क्लॅपरटन, ह्यू (Clapperton, Hugh) : (१८ मे १७८८ – १३ एप्रिल १८२७). स्कॉटिश समन्वेषक, नौदल अधिकारी आणि पश्चिम आफ्रिकेतील सांप्रत नायजेरियाचा प्रत्यक्षदर्शी वृतांत घेऊन येणारी पहिली यूरोपियन व्यक्ती. त्यांचे पूर्ण नाव बेन ह्यू क्लॅपरटन. क्लॅपरटन यांचा जन्म स्कॉटलंडमधील डमफ्रीशर येथील अ‍ॅनन या नगरात झाला. शल्यविशारद असलेले वडील जॉर्ज क्लॅपरटन आणि आई मार्गारेट जॉन्स्टन यांचे हे सर्वांत लहान (धाकटे) पुत्र. मर्यादित औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच इंग्लंडमधील लिव्हरपूल ते अमेरिका या मार्गावरील व्यापारी जहाजांवर, ‘केबिन बॉय’ म्हणून ते काम करू लागले. पुढे ब्रिटिश नौदलातील लष्करी जहाजावर एक सामान्य नाविक म्हणून काम करणाऱ्या क्लॅपरटन यांना नौदलातील ‘मिडशिपमॅन’ या पदापर्यंत बढती मिळाली. तांबूस रंगाचे केस, सहा फूट उंची, मजबूत बांधा, शांत आणि आनंदी स्वभाव असलेल्या क्लॅपरटन यांच्याकडे एका साहसी व्यक्तिमत्वाचे सर्व गुण होते. इ. स. १८१० मध्ये फ्रेंचांच्या ताब्यात असणाऱ्या मॉरिशसमधील पोर्ट लूई बंदरावर हल्ला चढवून फ्रेंच ध्वज उतरवून फेकून देणारे ते पहिले अधिकारी होते. इ. स. १८१४ मध्ये क्लॅपरटन यांची कॅनडातील पंचमहासरोवर परिसरातील जहाजांवर नियुक्ती झाली. क्लॅपरटन यांच्या नोंदवहीतील सखोल आणि स्पष्ट आकृत्या, नकाशे आणि नोंदी पाहून त्यांच्या उच्चाधिकाऱ्यांनी इ. स. १८१६ मध्ये त्यांची लेफ्टनंट पदावर नियुक्ती केली. इ. स. १८१७ मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी क्लॅपरटन अर्ध्या पगारावर लष्करी सेवेतून निवृत्त झाले आणि स्कॉटलंडमध्ये परतले.

क्लॅपरटन हे आफ्रिकेतील ट्रिपोलीमार्गे बॉर्नूपर्यंत (सांप्रत नायजेरियापर्यंत) पोहोचून तेथे दूतावास स्थापण्यासाठी त्याकाळी ब्रिटन मोहिमा आखत होते. अशाच एका मोहिमेचे काम वसाहतीच्या कार्यालयाने शल्यविशारद आणि वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. वॉल्टर ऑडने यांच्याकडे सोपविले. या मोहिमेसाठी ऑडने यांनी सहकारी म्हणून क्लॅपरटन यांची नियुक्ती केली. इ. स. १८२२ सालच्या एप्रिल महिन्यात ऑडने आणि क्लॅपरटन भूमध्य समुद्र ओलांडून ट्रिपोलीमार्गे सहारा वाळवंटातून दक्षिणेस मुर्झूक येथे पोहोचले. मुर्झूक येथे या मोहिमेचे प्रभारी म्हणून नेमण्यात आलेले लष्करी अधिकारी मेजर डिक्सन डेनम यांची भेट झाल्यानंतर त्यांनी २९ नोव्हेंबर १८२२ रोजी एकत्रितपणे दक्षिणेस प्रस्थान केले. १७ फेब्रुवारी १८२३ रोजी समन्वेषकांचा हा चमू कानेम-बॉर्नू साम्राज्याच्या कूकावा या राजधानीत येऊन पोहोचला. तेथील चॅड सरोवरापर्यंत पोहोचणारे ते पहिले यूरोपियन ठरले. चॅड सरोवराच्या पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय किनाऱ्याचे तसेच वॉबे, लोगोन आणि शारी या नद्यांचे सर्वेक्षण करायचे असल्याने डेनम तेथेच थांबले; परंतु ऑडने आणि क्लॅपरटन हे नायजर नदीचा माग काढण्यासाठी पुढे गेले. कानो नगराच्या मार्गावरील कटागम शहराजवळील मर्मूर या गावात ऑडने यांचा ज्वरामुळे मृत्यू झाला. मग क्लॅपरटन एकटेच कानो येथून सोकोटो या फुलानी साम्राज्याच्या राजधानीत आले. त्यांनी फुलानी साम्राज्याचे सुलतान मुहम्मद बेलो यांच्यासोबत ब्रिटनबरोबरच्या संभाव्य व्यापार आणि ब्रिटिश साम्राज्याचा भारतातील विस्तार या विषयांवर चर्चा केली. या चर्चेनंतर मुहम्मद बेलो यांनी सोकोटोमध्ये ब्रिटिश दूतावासाचे स्वागत करण्यास उत्सुकता दर्शविली; मात्र क्लॅपरटन यांना नायजर नदीकडे जाण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे क्लॅपरटन झारीआ, कात्सिनामार्गे कूकावा येथे परत आले आणि डेनम यांच्याबरोबर १ जून १८२५ रोजी लंडन येथे परतले.

