बौद्ध व जैन धर्मांत अत्यंत पूज्य व्यक्तीस ही उपाधी लावली जाते. व्युत्पत्तीप्रमाणे अर्हत् शब्दाचा अर्थ ‘अंगी योग्यता बाळगणारा’ किंवा ‘पूज्य’ असा होतो. अर्हत्चे पाली ‘अरहा’ आणि अर्धमागधी ‘अरिहंत्’ असे रूप आहे. प्राचीन पाली व अर्धमागधी ग्रंथांतून ‘बुद्ध’, ‘संबुद्ध’ म्हणजेच ‘जागृत झालेला’, ‘ज्ञान प्राप्त झालेला’ ह्या समान पातळीवर अर्हत् शब्द वापरलेला आहे. बौद्धांच्या धर्ममार्गावर चार टप्पे सांगितले आहेत : १) दहा संयोजनांपैकी पहिल्या तीन संयोजनांचा म्हणजे सत्कार्यदृष्टी (शरीरात आत्मा आहे अशी दृष्टी), विचिकित्सा (बुद्ध, धर्म व संघ ह्यांच्याबद्दलची शंका) व शील-व्रत-परामर्श (निरनिराळ्या व्रतवैकल्याने शुद्धी होते, ही भावना) ह्यांचा नाश झाला म्हणजे तो ‘स्त्रोतापन्न’ (प्रवाहावर पोहोचला) झाला व त्याने पहिला टप्पा गाठला असे समजतात. हा मनुष्य फार झाले तर पुढे सात जन्म घेईल, अशी बौद्धांची श्रद्धा आहे. २) त्याच्याही पुढे जाऊन राग, द्वेष व मोहाचा आपल्यावरील पगडा बराच शिथिल केल्यास तो ‘सकृदागामी’ बनतो. म्हणजे फार झाले तर तो इहलोकी एकदाच (सकृत्) परत येतो. ३) पुढील दोन म्हणजे कामराग व द्वेष (पाली-पटिघ) ह्यांचाही नाश केला म्हणजे तो ‘अनागामी’ (पुन्हा इहलोकी न येणारा) बनतो. फार झाले तर वर उच्चतर लोकात जन्म पावतो. ४) ह्याच्याही पुढची पाच संयोजने म्हणजे रूपराग, अरूपराग, मान, औद्धत्य व अविद्या ह्यांसकट सर्व दहाही संयोजनांचा नाश केला म्हणजे तो ‘अर्हत्’ बनतो व जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होऊन दुःखमुक्त होतो. यांपैकी ‘अर्हत्’ हा सर्वांत वरचा, श्रेष्ठ टप्पा समजला जातो.
‘स्थविरवादी’ ग्रंथांतून ‘अर्हत्त्व’ प्राप्त करून घेणे हेच ध्येय आहे. अर्हत्त्वाचे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे अर्थ सांगितले आहेत. तथापि राग, द्वेष, मोह यांचा नाश करणे, मनुष्याला जखडून टाकणाऱ्या दहाही बंधनांचा संपूर्ण नाश करणे, हा अर्थ बव्हंशी मान्य केलेला दिसतो. अर्हताच्या ठिकाणी कोणतीही आसक्ती शिल्लक राहिली नसल्याकारणाने त्याच्या क्रियांना ‘कुशल’ किंवा ‘अकुशल’ अशी संज्ञा देता येत नाही; त्या केवळ क्रियाच (क्रियामात्र) आहेत, असे स्थविरवादी तत्त्वज्ञान सांगते. अर्हत् आपल्या प्राप्त केलेल्या स्थानापासून च्युत होत नाही, असाही त्यांचा सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत ‘सर्वास्तिवादी’ वगैरे सांप्रदायिकांना मान्य नाही. बौद्धांच्या मते अर्हत् प्राप्त पुरुषाला पुनर्जन्म नाही व संसारी पुरुषालाही ते पद प्राप्त करून घेता येते. भगवान बुद्धांच्या जीवनकालात या पदाला पोचलेल्या वीस जणांची नावे अंगुत्तरनिकायात दिली आहेत.
जैन धर्माप्रमाणे तीर्थंकरांनाच ‘अर्हत् केवली’ ही संज्ञा लावतात. ‘केवलीं’च्यापेक्षा त्यांचे गुण अंतिम उत्कर्षाला प्राप्त झालेले असतात. सर्वज्ञता, वीरतागता, सत्य, विनय, तप, आत्मक्लेश, सेवा, दानशीलता हे गुण अर्हतामध्ये उत्कर्षाप्रत पोचलेले असतात. जैनांनी ‘केवलीं’चे दोन प्रकार मानले आहेत : ‘केवली’ आणि ‘अर्हत् केवली’. दोघेही वीतराग आणि सर्वज्ञ असतात; पण धर्मप्रवर्तकांची म्हणजेच गुरू होण्याची योग्यता मात्र ‘अर्हत् केवली’ यांनाच असते.
संदर्भ :
- Buswell, Robert E.; Robert, M. Gimello, Paths to Liberation : The Marga and Its Transformation in Buddhist Thought, Honolulu, 1992.
- Dhaky, M. A. Arhat Parsva and Dharanendra Nexus, Delhi, 1997.