूर आणि दिलीपकुमार होते.

नर्गिस यांनी मदर इंडिया  या चित्रपटामधील राधाच्या भूमिकेसाठी अभिनय कौशल्याच्या वेगवेगळ्या छटा दाखविल्या. या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा ‘सर्वोत्तम अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकनही झाले होते. या चित्रपटामधील विशेष भूमिकेमुळे त्यांचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले. कार्लोवी वेरी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी नर्गिस यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

१९५८ मध्ये पद्मश्री पदवीने भारत सरकारने नर्गिस यांना सन्मानीत केले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या.

लाजवंती (१९५८), घरसंसार (१९५८), अदालत (१९५८) या चित्रपटात नर्गिस यांनी काम केले. रात और दिन (१९६७) हा चित्रपट त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये नर्गिस यांनी वरुणा नावाच्या महिलेची भूमिका केली होती, जी दिवसा एक सामान्य गृहिणी आणि रात्री घराबाहेर पडून वेगळे आयुष्य जगणारी विकृत महिला दाखविली आहे. या दोन्ही वेगवेगळ्या अभिनयाच्या छटा त्यांनी उत्तम निभावल्या. या चित्रपटामधील भूमिकेसाठी नर्गिस यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठीचे नामांकनही मिळाले.

११ मार्च १९५८ रोजी नर्गिस यांनी अभिनेता सुनील दत्त यांच्याशी लग्न केले. विवाहानंतर त्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिले. नर्गिस अणि सुनील दत्त यांना संजय, नम्रता आणि प्रिया तीन मुले आहेत. संजय दत्त हे यशस्वी चित्रपट अभिनेते आहेत. लग्नानंतर नर्गिस यांनी मोजक्या चित्रपटांत काम केले. १९८० साली त्यांना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आले; असे नामांकन मिळवणाऱ्या त्या चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला होत; परंतु त्यांची राजकीय कारकीर्द त्यांना प्रकृतीमुळे पूर्ण करता आली नाही.

नर्गिस यांनी अनेक प्रकारे समाजसेवेमध्ये योगदान दिले. पती सुनिल दत्त यांच्यासोबत त्यांनी अजंता आर्ट्स कल्चरल ट्रूप या मंडळाची स्थापना केली होती. या मंडळाकडून भारतीय सेनेकरिता मनोरंजनाचे कार्यक्रम केले जात. त्यांनी अंध आणि अपंग मुलांकरिताही कार्य केले आहे.

नर्गिस यांचा स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्यामुळे मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.