नायजेरियाकडे जाण्याचा मार्ग पश्चिम आफ्रिकेतून जातो याची खात्री असल्याने आणि सुलतान मुहम्मद बेलो ब्रिटिश दूतावास स्थापण्यासाठी सकारात्मक असल्याने, क्लॅपरटन यांना सोकोटोला पुन्हा भेट देण्याची इच्छा होती. त्यानुसार इ. स. १८२५ सालच्या ऑगस्ट महिन्यात ‘एच.एम.एस.ब्रेझन’ या जहाजातून क्लॅपरटन प्रवासास निघाले. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांचा नोकर व सहकारी रिचर्ड लेमन लँडर होते. अटलांटिक महासागरमार्गे पश्चिम आफ्रिकेतील गिनीच्या आखातातील बेनिन उपसागरात (बाइट ऑफ बेनिन) ते पोहोचले. ७ डिसेंबर १८२५ रोजी ते आफ्रिकेतील अंतर्गत भागात जाण्यास निघाले आणि नायजर नदी ओलांडत कानोमार्गे प्रवास सुरू ठेवला. इ. स. १८२६ सालच्या जानेवारी महिन्यात योरूबा प्रांतातून प्रवास करीत क्लॅपरटन सोकोटो या राजधानीत पोहोचले; परंतु फुलानी साम्राज्याचे सुलतान मुहम्मद बेलो आणि बॉर्नू साम्राज्याचे सुलतान शेख अल-कानेमी यांच्यात युद्ध सुरू असल्याने त्यांना पुढे मार्गक्रमण करण्यास परवानगी मिळाली नाही. अखेर नायजर प्रदेशाचे समन्वेषण करण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. मलेरिया, आमांश आणि नैराश्यामुळे आजारी पडलेल्या क्लॅपरटन यांचा फुलानी साम्राज्यातील सोकोटो येथे मृत्यू झाला. पुढे रिचर्ड लेमन लँडर या त्यांच्या सहकाऱ्याने नायजर नदीच्या प्रवाहाचा मुखापर्यंतचा मार्ग शोधून काढला आणि क्लॅपरटन यांची इच्छा पूर्ण केली.

सोकोटोमधील साम्राज्याच्या स्थापनेनंतर पश्चिम आफ्रिकेतील हौसा राज्यांची माहिती वैयक्तिक निरीक्षणांद्वारे नोंदविणारे क्लॅपरटन हे पहिले यूरोपियन होते. इ. स. १८२६ साली क्लॅपरटन यांचे डिफिकल्ट अँड डेंजरस रोड्स-ट्रॅव्ह्ल्स इन सहारा अँड फेझॅन, १८२२-१८२५ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याच वर्षी डेनम, क्लॅपरटन आणि ऑडने यांचे नॅरेटिव्ह ऑफ ट्रॅव्हल्स अँड डिस्कव्हरीज इन नॉर्दर्न अँड सेंट्रल आफ्रिका इन द इयर्स १८२२-१८२३ अँड १८२४ हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रवासादरम्यान क्लॅपरटन यांनी आजूबाजूच्या भूदृश्यांचे, भौगोलिक वैशिष्ट्यांचे तसेच भूशास्त्रविषयक नमुन्यांचे निरीक्षण केले आणि त्यांच्या नोंदी आपल्या रोजनिशीत लिहिल्या. इ. स. १८२९ मध्ये जर्नल ऑफ अ सेकंड एक्स्पिडिशन इनटू इंटिरिअर ऑफ आफ्रिका या नावाने ही रोजनिशी पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. क्लॅपरटन यांच्या प्रवासवर्णनांच्या नोंदी रिचर्ड लेमन लँडर यांनी इ. स. १८३० मध्ये प्रसिद्ध केलेल्या रेकॉर्ड्स ऑफ कॅप्टन क्लॅपरटन्स लास्ट एक्स्पिडिशन टू आफ्रिका विथ द सब्सिक्वेंट ॲडव्हेंचर ऑफ द ऑथर या ग्रंथातही वाचावयास मिळतात. क्लॅपरटन यांच्या नावावरूनच आफ्रिकेत आढळणाऱ्या फुलझाडांच्या तीन प्रजातींना ‘क्लॅपरटोनिया’ असे नाव प्राप्त झाले. क्लॅपरटन यांच्या या कार्यामुळे पश्चिम आफ्रिकेच्या भौगोलिक ज्ञानात अत्यंत मोलाची भर पडली.

समीक्षक : वसंत चौधरी