अल्पकालिक संवेदन स्मृतीचा प्रकार. एखादी गोष्ट स्मरणात ठेवणे, याची सुरुवात संवेदन इंद्रियामार्फत होते. मानसशास्त्रज्ञांनी संशोधनांती हे सिद्ध केले आहे की, संवेदन इंद्रियांनाही स्वत:ची स्मृती असते. इंद्रियांच्या या स्मृतीस संवेदनिक स्मृती (Sensory Memory) असे म्हणतात. मानवी संवेदन इंद्रियाचे, म्हणजेच डोळे, कान, नाक, त्वचा यांचे, उत्तेजन झाल्यास सुरुवातीला अल्पकाळासाठी माहिती (क्षणभंगुर माहिती) एका मर्यादेत मज्जासंस्थेद्वारे संवेदनइंद्रिय स्मृतीमध्ये दर्शविली जाते. सर्वच संवेदनइंद्रियांना स्मृती असली, तरी तिचे दोन महत्त्वाचे प्रकार म्हणजे, ‘प्रतिमा (दृश्य) स्मृती’ (Iconic Memory)  व ‘श्राव्य स्मृती’ (Echoic Memory) होय.

आपण ज्या गोष्टी पाहतो, त्या अगदी अल्पकाळासाठी नेत्ररचनांमध्ये साठवून ठेवण्याच्या प्रणालीला प्रतिमा स्मृती म्हणतात. एखाद्या जीवित किंवा अजीवित वस्तूची प्रतिमा किंवा रचना थेट डोळ्यातील पडद्यावर आढळते, त्या प्रतिमेची स्मृती म्हणजेच दृश्यमान अल्पकालीन स्मृती. ती स्मृती म्हणजे दृश्यमान उद्दीपकाचे (बाह्य जगातील दृश्य वास्तू) सुरुवातीचे प्रतिरूपण असून श्राव्य संवेदनिक स्मृती ही दृश्यमान संवेदनिक स्मृतीचे श्रवणविषयक प्रतिरूप आहे.

जॉर्ज स्पर्लिंग यांचे संशोधन :

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉर्ज स्पर्लिंग यांनी प्रतिमा स्मृतीवर सुरुवातीचे संशोधन केले. त्यांनी यासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर केला. स्पर्लिंग (१९६३) यांनी दृश्यमान अल्पकालिक स्मृतीच्या अभ्यासामधील प्रयोगांमध्ये सहभागी व्यक्तींना चौकटीच्या मांडणीत ४ x ३ ओळींमध्ये लिहिलेली अक्षरे व अंक ५० मिलिसेकंदासाठी दाखवली. (एक मिलिसेकंद म्हणजे सेकंदाचा हजारावा भाग). म्हणजेच ही मांडणी सेकंदाचा विसावा भाग इतका कमी वेळ दाखवली गेली.

या अत्यल्प प्रदर्शनानंतर इतक्या कमी वेळात ही माहिती अल्पकालीन स्मृतीमध्ये पोहोचत नाही. त्यामुळे जर व्यक्तीच्या स्मृतीमध्ये ही माहिती नसेल, तर व्यक्तीला या चौकटीच्या मांडणीमधील अक्षरे किंवा अंक सांगता येणार नाहीत. परंतु प्रयुक्तांना जेव्हा ही अक्षरे आणि अंक आठवण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी ३ ते ४ अंक/अक्षरे आठवून सांगितली. ती अक्षरे किती आणि कोणत्या स्थानी लाकडी चौकटीत दाखवली गेली होती. याची चाचणी केली असता प्रयुक्त कोणत्याही ओळीतील फक्त ४ अक्षरे लक्षात ठेऊ शकतात असे निदर्शनास आले. स्पर्लिंग यांनी अक्षरांच्या संख्येत वेगवेगळे बदल करूनही वरील निष्कर्षच मिळत असत. काही प्रयुक्तांनी स्पर्लिंग व इतर संशोधकांच्या हे निर्देशनास आणले, की जरी पहिल्यांदा पाहिल्यावर त्यांना दृश्यपटलावरील सर्व अंक/अक्षरे लक्षात रहात असले तरी, आठवणारी अक्षरे सांगत असताना बरीच पाहिलेली अक्षरे ते विसरत असत. १९३३ मध्ये ब्रिगेडेंना हाच शोध लागला होता. ब्रिगेड आणि स्पर्लिंग यांनी वापरलेल्या या पद्धतीस ‘संपूर्ण अहवाल’ पद्धत म्हटले जाते. ज्यामध्ये सहभागी पाहिलेली सर्व अंक/अक्षरे आठवण्याचा प्रयत्न करीत.

