प्रयाग संगीत समितीच्या मुख्य इमारतीचे छायाचित्र

संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ स्थापन झालेली अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील एक ख्यातकीर्त संगीतसंस्था. गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे एक शिष्य पं. विष्णू अण्णाजी कशाळकर यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना मेजर देशराज रणजितसिंह, सत्यानंद जोशी आणि बाबू वैजनाथ साहाय यांनी ११ फेब्रुवारी १९२६ रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अलाहाबाद येथे केली. सामान्य लोकांपर्यंत संगीत पोचवणे, त्याचे संवर्धन करणे आणि संपूर्ण भारतीय जनतेमध्ये शास्त्रीय संगीत लोकप्रिय करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. याचीच पुढची पायरी म्हणजे शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांची पुनर्स्थापना करणे व भारतात तसेच परदेशातही मोठ्या प्रमाणावर याचा प्रसार करण्याचा हेतू संस्थेने दृष्टीसमोर ठेवला आहे. संस्थेच्या अलाहाबाद परिसरात एकूण चार शाखा आहेत.

प्रयाग संगीत समितीमध्ये गायन वर्गात शास्त्रीय संगीत, रविंद्र संगीत व भाव संगीत इत्यादी; वादन वर्गात तबला, सतार, गिटार, सिंथेसायझर, व्हायोलिन, बासरी इत्यादी वाद्ये; तर नृत्य वर्गात कथ्थक आणि भरतनाट्यम् इत्यादी नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. संगीताच्या या प्रकारांमध्ये वेगवेगळ्या स्तरावरील पाठ्यक्रम राबवून संगीत प्रवेशिका, संगीत प्रभाकर (सहाव्या वर्षी), संगीत प्रवीण (आठव्या वर्षी) इत्यादी पदव्या दिल्या जातात. संगीतातील शोधकार्यास ‘संगीताचार्य’ ही पदवी दिली जाते. संपूर्ण भारतात आणि नेपाळ, कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सिंगापूर, स्पेन, रशिया आदी देशांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे १९०० केंद्रावरून या परीक्षांचे कार्य केले जाते. भारतातील अनेक विद्यापीठांनी या परीक्षांना मान्यता दिलेली आहे.

संस्थेतर्फे सुमारे नव्वद वर्षे संगीत संमेलने यशस्वीपणे भरविण्यात आलेली आहेत. गेल्या सुमारे साठ वर्षांपासून नियमितपणे घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा हे एक महत्त्वाचे कार्य या संस्थेमार्फत सुरू आहे. धृपद, धमार, ख्याल, ठुमरी, दादरा, टप्पा, लोकगीत, रवींद्र संगीत आदी प्रकारासाठी घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभाग घेऊन सलग दहा दिवस आपले सादरीकरण करतात.

समीक्षण : सु. र. देशपांडे