नूतन : (४ जून १९३६ – २१ फेब्रुवारी १९९१). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व ख्यातकीर्त अभिनेत्री. यांनी अनेकदा हिंदी चित्रपटांच्या रूढ चौकटी ओलांडून समांतर/वास्तवदर्शी चित्रपट शैलीच्या भूमिका करण्याचा धोका पतकरला आणि त्यातही यश मिळवून आपल्या चतुरस्त्र अभिनयकौशल्याने साठ आणि सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले.

हिंदी चित्रपटनिर्माते कुमारसेन समर्थ आणि प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या नूतन या ज्येष्ठ कन्या. शोभना समर्थ निर्मित-दिग्दर्शित हमारी बेटी (१९५०) ह्या चित्रपटाद्वारे नूतन यांचे बालकलाकार म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. त्यानंतर केलेल्या नगीना, हम लोग (१९५१) या चित्रपटांनी त्यांची अभिनय कारकीर्द पुढे सरकली; पण त्यांना यशोशिखराकडे नेणारा पहिला चित्रपट अमिया चक्रवर्ती यांचा सीमा (१९५७) होय. या चित्रपटात गरीबी, हेटाळणी, चोरीचा खोटा आळ ह्यामुळे गांजून चिडचिड्या, बंडखोर झालेल्या आणि गुन्हेगारीचा शिक्का बसून सुधारगृहात पाठवल्या गेलेल्या मुलीची व्यक्तिरेखा समरस होऊन त्यांनी साकारली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी नावाजले. यानंतर बारिश, पेइंग गेस्ट, दिल्ली का ठग, सोने की चिडिया, छलिया, मिलन, मंझिल, तेरे घर के सामने, सरस्वतीचंद्र, सौदागर अशा एकाहून एक सरस आणि व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी चित्रपटांत त्यांनी नायिकेच्या लक्षणीय भूमिका केल्या. या चित्रपटांच्या यशाबरोबरीने त्यांची कारकीर्द दीर्घकाळ बहरली. त्या कालखंडातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले. अभिनेते देव आनंद यांच्यासोबत त्यांनी पेइंग गेस्ट, बारिश, मंझिल आणि तेरे घर के सामने ह्या चार चित्रपटांत त्यांच्या नायिकेच्या भूमिका केल्या. तर शोमॅन राज कपूर यांच्याबरोबर अनाडी छलिया या चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.

नूतन यांच्या कारकीर्दीच्या वेगवान प्रवासात बिमल रॉय दिग्दर्शित सुजाता (१९५९) ह्या नववास्तववादी चित्रपटाच्या रूपाने एक नवे वळण आले. जातिधर्माच्या भिंती खड्या असलेल्या भारतीय समाजाच्या पार्श्वभूमीवर एक अस्पृश्य, अनाथ आणि अशिक्षित मुलगी आणि उच्चवर्गीय, सुशिक्षित तरुण यांच्यामध्ये उमलत गेलेल्या प्रेमाची कथा ही ह्या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना होती. अनेक चित्रपटांत आकर्षक, आधुनिक व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या नूतन यांनी या चित्रपटातून एका अस्पृश्य तरुणीची भूमिका ताकदीने साकारली. सुजाता या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात उमटलेल्या ‘मी कोण आहे?’ ह्या प्रश्नाने सनातनी भारतीय समाजव्यवस्थेसमोर एक प्रश्नचिन्ह उभे केले. ह्या व्यक्तिरेखेचे रसरशीत माणूसपण नूतन यांनी सहजसाध्या रूपातून आणि संयमित अभिनयातून जिवंत केले.

हिंदी चित्रपटांमध्ये यशोशिखरावर असताना नूतन यांनी भारतीय सैन्यातील लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी विवाह केला (१९५९) आणि त्याचबरोबर चित्रपटसंन्यास घेण्याचा निर्णयही घेतला. दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या आग्रहामुळे त्यांनी बंदिनी  हा चित्रपट स्वीकारला. सुजाताप्रमाणे बंदिनी (१९६३) या चित्रपटातली भूमिका नूतन यांच्या अभिनयाचा मानदंडच मानली जाते. वडिलांची सेवा करत घर-कुटुंबात रमलेल्या मुलीच्या आयुष्यात आलेल्या एका अकल्पित घटनेमुळे खुनी गुन्हेगाराचा शिक्का बसून तुरुंगातले जिणे नशिबी आलेल्या कल्याणीची भूमिका या चित्रपटात नूतन यांनी साकारली. बिमलदा हे संवादापेक्षा मुद्राभिनयाला अधिक महत्त्व देणारे दिग्दर्शक. बंदिनीमधली कल्याणी साकार करताना सुरुवातीची प्रफुल्लित तरुणी आणि पुढे अजाणता केलेल्या अपराधाच्या जाणिवेने स्वतःचे अस्तित्वच हरपून गेलेली तुरुंगातील मूक-गंभीर कैदी साकार करताना दिग्दर्शकाला जे अभिप्रेत आहे, त्यानुसार संवेदनशीलतेने नूतन यांनी ही भूमिका साकारली. त्यामुळे ह्या खुनी, गुन्हेगार तरुणीच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची सहानुभूती मिळविली. या चित्रपटामध्ये कल्याणीचा भूतकाळ जाणूनही तिला पत्नीचे, आदराचे स्थान देऊ पाहणाऱ्या देवेंद्रकडे जाण्याचा म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहातले आपले गमावलेले स्थान पुन्हा मिळवण्याचा, भौतिक सुखाचा मार्ग नाकारून आजारी, एकाकी असलेल्या आपल्या पहिल्या प्रेमाकडे – क्रांतिकारक बिकाशच्या सेवेसाठी जाण्याचा त्यागमय पर्याय कल्याणीने स्वीकारला, या चित्रपटातील हा शेवटचा हृदयद्रावक प्रसंग नूतन यांनी खूप भावनाशील आणि तितक्याच करारी मुद्रेने साकारला. हा प्रसंग नूतन यांच्या अभिनय सामर्थ्याचे एक उदाहरण म्हणून गणला जातो.