स्पर्लिंग यांनी या पद्धतीत बदल केला. त्यांनी जी नवीन पद्धत वापरली. तिला ‘आंशिक अहवाल’ पद्धती म्हटले जाते. या पद्धतीमध्ये प्रयुक्तांना ३-४ ओळींमधील अंक/अक्षरे दृश्यपटलावर दाखवीत असत. पण यावेळी प्रयुक्तांना केवळ एकाच ओळीतील अंक/अक्षरे संशोधकांना आठवून सांगायची सूचना होती. कुठली ओळ आठवायची त्याची खूण मंद्र, मध्य आणि तार सप्तकातील ध्वनीने केली जाई. या अभ्यासातून हे दिसून आले, की सहभागींना जेव्हा ध्वनीची खूण प्रदर्शनाच्या लगेच आधी किंवा नंतर दाखवली / ऐकवली तेव्हा १२ पैकी ९ चिन्हे माहीत झाली. परंतु, जेव्हा ध्वनीनादाची खूण एक सेकंद उशीरा दाखवली / ऐकवली तेव्हा प्रयुक्तांनी परत १२ पैकी केवळ ४ ते ५ अंक/अक्षरे संशोधकांना सांगितली. यावरून स्पर्लिंग यांनी असा निष्कर्ष काढला की, संपूर्ण अहवाल पद्धत व आंशिक-अहवाल पद्धत या दोन्ही पद्धतींचे निकाल एकसारखे असून दृश्यमान अल्पकालीन स्मृतीची क्षमता १२ घटकांची आहे.

स्पर्लिंग यांना असेही आढळून आले की, प्रतिमा स्मृतीची क्षमता अधिक असली, तरीही ती अत्यल्प कालावधीकरिता माहिती साठवून ठेवते. प्रतिमा स्मृती सुमारे २५० मिलिसेकंद इतक्या काळासाठी माहिती राखून ठेऊ शकते.

स्पर्लिंग यांच्या प्रयोगाच्या निष्कर्षांना अनेक प्रकारची आव्हाने दिली गेली. त्यांतील काही सैद्धांतिक स्वरूपाची होती. आवरबाज आणि कोरियल यांनी अंशत: अहवाल पद्धतीत बदल करून त्याचा वापर केला. त्यांनी प्रत्येकी आठ अशा दोन ओळी दाखविल्या, यावेळी उत्तराची अचूकता ही जवळपास ६५ % इतकी होती.

कोलहर्ट यांनी दृष्टी सातत्य या संकल्पनेचा वापर करून असे मत मांडले, की प्रतिमा स्मृती ही ‘दृष्टी सातत्याचा’ (visible persistence) परिणाम आहे. हा परिणाम द्वि-प्रतियोगी आहे. याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे – एक, प्रतियोगी कालावधी परिणाम (inverse duration effect) म्हणजे उद्दीपक जितका जास्त वेळ दाखवला जाईल, तितके त्याचे दृष्टिसातत्य हे कमी असते आणि दोन, प्रतियोगी तीव्रता परिणाम (inverse intensity effect) म्हणजे उद्दीपक जितका तीव्र असेल, तितके त्याचे दृष्टिसातत्य कमी असते. या दोहोंचा परिणाम हा प्रतिमा स्मृतीवर होतो. त्यामुळे ही संकल्पना वेगळी नाही असे कोलहर्ट मानतात.

प्रतिमा स्मृतीची काही दृश्य महत्त्वपूर्ण उपयोजने पुढीलप्रमाणे आहेत. ही स्मृती अदृश्य प्रतिमांचे सातत्य ठेवण्यासाठी उपयोगी असते. ‘बदलाचे अंधत्व’ ही संकल्पना या स्मृतीने स्पष्ट करता येते. नेत्रलुप्ती  यादरम्यान दृष्ट अनुभवाचे सातत्य टिकवण्यासाठी, चित्रपट पाहताना चित्र-सातत्याचा अनुभव निर्माण करण्यासाठी ही स्मृती उपयोगी आहे.

समीक्षक : मनीषा पोळ