मनोविकृतीच्या या मानसिक आजारास कल्पना क्रिया अनिवार्यता / विचार कृती अनिवार्यता / कल्पना कृती अनिवार्यता असेही म्हटले जाते. या नोंदीत सुलभतेकरिता कल्पना कृती अनिवार्यता या परिभाषेचा वापर केलेला आहे. या विकृतीत प्रामुख्याने दोन घटक दिसून येतात, एक. कल्पना अनिवार्यता आणि दोन, कृती अनिवार्यता होय. कल्पना/विचार अनिवार्यता यात नको असलेला, निरर्थक विचार/आवेग/उर्मी यांचा सातत्याने पुन:पुन्हा अनुभव येतो. जीवनामध्ये काही प्रसंगी अनाहूत विचार वारंवार बोधमनात व्यक्त होत असतात. अगदी इच्छा नसताना देखील मनात शिरलेले असे विचार व्यक्ती निकराने दडपून टाकण्याचा प्रयास करते; पण मनातून ते काढून टाकता येत नाहीत. ते व्यक्तीला त्रस्त करतात, हताश करतात. या समस्येस कल्पना अनिवार्यता असे म्हणतात. कृती अनिवार्यतेत त्याच त्या निरर्थक कृती साचेबद्ध पद्धतीने पुनःपुन्हा करण्याची अगम्य उर्मी निर्माण होते. व्यक्तीला आपण तीच-तीच कृती पुन्हा करत आहोत हे लक्षात येते. त्याच त्या कृतीतील फोलपणा लक्षात येऊनही व्यक्तीला अशा कृतींवर नियंत्रण आणता येत नाही, उलट वारंवार साचेबद्ध पद्धतीने कृती केल्याने व्यक्तीची चिंता कमी होते, तथापि अशी वारंवार कृती करणे आनंददायक नसते.

ही विकृती डी.एस.एम. या परिपत्रकात, अगदी या परिपत्रकाच्या VI-TR या आवृत्तीपर्यंत चिंता विकृतीचा उपप्रकार म्हणून पाहिली गेली. डी.एस.एम. च्या ५ व्या आवृत्तीनंतर मात्र कल्पना कृती अनिवार्यता या विकृतीला स्वतंत्र स्थान देण्यात आले आणि तिचेदेखील उपप्रकार मांडण्यात आले. ते पुढीलप्रमाणे :

१) शरीर बेढबपणा (Body Dysmorphic) : या मानसिक आजारात व्यक्तीला आपल्या दिसण्यात काहीतरी दोष आहे, हा विचार वारंवार मनात येऊ लागतो. जर हा विचार त्यांना काल्पनिक वाटला, तर ते त्यातून लगेच बाहेर येतात; परंतु त्या विचारावर त्यांनी विश्वास ठेवला, तर त्यातून शरीर बेढबपणा विकृती निर्माण होते. पुढे ही विकृती गंभीर रूप धारण करू लागते. सामान्य लोकसंख्येत १ ते २ टक्के लोकांमध्ये ही विकृती दिसून येते. याचेप्रमाण स्त्री व पुरुष दोहोंमध्ये सारखेच असते. तसेच ही विकृती लहान मुलांमध्येदेखील दिसून येते. तज्ञांच्या मते ही विकृती पौगंडावस्थेत निर्माण होण्याची जास्त शक्यता असते.

या विकृतीच्या परिणामातून व्यक्तीच्या सामाजिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो व व्यक्ती समाजापासून दूर जाते. ही विकृती ­असलेली व्यक्ती आपल्याच विचारांमध्ये व्यग्र होते व शरीरातील बेढबपणा शोधण्याचा व त्याकरिता पुष्टी देणाऱ्या गोष्टींचा आधार शोधण्याचा प्रयत्न करते. ही कल्पना कृती स्वरूपाची विकृती आहे. ही तीव्र अवसाद विकृती, सामाजिक चिंता विकृती, अंमली पदार्थ सेवन विकृती यांच्यासोबत निर्माण होते. हीची तीव्रता वाढली तर व्यक्ती आत्महत्येचादेखील विचार करते. ही विकृती मनोचिकित्सक आजारांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. याची कारणे आनुवंशिकता, वैकासिकता, व्यक्तिमत्त्व आणि सामाजिकता इत्यादी घटकांमध्ये दिसून येतात. यावर बोधनिक-वर्तन उपचार पद्धती अधिक प्रभावीपणे काम करताना दिसून येते.

२) संग्रह करण्याची विकृती (Hoarding Disorder) : यामध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह करण्याची वृत्ती व्यक्तीमध्ये दिसून येते. गरजेपेक्षा जास्त झालेल्या वस्तू टाकून देणे, सोडून देणे हे या व्यक्तींना जमत नाही. याची तीव्रता इतकी असते की, त्या गोष्टी त्रासदायक होत असल्या तरीही ते त्या सोडत नाहीत. या व्यक्तींचा संग्रह इतका वाढतो की, त्यातून त्यांचे घर, कामाचे ठिकाण यांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. त्यांच्या या वर्तनातून आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात, आर्थिक भार वाढतो. मित्र व कुटुंबीय यांच्याशी असलेल्या संबंधांवरही या प्रवृत्तीचा विपरीत परिणाम होतो. काहीवेळा तर संग्रह करण्याची तीव्रता इतकी वाढते की, त्यातून दैनंदिन वापरातील जागा मर्यादित होते. त्यामुळे स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे, वस्तूंची जागा बदलणे, झोपण्याकरिता जागाच उपलब्ध नसणे इत्यादी समस्या निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना अनेक अपघातांना किंवा स्वच्छताविषयक, आरोग्यविषयक प्रश्नांना सामोरे जावे लागते.

संग्रह करणे या प्रकारच्या विकृतीवर अगदी अलीकडे संशोधन सुरू झाले आहे. ५ व्या डी.एस.एम. आवृत्तीमध्ये या प्रकारच्या विकृतीस पहिल्यांदा वेगळे स्थान व एक मानसिक विकृती म्हणून मान्यता मिळालेली आहे. संग्रह करणे ही विकृती भिन्न स्वरूपाची आहे की एखाद्या परिस्थितीमधून ही विकृती निर्माण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विकृतीची स्थिती बाल्यावस्थेत सुरू होते, तारुण्यावस्थेत तिचे प्रमाण २ ते ५ टक्के इतके असते. जसजसा संग्रह वाढत जातो तसतसे याची तीव्रता अधिकच गंभीर होत जाते. एक स्थिती अशीही येऊ शकते, की त्या व्यक्तीच्या वर्तनाला कंटाळून त्यांना कुटुंबीय सोडून जातात. अवसाद विकृती, चिंता विकृती अथवा अवधान-अक्षमता विकृती यांच्यासोबत ही विकृती अधिक प्रमाणात दिसून येते. मद्यासक्ती, विभ्रमी छिन्नमनस्कता आदी आजारांमध्ये ही विकृती अधिक प्रमाणात दिसून येते. कुटुंबात संग्रह करण्याची प्रवृत्ती असेल, तर हा आजार अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते.

३) केशोच्छेदी उन्माद विकृती (Trichotillomania) : या विकृतीमध्ये अशी उर्मी असते की, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःचे केस उपटते. ही प्रवृत्ती इतकी प्रबळ होते की, अगदी व्यक्तीच्या डोक्यावर तिची लक्षणे म्हणून टक्कल दिसू लागते. यासोबतच, सामाजिक संबंध दुरावतात व जीवनातील गुणवत्ता कमी झालेली दिसून येते. ही विकृती डी.एस.एम. आवृत्तीमध्ये प्रकरण ५ मानसिक आणि वर्तनविषयक विकृती यांवर दिसून येते. ही विकृती प्रदीर्घ स्वरूपाची असून तीवर उपचार करणे काहीसे कठीण असते.

केशोच्छेदी उन्माद शिशुअवस्थेत असू शकतो; परंतु त्याची तीव्रता वय वर्षे ९ ते १३ दरम्यान अधिक वाढते. याचे प्रमुख कारण अवसाद व तणाव यात असते. सर्वसाधारण लोकसंख्येत या विकृतीचे प्रमाण ०.६ ते ४.० टक्के इतके दिसून येते. तरीही सामाजिक प्रघातांनुसार ही विकृती कमी प्रमाणात व्यक्त होते अथवा निदर्शनास येते. यामध्ये टाळू, भुवया, डोळे, पाय, हात, नाक अथवा जननेंद्रीय या ठिकाणचे केस उपटण्याची प्रवृत्ती दिसून येते.

४) त्वचा खेचण्याची विकृती (Excoriation Disorder) : या विकृतीतील प्रमुख लक्षणे म्हणजे व्यक्ती स्वतःची त्वचा चिमटीत पकडून खेचते. अशा पद्धतीने त्वचा खेचण्याची वारंवार उर्मी रुग्णात दिसून येते. ही उर्मी इतकी असते की त्यांतून रुग्णाच्या त्वचेला इजा होते. काही मानसोपचारतज्ञांच्या मते मात्र या प्रकारची उर्मी अंमली पदार्थांच्या प्रभावातून घडून येते. या प्रकारच्या आजारावर उपचार करण्याकरिता औषधी अथवा वर्तन बदल हे प्रयोग करावे लागतात.

वरील प्रकारच्या विकृतींवर बोधनिक वर्तनोपचाराचा उपयोग होतो. या उपायांनी रुग्णाला चिंतामुक्त ठेवण्याचा व तीच ती वारंवार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘एक्स्पोजर अँड रिच्युअल प्रिव्हेन्शन’ हे तंत्र वापरून कोणतीही गोष्ट रुग्णाला हळूहळू करायला सांगितली जाते. अतिशय तीव्र स्वरूपाच्या विकृतीमध्ये रुग्णांसाठी विद्युत् उपचार व काहीवेळा मानसशल्यचिकित्सा यांचाही वापर करतात.

समीक्षक : मनीषा पोळ