अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ आणि क्षेत्रीय मानसशास्त्राचा प्रणेता कुर्ट ल्यूइन याने मानसशास्त्रीय घटनांचे वर्णन आणि उपपादन करण्यासाठी गणित, पदार्थशास्त्र, रसायनशास्त्र या शास्त्रांतील संकल्पनांचा उपयोग केला. विशेषत: अवकाशसंबंधशास्त्र या गणिताच्या शाखेची भूमिका स्वीकारून त्याने मानसशास्त्रीय वस्तुस्थितीचे वर्णन ‘क्षेत्र’ किंवा ‘जैव-अवकाश’ असे केले. त्याच्या भूमिकेतील या मूलभूत संकल्पनांवरून त्याच्या मानसशास्त्रीय उपपत्तीला ‘क्षेत्रीय उपपत्ती’ किंवा ‘अवकाशसंबंधशास्त्रीय मानसशास्त्र’ असे म्हटले जाते. ल्यूइनने मानवी वर्तनाच्या प्रेरक घटकांचे वर्णन शक्तिरेषा (व्हेक्टर) या पदार्थशास्त्रातील संकल्पनेनुसार केले. म्हणून त्याच्या उपपत्तीला ‘शक्तिरेषा विश्लेषण’ किंवा ‘शक्तिरेषा मानसशास्त्र’ असेही म्हणतात. ल्यूइनच्या भूमिकेनुसार मानवी वर्तन म्हणजे व्यक्तीची मानसशास्त्रीय गती होय. या दृष्टीने मानसशास्त्र ही गतिशास्त्राची एक शाखा मानता येईल. मानसशास्त्र म्हणजे ‘मानसगतिशास्त्र’. व्यक्तिवर्तन हे विशिष्ट वेळी असलेल्या क्षेत्रीय परिस्थितीवर अवलंबून असते. असेही ल्यूईनने मांडले आहे.
संशोधनकार्याच्या प्रारंभी ल्यूइनने सहयोजनवादी भूमिका स्वीकारली होती; परंतु बर्लिन विद्यापीठात केलेल्या संशोधनावरून त्याची अशी खात्री झाली, की सहयोजनवाद अपूर्ण आणि सदोष आहे. सहयोजन ही केवळ एक रचना आहे. या रचनेला शक्तिद्वारा चालना मिळाल्याशिवाय तिचे कार्य होऊ शकत नाही. मानवी वर्तनाची उपपत्ती लावण्यासाठी रचनावादी भूमिका सोडून गतिवादी भूमिका स्वीकारली पाहिजे. समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांची ‘समष्टी’ ही संकल्पना ल्यूइनने स्वीकारली होती. जैव-अवकाश, मानस-परिस्थिती, व्यक्तित्व इ. क्षेत्रीय मानसशास्त्राच्या दृष्टीने ‘समष्टि’रूपच आहेत; तथापि, ल्यूइनने असे प्रतिपादन केले, की कोणत्याही एका संकल्पनेच्या साहाय्याने – मग ती संकल्पना सहयोजनाची असो, सहजप्रवृत्तीची असो की समष्टीची असो – सर्व मानसशास्त्रीय घटनांची उपपत्ती देणे शक्य नाही, तसा प्रयत्न करणे दुराग्रहाचे ठरेल. मानसशास्त्रीय घटनांचे अधिक नेमकेपणाने वर्णन करता यावे आणि मानसशास्त्रीय सिद्धांत अधिक तंतोतंतपणे मांडता यावेत, यांसाठी ल्यूइनने अनेक शास्त्रांतील विविध संकल्पनांचा उपयोग केला.
मानसशास्त्रीय वस्तुस्थितीचे वर्णन करताना ल्यूइनने अवकाशसंबंधशास्त्राची भूमिका घेतली. एकूण वस्तुस्थिती हा एक विस्तीर्ण अवकाश मानला, तर मानसशास्त्रीय वस्तुस्थिती हा त्या अवकाशाचा एक भाग होय. या मानसशास्त्रीय क्षेत्राला ल्यूइनने जैव-अवकाश अशी संज्ञा दिली.जैव-अवकाशामध्ये व्यक्ती आणि तिची मानस-परिस्थिती या दोहोंचा समावेश होतो. म्हणून जैव-अवकाश व्यक्ती मानस-परिस्थिती असे समीकरण मांडता येईल. जैव-अवकाश हा एक गतिमान संघात आहे. व्यक्तित्वांतर्गत घटकांचा व्यक्तित्वावर परिणाम होतो, तसा मानस-परिस्थितीतील घटकांचा व्यक्तित्वावर परिणाम होतो. गणिताच्या परिभाषेत, व्यक्तित्व हा मानस-परिस्थितीचा अनुपरिवर्तक आहे आणि मानस-परिस्थिती हा व्यक्तित्वाचा अनुपरिवर्तक आहे.