१९६३ हे नूतन यांच्या चित्रपटसृष्टीतील पुनरागमनाचे वर्ष त्यांच्या कारकीर्दीला एका नव्या टप्प्याकडे नेणारे ठरले. ह्या वर्षी त्यांनी एकीकडे बंदिनी या चित्रपटात कल्याणीची गंभीर भूमिका केली, तर दुसरीकडे दिल ही तो है या चित्रपटात मुस्लिम पार्श्वभूमीवरील प्रेमकथेतल्या जमीलाची भूमिका केली आणि तिसरीकडे तेरे घर के सामने या चित्रपटात दिल्लीतील जहागिरदार घरातील अतिशय आधुनिक व अवखळ तरुणीची – सुलेखाची भूमिका केली. विजय आनंद दिग्दर्शित तेरे घर के सामने हा मनोरंजनात्मक पण सामाजिक संदेश देणारा चित्रपट होता. या तीनही चित्रपटांतील नूतन यांच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

पुनरागमनानंतरचे नूतन यांचे खानदान (१९६५), रिश्ते नाते (१९६५), दिल ने फिर याद किया (१९६६), मिलन, लाटसाहब (१९६७), सरस्वतीचंद्र (१९६८), भाई बहन (१९६९) हे काही गाजलेले निवडक चित्रपट. ह्यापुढच्या टप्प्यात त्यांनी चरित्र भूमिकांकडे वळत अनुराग (१९७२ ), सौदागर (१९७३), साजन बिना सुहागन (१९७८), साजन की सहेली (१९८१), मेरी जंग  (१९८५), नाम (१९८६) आणि कर्मा (१९८७) अशा वेगवेगळ्या शैलीच्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सौदागरमध्ये अनुभवी नूतन आणि तुलनेने नवोदित अमिताभ बच्चन एकत्र आले होते, तर कर्मामध्ये इतकी वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत राहून प्रथमच एकत्र काम केलेल्या दिलीप कुमार आणि नूतनच्या यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पहायला मिळाली. या चित्रपटांतील नूतन यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी नावाजले.

ही प्रतिभाशाली अभिनेत्री खऱ्या अर्थी कधीच निवृत्त झाली नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात चित्रपटातल्या भूमिका काहीशा कमी होत गेल्या, तरी त्यांनी स्वतःला सर्जनशील कामात सतत गुंतवून ठेवले. त्यांनी हिंदुस्थानी संगीताचे आणि कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘नूतन म्युझिकल नाईट्स’ हा वाद्यवृंद स्थापन केला आणि आपल्या आवडत्या अभिनेत्रीला रंगमंचावर गाताना बघायला, ऐकायला त्यांच्या जगभरातील चाहत्यांनी गर्दी केली. पुढे त्यांनी आध्यात्माच्या ओढीने अनेक भजने रचली व त्यांना स्वरबद्धही केले.

अभिनेत्री नूतन यांना त्यांच्या चित्रपट कारकीर्दीत अनेक मानसन्मानांनी गौरविण्यात आले. सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन आणि मै तुलसी तेरे आंगन की या चित्रपटांतील नायिकेच्या अभिनयाकरिता त्यांना फिल्मफेअरचा त्या-त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या अभिनय कारकीर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. पुढे त्यांची भाची अभिनेत्री काजोल हिनेही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. मेरी जंग या चित्रपटाकरिता नूतन यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. बंदिनी, मिलन सौदागर या चित्रपटांकरिता सर्वोत्कृष्ट हिंदी अभिनेत्रीचा बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार त्यांना मिळाला. भारत सरकारने १९७४ साली ‘पदमश्री’ पुरस्कार देऊन या अभिनेत्रीचा सन्मान केला.

सहजसुंदर अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत करणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचा कर्करोगाने मृत्यू झाला. नूतन यांचे नसीबवाला (१९९२) आणि इन्सानियत (१९९४) हे चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले. भारतीय टपाल खात्याने त्यांची छबी असलेले तिकिट काढून त्यांना मानवंदना दिली (२०११).

नूतन यांचे सुपुत्र मोहनीश बहल यांनी चित्रपट-दूरचित्रवाणी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांची नात प्रनूतन बहल हिनेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले आहे.

संदर्भ :

  •  रॉय-भट्टाचार्य, रिंकी, आर्य, अन्वेषा, बिमल रॉय – द मॅन व्हू स्पोक इन पिक्चर्स, २०१७.

समीक्षक : अरुण पुराणिक