ही एक वर्तनविषयक विकृती आहे. हा एक मेंदूचा आजार असून त्यात रुग्णाचे एका विशिष्ट प्रकारे वर्तन दिसून येते. अनेकदा पालक मुले अजिबात स्वस्थ बसत नाहीत, सतत गडबड करतात, अभ्यासात लक्ष केंद्रित करत नाहीत अशा तक्रारी करतात. या तक्रारी जर तीव्र स्वरूपाच्या असतील, तर अशी मुले मस्तीखोर अथवा हूड असण्यापेक्षा या विकृतीने त्रस्त असण्याचा संभव असतो. पण एखादे मूल खूप मस्ती करत असेल, तर त्याला ही विकृती आहे किंवा तो भारी बंडखोर आहे असे ठरविण्यापेक्षा त्याचे निदान मानसोपचार तज्ञांकडून करून घेणे योग्य होय.

कारणे : अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता ही विकृती होण्यामागे आनुवंशिकता, मेंदूच्या संरचनेमध्ये बिघाड, अकाली प्रसवामुळे झालेला बालकाचा जन्म, मातेने गर्भावस्थेत केलेली व्यसने इत्यादींपैकी एक किंवा अनेक कारणे असू शकतात; पण याबाबतचे खात्रीशीर कारण अद्याप अज्ञात आहे.

लक्षणे : अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता ह्या विकृतीची लक्षणे साधारणत: मुलांच्या ३ – ६ या वयोगटात प्रामुख्याने आढळतात. लहान मुलांमध्ये ही विकृती जास्त दिसून येत असली, तरी प्रौढांमध्येही  तिचा त्रास असू शकतो. मुलींपेक्षा मुलांमध्ये ही विकृती जास्त प्रमाणात आढळते. वयपरत्वे या विकृतीची लक्षणे बदलत जातात .

ही विकृती जीवघेणी अथवा भयंकर नसली तरीही तिच्यामुळे मुलांच्या शालेय जीवनावर तसेच व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी त्याच्या कामावर परिणाम होतो.

अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता ह्या विकृतीत दिसणारी लक्षणे प्रामुख्याने तीन प्रकारांत मोडतात.

१. अवधान अस्थिरता (Lack of Attention / Attention Deficit)

२. अतिक्रियाशीलता (Hyperactivity)

३. आवेगशीलता (Impulsivity)

१. अवधान अस्थिरता : यामध्ये एकाग्रतेचा अभाव असणे, क्षणोक्षणी नवीन ठिकाणी लक्ष जाणे, एका ठिकाणी लक्ष नसल्याने छोट्या छोट्या चुका करणे, मोठ्या सूचनांकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांच्यावर सोपवलेली कामे न जमणे, तंद्री लागणे इत्यादी वर्तनबदल दिसतात. विसराळूपणामुळे छोटी कामे पूर्ण करण्यात पंचाईत होते. तसेच चष्मा, पेन, भ्रमणध्वनी, पाकीट, पुस्तके इत्यादी गोष्टी हरवण्याच्या तक्रारीही रुग्ण सतत करत असतात.

एकाग्रतेच्या अभावामुळे बराच वेळ चालणारे भाषण किंवा बोलणे रुग्णांना आवडत नाही. लक्ष केंद्रित करता येत नसल्याने व्यवस्थितपणे कोणतेही काम सलग करता येत नाही. ज्या कामामध्ये चिकाटी लागते, ती कामेसुद्धा त्यांना आवडत नाहीत. अशा चंचल वागण्यामुळे त्यांना एखादा छंद जोपासणे जमत नाही. तसेच एखादे वेळखाऊ अथवा दीर्घ चालणारे काम या लोकांना कंटाळवाणे वाटते. परिणामी त्यांची अस्वस्थता वाढते आणि ते क्रियाशील होऊ लागतात. तसेच त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.

२. अतिक्रियाशीलता : यात एका जागी स्वस्थ न बसणे, सतत चुळबूळ करत राहणे, बसल्याजागी उड्या मारत राहणे, बैठे खेळ खेळण्याचा कंटाळा येणे, सतत बडबड करणे (वाचाळता) इत्यादी लक्षणे दिसतात. लहान मुले स्वस्थपणे बसू शकत नाहीत. त्यांच्या वयाला शोभेल असे इकडून तिकडे सतत पळत असतात, तर प्रौढ मंडळी मात्र अस्वस्थ असतात. सतत पेन, शर्टची बटणे यांच्याशी खेळत असतात.

३. आवेगशीलता : यात हे लोक संभाषणात इतरांचे वाक्य पूर्ण होण्याची वाट पाहत नाहीत. खेळताना, रांगेत किंवा बोलतांना आपली पाळी येण्याची वाट बघणे यांना अवघड जाते. इतरांचे बोलणे मध्येच तोडून ही मंडळी बोलायला लागतात. प्रश्न पूर्ण होण्याआधी उत्तर देणे, पुढचा फारसा विचार न करता निर्णय घेणे अशी लक्षणेही आवेगशीलतेमुळे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता या विकृतीत आढळतात. भावनावेग आवरणेसुद्धा यांना कठीण जाते.

उपाययोजना : औषधोपचार आणि मानसोपचार यांच्या मदतीने या विकृतीवर मात करता येते. औषधोपचाराच्या मदतीने लक्ष केंद्रित होणे, चुळबुळेपणा कमी होणे, कामामध्ये सुसूत्रता येणे इत्यादी बदल दिसू शकतात. मात्र औषधे सुरू असताना वैद्यकीय सल्ला पूर्णपणे अंमलात आणणे गरजेचे असते. त्याचबरोबर मानसोपचारही आवश्यक असतात. वर्तन उपचार पद्धतीचा अवलंब करूनही रुग्णांमध्ये गुणात्मक फरक आणता येतो.

रुग्णांसोबतच कुटुंबियांचेही समुपदेशन महत्त्वाचे असते. घरातील सदस्य, शिक्षक, मित्र यांच्यासोबत समुपदेशनाचे सत्र आखता येते. घरचे वातावरण सकारात्मक असेल यावर भर दिला पाहिजे. रुग्णाचे असे जेरीस आणणारे वर्तन तो मुद्दाम करत नाही, त्यामुळे त्याला शिक्षा करणे योग्य नाही हे लक्षात ठेवावे. अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता या विकृतीने ग्रस्त रुग्ण विशेष आहे असे समजून त्याला जास्तीत जास्त प्रेम द्यावे. त्याचा आत्मविश्वास कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच्या छोट्या छोट्या कामगिरीचे, यशाचे यथोचित कौतुक करावे. स्वयंशिस्त, स्वावलंबन इत्यादी बाबींवर भर द्यावा. त्याचे दैनंदिन वेळापत्रक फारसे बदलणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला समजतील अशा कमीतकमी शब्दांत सूचना द्याव्या.

प्रतिबंधात्मक उपाय : आपल्या बालकाला ही विकृती होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त श्रेयस्कर आहे. मूल जन्माला येण्याआधीपासून काळजी घ्यावी. गर्भावस्थेत मातेने व्यसनापासून दूर राहणे, रासायनिक गोष्टींशी संपर्क टाळणे, पौष्टिक अन्न घेणे, मातेने अपघातापासून स्वत:ला आणि नवजात बालकाला वाचवणे असे उपाय अंमलात आणावेत. औषधोपचार, रुग्णाचे स्वत:चे प्रयत्न आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या जवळच्या व्यक्तींचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे  हे रुग्ण सर्वसामान्य,  आनंदी व सुकर जीवन जगू शकतील .

समीक्षक : मनीषा पोळ