वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी जे काही केले जाते, ते अक्षय्य होते. हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. कृत अथवा त्रेता युगाची सुरुवात याच तिथीने सुरू झाली, असे मानतात. कालविवेक या ग्रंथामध्ये या तिथीच्या व्रताचे महत्त्व विशद केले गेले आहे. तसेच राजस्थानात या तिथीला ‘आखा तीज’ असेही म्हणतात. भविष्यपुराणात अक्षय्य तृतीयेचे व्रत सांगितले आहे. भार्गवार्चन-दीपिकेमध्ये स्कंदपुराण आणि भविष्यपुराण यांचे संदर्भ देऊन सांगितले आहे की, याच तिथीवर पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी शुभ ग्रहांच्या योगात आकाशात मिथुन राशी स्थित असताना रेणुकादेवीच्या पोटी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात जन्म घेतला होता. या तिथीला ‘परशुराम तिथी’ असेही म्हणतात. या दिवशी दक्षिण भारतात परशुरामाची जयंती उत्साहात साजरी केली जाते. तसेच या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पुजाही केली जाते.
या तिथीस अक्षय्य तृतीया हे नाव पडण्यामागचे कारण मदनरत्न या ग्रंथात दिले आहे, ते खालीलप्रमाणे :
अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया |
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै
स्तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ||
या श्लोकाचा अर्थ असा की, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की, या तिथीस करण्यात आलेले दान, हवन तसेच देव आणि पितर यांप्रती केलेली कार्ये कधीही व्यर्थ होत नाहीत, अविनाशी राहतात.
ही तृतीया दिवसाचे दोन भाग करून पूर्वार्ध व्यापिनी घ्यावी, असे मत ज्योतिषाचार्य कृष्णाजी सोमण यांनी मांडले आहे. या तृतीयेला रोहिणी नक्षत्र व बुधवार यांचा योग असल्यास ती महापुण्यकारक समजण्यात येते. या संदर्भात भविष्यपुराणात एका व्यापाऱ्याची कथा सांगितली गेली, ती अशी : एक व्यापारी स्वतःच्या दारिद्र्य कालखंडात बुधवार व रोहिणी नक्षत्राचा योग साधून अक्षय्य तृतीयेला दान करतो. त्यास धनप्राप्ती होते आणि नंतर तो कुशावती नगरीचा पराक्रमी राजा म्हणून नावारूपास येतो.
त्याचप्रमाणे जैन धर्मात अक्षय्य तृतीयेला महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केले नव्हते. व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांसनामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले. त्यानंतर त्या राजाच्या राज्यात अन्नधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. यामुळेच अक्षय्य तृतीयेस ‘इक्षु तृतीया’ असेही म्हणतात.
तसेच आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते, असे मानले जाते.
या दिवशी विष्णू, शिव व पितर यांच्या प्रीत्यर्थ तृषाशमनासाठी पाण्याचा कलश ब्राह्मणाला देण्याचा व श्राद्ध करण्याचा विधी आहे. वसंत ऋतूतील कडक उन्हाळा व सृष्टिसौंदर्य यांमुळे उदंकुंभदानाला धर्मरूपता व या दिवसाला सणाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. या मुहूर्तावर शेतकरी पेरणी करतात. या कालास अनुरूप नृत्य-गायनादी विधी वसंतोत्सव करण्याची वहिवाट आहे. कोणतेही मंगलकृत्य अगर व्रत आचरण्यास हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
सध्याच्या काळात या शुभ मुहूर्तावर सोने, चांदी, आणि वस्त्र इ. खरेदी केले जाते. तसेच चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाची सांगता याच दिवशी केली जात. या वेळी सुवासिनी हळदीकुंकू करून सौभाग्यवाण लुटतात.
संदर्भ :
- खेमराज, श्रीकृष्णदास, श्रीव्रतराज, मुंबई, १८६८.
- सोमण, कृ. वि. संपा. सुलभ ज्योतिषशास्त्र, मुंबई, २०१२.
समीक्षक : भाग्यलता पाटस्कर