ब्रांकूश, कॉन्स्टंटिन : ( २१ फेब्रुवारी १८७६ – १६ मार्च १९५७ ). प्रख्यात आधुनिक रूमानियन शिल्पकार. पेस्टिसानी खेड्यातील होबिता या लहानशा वाडीमध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे बालपण फार खडतर व हालअपेष्टांमध्ये गेले. वयाच्या सातव्या वर्षी गुरे सांभाळण्याचे काम करताकरताच, त्याने लाकडातील कोरीवकामाची तेथील परंपरागत कलाही शिकून घेतली. तो शाळेत गेला नाही, लिहिणे-वाचणे स्वतःच शिकला. प्रारंभी १८९४ मध्ये ‘क्रायोव्हा स्कूल ऑफ आर्ट्स अँड क्राफ्टस्’मध्ये व पुढे बूकारेस्टमधील ‘स्कूल ऑफ फाइन आर्ट्स’मध्ये (१८९८-१९०२) त्याने कलेचे रीतसर शिक्षण घेतले. पुढे तो म्यूनिकला आणि तेथून पुढे पॅरिसला शिल्पकार होण्याच्या मनिषेने गेला. या प्रवासासाठी पुरेसे पैसे नसल्याने, बराचसा प्रवास त्याला पायीच करावा लागला. १९०४ मध्ये तो पॅरिसला स्थायिक झाला व तेथील ‘एकोल दी बो झार्त’ या कलाशिक्षणसंस्थेत आंतॉनँ मेर्स्येच्या शिल्पनिकेतनात त्याने अधिक शिक्षण घेतले. त्याच्यावर रॉदँच्या शिल्पशैलीचे, आफ्रिकी-आदिम कलेचे तसेच पौर्वात्य कलेतील गूढ प्रतीकवादाचे असे अनेकविध संमिश्र संस्कार दिसतात. रॉदँने त्याला आपला साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी निमंत्रण दिले; पण त्याच्या प्रभावापासून अलिप्त राहण्याच्या हेतूने त्याने त्यास नकार दिला.
ब्रांकूशने आपल्या शिल्पकारकीर्दीच्या प्रारंभी विद्यार्थीदशेतच (१९०२) शारीर प्रतिमान तयार केले, ते इतके परिपूर्ण होते की, शाळेमध्ये शरीरशास्त्र शिकवण्यासाठी ते कित्येक वर्षे वापरात होते. १९०५-०६ च्या, सुरुवातीच्या काळात हेड ऑफ द ॲडोलेसेंटसारखे लहान अर्धपुतळे त्याने घडविले. पुढेही त्याने अनेक मानवी शीर्ष-शिल्पे तयार केली. त्यांपैकी सुरुवातीचे स्लीपिंग म्यूझ (१९०६) हे रॉदँच्या परंपरेतील; मात्र त्याच्या नंतरच्या १९०९-११ च्या शिल्पावृत्तीत तसेच प्रॉमिथ्युअस (१९११), द न्यू बॉर्न (१९१५), द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड (१९२४) या शिल्पाकृतींत मानवी चेहरे अधिकाधिक अमूर्त व अंडाकृती होत गेलेले दिसतात. शिल्पविषयाच्या बाह्यतः दिसणाऱ्या रंगरूपापेक्षा, तिच्या अंतर्यामी असलेल्या चैतन्यमय सत्त्वाची अभिव्यक्ती अत्यंत साध्यासुध्या, प्राथमिक व सारदर्शक आकारांमध्ये करावयाची, हे कलावंत म्हणून त्याने आपले साध्य मानले. हे साधत असताना त्याच्या शिल्पांचे आकार हळूहळू अमूर्ततेकडे झुकत गेलेले दिसतात. मानवी जन्म आणि मृत्यू, मानवी जीवन आणि सर्जनशीलता यांविषयीच्या प्रगाढ चिंतनशीलतेची पार्श्वभूमी त्याच्या निर्मितीमागे असल्याने, त्यास केवळ आकारिकतेपलीकडची एक गूढ आध्यात्मिक अर्थवत्ताही प्राप्त झाली. त्याच्या शिल्पांमध्ये काही ठराविक विषय पुन्हापुन्हा प्रकटताना दिसतात. हे मूळ विषय त्याने ब्राँझ, संगमरवर, प्लॅस्टर अशा विविध माध्यंमातून हाताळले. अंडाकृती मानवी शीर्ष हा त्यांपैकीच एक विषय.
