गॉलिस्ट पक्ष : दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात फ्रान्समधील उजव्या शक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध ‘गॉलिस्ट’ पक्षांचे व गटांचे जनकत्व १९४७ मध्ये जनरल द गॉल यांनी स्थापलेल्या आर्. पी. एफ्. या पक्षाकडे जाते. हा पक्ष फार काळ संघटित राहू शकला नाही, तरी द गॉल यांनी पुरस्कारलेल्या तत्त्वांचा पाठपुरावा करणारे विविध पक्ष आणि गट फ्रेंच राजकारणात तेव्हापासून कार्यरत आहेत. बहुसंख्याक गॉलिस्ट मतवाद्यांनी १९५८ मध्ये एकत्र येऊन यू. एन्. आर्. पक्षाची स्थापना केली, पण विशेष म्हणजे खुद्द द गॉल यांनीच त्याचे नेतृत्त्व नाकारले. पुढच्या काळात गॉलवाद्यांत (अनुयायांत) बेरीज-वजाबाकीच्या प्रक्रिया चालू विद्यमान गॉलिस्ट संप्रदायाची घडी १९६७ मध्ये निर्माण झालेल्या यू.डी.व्ही.इ.आर्. या पक्षाच्या रुपाने घातली गेली.
गॉलिस्ट पक्षांची वारंवार नामांतरे झाली आणि सर्व गॉलवादी एका समान संघटनेमध्ये दीर्घकाल समाविष्ट होऊ शकले नाहीत, हे खरे असले तरीसुद्धा उजवी परंतु पारंपारिक उजव्या शक्तीपेक्षा वेगळे अस्तित्व असलेली गॉलिस्ट राजकीय भूमिका फ्रेंच राजकारणात गेली ४० वर्षे प्रभावी आहे. ‘गॉलिझम’ हा या अर्थाने एक राजकीय संप्रदाय झाला आहे. द गॉल यांनी निर्मिलेला आर्.पी.एफ्. पक्ष म्हणजे फॅसिझमची आवृत्तीच होय. त्याची रचना आणि कार्यपद्धती प्राधिकारवाद दोन बाबतींत भिन्न आहे. एक म्हणजे गॉलिस्टांची भूमिका यथास्थितिवादी नाही. सामाजिक परिवर्तन त्यांना अभिप्रेत आहे. परंतु हे परिवर्तन राष्ट्रवादाच्या आधारे घडवून आणण्याचा त्यांचा आग्रह आहे. भांडवल आणि श्रमशक्ती यांविषयी गॉलिस्टांची भूमिका मुसोलिनीच्या ‘कॉर्पोरेट स्टेट’ची आठवण करून देते. तथापि गॉलिस्ट संप्रदायामागे फॅसिझमपेक्षा नेपोलियन बोनापार्टची प्रेरणा आहे, असे म्हणणे अधिक संयुक्त वाटते.
संदर्भ :
- Almond, G. A. Coleman. J. S. Ed. The Politics of the Developing Areas, Princeton, 1960.