पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे सांगितली आहेत (योगसूत्र २.२९). ती योगसाधनेच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक आहेत. या अष्टांगांतील पहिले अंग म्हणजे यम होय. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या पाचांचा समावेश पतंजलींनी यमांमध्ये केला आहे. ‘यम् उपरमे’ या धातूपासून यम शब्द तयार झाला आहे. याचा अर्थ ‘थांबविणे’ असा होतो. हिंसा, असत्य, स्तेय, शास्त्रात सांगितलेल्या नियमाच्या विरुद्ध मैथुन, परिग्रह यांचा क्रमश: अभाव म्हणजे अनुक्रमे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह होय.
अहिंसा म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही कोणत्याही जीवाशी द्रोह न करणे. मन, वाणी, कायेने कोणत्याही जीवाविषयी अनिष्ट चिंतन न करणे, तसेच कठोर भाषण किंवा ताडन याद्वारे कोणालाही इजा न करणे म्हणजे अहिंसा होय.
सत्य म्हणजे यथार्थ वाणी. घडलेला प्रसंग अथवा घटना जशी पाहिली असेल; किंवा जे ज्ञान अनुमानाने जसे जाणले असेल अथवा ऐकले असेल त्याप्रमाणे बोलणे. आपल्याला जे समजले असेल, ते दुसऱ्याला सांगताना आपल्या भाषणातून विपरीत बोध किंवा भ्रम होऊ न देणे किंवा दुसऱ्याला न समजणाऱ्या भाषेत न बोलणे म्हणजे सत्य होय. जी वाणी कोणत्याही जीवाच्या नाशाला कारणीभूत होत असेल, तिला सत्य म्हणता येणार नाही. कारण सत्याचे पालन हे अंतिमत: अहिंसेच्या पालनासाठीच असते.
अस्तेय म्हणजे ज्या वस्तूवर आपली सत्ता किंवा मालकी नसेल, ती वस्तू दुसऱ्याच्या अनुमतीवाचून न घेणे. जननेंद्रियाला स्वाधीन ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य.
अपरिग्रह म्हणजे जीवन निर्वाहासाठी आवश्यक तेवढ्याच वस्तूंचा संग्रह करणे. कोणतीही वस्तू मिळविताना श्रम करावे लागतात, नंतर तिचे रक्षण करावे लागते, तिचा नाश होतो, तिच्या सहवासाने आसक्ती तयार होते व या सर्वांमुळे दु:ख प्राप्त होते; म्हणून विषयवस्तूंमधील ह्या दोषांचा विचार करून त्यांचा स्वीकार किंवा संग्रह न करणे ह्याला अपरिग्रह म्हणतात.
या पाच यमांचे संपूर्णतया पालन केले असता त्यांनाच महाव्रत असेही म्हटले जाते. अहिंसा इत्यादी यमांचे आचरण काही अंशी सर्वच जण करीत असतात. परंतु, जेव्हा त्यांचे संपूर्ण पालन केले जाते, तेव्हाच चित्तशुद्धी होऊन त्यांचे फळ प्राप्त होते. जन्म (जाति), देश, काल आणि समय यांच्या मर्यादांपलिकडे जाऊन यमांचे आचरण केले, तर त्यांना सार्वभौम महाव्रत असे म्हणतात (योगसूत्र २.३१). जाति म्हणजे जन्म, देश म्हणजे ठिकाण, काल म्हणजे विशिष्ट दिवस, तिथी, महिना इत्यादी, आणि समय म्हणजे विशिष्ट परिस्थिती होय. उदाहरणार्थ, कोळी फक्त माशांचीच हिंसा करतो, अन्य जीवांची नाही. अन्य प्राण्यांची हिंसा न केल्यामुळे तो अहिंसेचे व्रत आचरण करतो. परंतु, ती अहिंसा माशांव्यतिरिक्त अन्य जीवांसाठी असल्यामुळे सर्वंकष नाही. जेव्हा सर्व प्रकारच्या जीवांसाठी अहिंसेचे पालन होते, त्यावेळी त्याला महाव्रत असे म्हणतात. जर कोळ्याने ‘मी तीर्थक्षेत्री हिंसा करणार नाही’ (‘अन्य ठिकाणी माशांची हिंसा करेन’) असे ठरवले तर ती अहिंसा फक्त त्या विशिष्ट स्थानी पालन केली जात असल्यामुळे देशाने मर्यादित अहिंसा होय; संपूर्ण अहिंसा नाही. कोळ्याने जर ‘मी चतुर्दशीला किंवा अमुक एका पवित्र दिवशी जीवाची हिंसा करणार नाही’ असे ठरवले तर ती काळाने मर्यादित अहिंसा होय. समय म्हणजे अपवादात्मक परिस्थिती होय. उदा., क्षत्रियाने युद्धात केलेली हिंसा. क्षत्रिय युद्धाव्यतिरिक्त अन्यत्र अहिंसेचे पालन करतात; परंतु, ती संपूर्ण, सर्वंकष नसल्यामुळे तिला महाव्रत असे म्हणता येणार नाही. जेव्हा कोणत्याही यमाचे आचरण हे समग्रपणे केले जाते व जे केवळ विशिष्ट जाति, देश, काल आणि समय यांमध्ये मर्यादित नसते, तेव्हा त्याला महाव्रत असे म्हटले जाते.
अहिंसेचे संपूर्ण आचरण केले असता त्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणारे अन्य जीवही वैर भावना सोडून मित्रत्वाने आचरण करतात. सत्याचे संपूर्ण आचरण केले असता योग्याची वाणी सत्य होऊ लागते. अस्तेयाचे संपूर्ण आचरण केले असता अपेक्षा नसतानाही योग्याला बहुमूल्य रत्न इत्यादींची प्राप्ती होऊ लागते. ब्रह्मचर्याचे संपूर्ण आचरण केले असता शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य प्राप्त होते. अपरिग्रहाचे संपूर्ण आचरण केले असता योग्याला आपला जन्म का झाला, कसा झाला याविषयीचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
यमांच्या गणनेविषयी विविध ग्रंथांमध्ये मतभिन्नता आढळते. हठयोगप्रदीपिका आणि बृहद्योगसोपान यात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धैर्य, दया, आर्जव, मिताहार आणि शौच हे दहा यम सांगितले आहेत (हठयोगप्रदीपिका १.१७; बृहद्योगसोपान १.१). श्रीमद्भागवतपुराणानुसार यमांची संख्या १२ असून त्यात अहिंसा, सत्य, अस्तेय, असंग, लज्जा, असंचय, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थैर्य, क्षमा आणि अभय हे १२ यम आहेत (भागवतपुराण ११.१९.३३). शाण्डिल्य उपनिषदानुसार अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, जप, क्षमा, धृति, मिताहार आणि शौच असे १० प्रकारचे यम आहेत (शाण्डिल्य उपनिषद् १.१४ ).
यम-नियमांचा समावेश योगविषयक नीतिशास्त्रात करणे संयुक्तिक ठरेल. यम हा योगानुष्ठानाचा पाया आहे. पतंजली असे म्हणतात की, यमांपासून आरंभ करून समाधीपर्यंतच्या योगाच्या अंगांचे क्रमश: अनुष्ठान केल्यामुळे ज्ञानप्राप्तीला अडथळा आणणाऱ्या चित्तमलाचा सर्वप्रकारे नाश होऊन विवेकख्यातीचे श्रेष्ठ ज्ञान उत्पन्न होते (योगसूत्र २.२८ ).
पहा : अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा, नियम, ब्रह्मचर्य, विवेकख्याति, सत्य.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर