एक मनोविकृती. या मानसिक आजारास कल्पना क्रिया अनिवार्यता / विचार कृती अनिवार्यता / कल्पना कृती अनिवार्यता असेही म्हटले जाते. या नोंदीत सुलभतेकरिता कल्पना कृती अनिवार्यता या परिभाषेचा वापर केलेला आहे. या विकृतीत प्रामुख्याने दोन घटक दिसून येतात, एक कल्पना अनिवार्यता आणि दोन, कृती अनिवार्यता होय. कल्पना/विचार अनिवार्यता यात नको असलेला, निरर्थक विचार/आवेग/उर्मी यांचा सातत्याने पुन्हा पुन्हा अनुभव येतो. हे विचार मनात घर करून बसतात. उदा., एखादा चित्रपट पाहात असताना, डोळ्यात धुळीचा कण गेल्यास इच्छा नसतानाही वारंवार डोळ्यातील सल लक्ष वेधून घेतो. याप्रमाणेच जीवनामध्ये काही प्रसंगी अनाहूत विचार वारंवार बोधमनात व्यक्त होत असतात, अगदी इच्छा नसताना देखील मनात शिरलेले असे विचार व्यक्ती निकराने दडपून टाकण्याचा प्रयास करते; पण मनातून ते काढून टाकता येत नाहीत. ते व्यक्तीला त्रस्त करतात, हताश करतात. या समस्येस कल्पना अनिवार्यता असे म्हणतात.

कृती अनिवार्यतेत त्याच त्या निरर्थक कृती साचेबद्ध पद्धतीने पुनःपुन्हा करण्याची अगम्य उर्मी निर्माण होते. व्यक्तीला आपण तीच-तीच कृती पुन्हा करत आहोत हे लक्षात येते. त्याच त्या कृतीतील फोलपणा लक्षात येऊनही व्यक्तीला अशा कृतींवर नियंत्रण आणता येत नाही, उलट वारंवार साचेबद्ध पद्धतीने कृती केल्याने व्यक्तीची चिंता कमी होते, तथापि अशी वारंवार कृती करणे आनंददायक नसते.

सर्वसामान्य लोकांमध्येदेखील कल्पना अनिवार्यता दिसून येते, परंतु तिचे प्रमाण अतिशय अल्प असते. उदा., बागेत फेरफटका मारत असताना, ‘आपण बाहेर निघताना गॅलरीचे दार बंद केले आहे ना ?’ असा विचार वारंवार मनात येऊ शकतो; परंतु सामान्यांच्या बाबतीत ते विचार जाताच व्यक्तीकडून ठरविलेले काम पूर्ण केले जाते. पण कल्पना अनिवार्यतेत, व्यक्तीने आपले विचार मनात दडपून कितीही कामावर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला, तरीही त्याला ते जमत नाही. थोडक्यात, वर दिलेल्या उदाहरणात अपसामान्य व्यक्ती एकतर बागेत फेरफटका मारणे बंद करून घराकडे पळत जाईल किंवा चालण्याऐवजी एकाच जागी गॅलरीचे दार यावर काळजीयुक्त विचार करत बसेल. शिवाय, अपसामान्य व्यक्तींच्या बाबतीत कुठलेतरी बेत व हिंसक विचार त्यांच्या मनात सतत घोळत असतात, जास्त प्रमाणात दिसून येणारी कल्पना अनिवार्यता ही हिंसकता, लैंगिकता, आध्यात्मिक विचारांचे अध:पतन अशा स्वरूपाची असते.

कृती अनिवार्यता हा कल्पना अनिवार्यतेचा परिणाम असतो, यात केलेली कृती ही आशयहीन असते. सर्वसाधारण जास्त प्रमाणात दिसून येणारी कृती अनिवार्यता स्वच्छता करणे व मोजणे अशा स्वरूपाची असते.

लक्षणे (Symptoms) : कल्पना-कृती अनिवार्यता असणाऱ्या व्यक्तीच्या मनात सातत्याने अनावश्यक कल्पना येत असतात. उदा., संशयी स्वरूपाची भीती, गोष्टी बिनचूक व खूपच काटेकोर पद्धतीने व्हाव्यात, अशा पद्धतीची अनावश्यक काळजी इत्यादी अस्वस्थ करणारे विचार वारंवार व्यक्तीच्या मनात येत असतात. जसे, ‘हा चेंडू पूर्णतः स्वच्छ नाही, मला हा धुवत राहावयास हवा’, ‘मी दार उघडेच ठेवले वाटते’, ‘मी पत्रावर तिकीट चिकटवलेले नाही’, ‘मी इमेल खाते व्यवस्थित बंद केले का?’ वगैरे. वारंवार येणारे असे विचार असमाधानकारक व चिंता निर्माण करणारे असतात.

या विचारांना प्रतिक्रिया म्हणूनच, बरेच लोक वारंवार एखादी कृती करतात. त्यालाच कृती अनिवार्यता म्हणतात. यात तपासणे व स्वच्छ करणे, ही लक्षणे दिसून येतात. इतर अनिवार्य वर्तनात वारंवार तेच वर्तन करणे, वस्तू जतन करणे, पुनर्मांडणी, मोजणे इत्यादी लक्षणे दिसतात. एखादी म्हण अथवा यादी पुनःपुन्हा म्हणणे हादेखील अनिवार्यतेचाच प्रकार आहे. या लोकांची ही कृती अनिवार्यता त्यांना व त्यांच्यासोबत असणाऱ्यांना त्रासदायक ठरते.

कल्पना-अनिवार्यता असलेल्या काही लोकांकडून विशिष्ट वर्तन घडत असते. मनातील चिंता कमी करण्यासाठी एखादी कृती वारंवार त्याच-त्याच पद्धतीने करणे, यांतून त्यांना अल्प कालावधीकरिताच चिंतेतून मुक्तता मिळत असते. ही कल्पना अनिवार्यता का आहे ?, याबाबत हे लोक अर्थहीन तर्क मांडत असतात. अर्थात, काहीवेळा त्यांच्यातील सवयी अवास्तव आहेत हे ते मान्यही करतात. त्यांच्या मनातील भीती (चिंता) बाबत साशंक असतात, किंवा त्यांच्या विचाराबाबत फारच ठाम असतात. कल्पना कृती अनिवार्यता असलेले काही लोक त्यांच्या व्यस्त कामकाजात (कामाचे ठिकाण अथवा शाळेतील वेळ) या अनिवार्यतेवर नियंत्रण ठेवतात; परंतु जेव्हा व्यस्त कामकाजातून हे मोकळे होतात. तेव्हा ही अनिवार्यता अधिक प्रबळ होते, इतकी की, ती एक अतिरिक्त चिंता म्हणून भेडसावते. कल्पना कृती अनिवार्यता ही विकृती वर्षभर किंवा एखाद्या दशकापर्यंत रुग्णांत दिसून येते. वेगवेगळ्या कालखंडांत या आजाराची लक्षणे कमीअधिक प्रमाण बदललेली असतात.

समीक्षक : मनीषा पोळ