द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड – ह्यासच त्याने स्कल्प्चर फॉर द ब्लाइंड असे दुसरे नाव दिले – हे त्याचे जास्त प्रगल्भ परिणत रूप. त्यात अत्यंत गुळगुळीत घोटीव असा अंड्याचा संगमरवरी आकार पाहावयास मिळतो. मादाम पोगनी हे व्यक्तिशिल्पही (१९१३-३१) त्याने संगमरवरात व गुळगुळीत ब्राँझमध्ये अनेकदा घडविले. प्रिन्सेस एक्स (१९१६) हे व्यक्तिशिल्प त्यातील लिंगसूचक आकारिकतेमुळे अत्यंत आक्षेपार्ह ठरले व १९२० च्या ‘सालाँ’ मधून (प्रदर्शनातून) ते काढून टाकण्यात आले. पक्षी व त्यांची उड्डाणे या विषयानेही ब्रांकूश असाच झपाटून गेला होता. १९१२ ते १९४० च्या कालावधीत त्याने ह्या विषयावर एकूण २८ शिल्पे केली. मायस्त्रा (रूमानियन आख्यायिकांतील अद्भुतरम्य पक्षी, १९१२), बर्ड (१९१५) व बर्ड इन स्पेस (१९२५) हे त्या प्रवासाचे प्रमुख टप्पे होत. या अखेरच्या शिल्पामध्ये पक्ष्याची प्रतिमा म्हणजे उड्डाणाची अमूर्त संकल्पनाच बनते. बर्ड या शिल्पाने कलाजगतात बरीच खळबळ माजवली. आज हे शिल्प अमूर्त संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. पक्ष्यांप्रमाणेच विविध मस्त्याकारही (१९१८-३०) त्याने शिल्पित केले. त्याच्या शिल्पांचे विषय इतके आद्यतन व मूलगामी असत, की त्याला प्रत्यक्ष असे अनुयायी थोडे असले, तरी उत्तरकालीन आधुनिक शिल्पकलेतील सर्व घडामोडींमध्ये त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष पडसाद उमटलेले दिसतात. उदा., द किस (१९०८) हे शिल्प पुढील घनवादी शिल्पकलेचे पूर्वसुरी मानता येईल.
ब्रांकूशच्या कलेने सारी शिल्पमाध्यमे, त्यांच्या प्रकटीकरणाच्या सर्व सामर्थ्यानिशी आपल्या कवेत घेतली. शिल्पाच्या माध्यमाविषयीची त्याची जाण सखोल व पक्की होती. ब्राँझ आणि संगमरवरी शिल्पांना, त्याने शिल्पकलेच्या इतिहासात क्वचितच दिसणारा, नितळ गुळगुळीत घोटीवपणा दिला. त्याच वेळी ही नितळ तकाकीयुक्त शिल्पे त्याने ओबडधोबडपणे घडवलेल्या दगडी घडवंचीवर वा झाडाच्या कापीव खोडांच्या बैठकींवर मांडली. काष्ठमाध्यमामध्ये त्याने क्वचितच इतका घोटीव गुळगुळीतपणा साधला. उदा., कॉक (१९२४); मात्र आदिम ओबडधोबड कुलचिन्हदर्शक स्तंभांच्या धर्तीवर त्याने लाकडी शिल्पे निर्माण केली. उदा., द किंग ऑफ किंग्ज (द स्पिरिट ऑफ बुद्ध, १९५६) या शिल्पाद्वारा त्याने प्राचीन पौर्वात्य धर्माचा आत्मा शोधण्याचाही प्रयत्न केला. रूमानियातील त्याच्या जन्मस्थळानजीकच्या तिर्गू-जू येथील सार्वजनिक उद्यानात त्याने १९३७ साली एंडलेस कॉलम हा सु. ३० मी. (१०० फूट) उंचीचा पोलादी स्तंभ, तसेच गेट ऑफ द किस व टेबल ऑफ सायलेन्स ही उत्तुंग भव्य स्मारके उभारली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी शिल्पकलेला नवे वळण देणारा ब्रांकूश हा आधुनिक कलेच्या आद्य प्रणेत्यांपैकी एक प्रमुख कलावंत मानला जातो.
पॅरिस येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Geist, Sidney, Brancusi, New York, 1968.
- Giedion Welcker, Carola, Ed. Constantin Brancusi, New York, 1959.