ज्याप्रमाणे जैव-अवकाश हा एक संघात आहे, त्याप्रमाणे व्यक्तित्व आणि मानस-परिस्थिती हे त्या अवकाशाचे विभागही संघातस्वरूपाचे आहेत. व्यक्तित्वाचे विश्लेषण केले असता, त्यात पुढील प्रकारचे खंड असल्याचे दिसते : व्यक्तित्वाच्या बाह्य आवरणाप्रमाणे असलेला खंड हा कारक-बोधक खंड होय. या खंडाच्या आत परिसरखंडांची रचना असते. त्याच्या आतील भागात अंतस्थ-व्यक्तित्व खंडांची रचना असते. अहंकेंद्र हा अंतस्थ-व्यक्तित्व खंडांचा मध्यबिंदू असतो. हे व्यक्तित्वांतर्गत खंड परस्परसंबद्ध असून ते परस्परांवर परिणाम करू शकतात. व्यक्तीची मानस–परिस्थिती म्हणजे विवक्षित क्षणी, व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या सर्व वस्तुघटकांचा संघात होय. या संघातातील प्रत्येक वस्तुघटक म्हणजे मानस-परिस्थितीचा खंड होय.
प्रत्येक खंडाला इतर खंडांपासून भिन्न करणारी सीमा असते. सीमांचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्यांची वहनक्षमता. सर्व सीमा वहनक्षम असतील असे नाही. ज्या दोन खंडांच्या दरम्यान वहनक्षम सीमा असतेते खंड परस्परांवर परिणाम करू शकतात. ज्या खंडांच्या दरम्यान वहनक्षम सीमा नाही, असे खंड परस्परांच्या जवळ असले तरी ते परस्परांवर परिणाम करू शकत नाहीत. अर्थात, वहनक्षमता हे सीमांचे स्थिर लक्षण नाही.त्या लक्षणात बदल होणे शक्य आहे.
जैव-अवकाश द्विपरिमाणी नाही. वास्तवता परिमाण हे त्या अवकाशाचे तिसरे महत्त्वाचे परिमाण होय. या परिमाणाच्या दृष्टीने जैव-अवकाशाच्या वास्तव पातळी, वैचारिक पातळी, काल्पनिक पातळी इ. कमीअधिक वास्तवतेच्या पातळ्या मानता येतात. या सर्व पातळ्यांवर मानसशास्त्रीय वस्तुस्थितीच्या जणू प्रतिकृती असतात; मात्र ज्या सीमा वास्तव पातळीवर वहनक्षम नसतात, त्या काल्पनिक पातळीवर वहनक्षम होतात.
आतापर्यंत जैव-अवकाशाच्या रचनेचे अवकाशसंबंधशास्त्रीय वर्णन झाले. जैव-अवकाशात होणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाचे वर्णन ल्यूइनने ‘स्थानांतरण’ असे केले आहे. हे स्थानांतरण म्हणजे व्यक्तीची शारीरिक हालचाल, अथवा व्यक्तीने प्रत्यक्षतः एक स्थान सोडून दुसऱ्या स्थानीजाणे नव्हे. मानसशास्त्रीय स्थानांतरण म्हणजे व्यक्तीने मानस-परिस्थितीतील इष्ट खंडात प्रवेश करणे. स्थानांतरण वास्तवतेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर होणे शक्य आहे. सहलीला जाणे हे जसे स्थानांतरण आहे तशी सहलीची योजना आखणे आणि सहलीची कल्पनाचित्रे रंगविणे ही स्थानांतरणेच होत.
स्थानांतरणाला ज्या प्रक्रियेने प्रेरणा मिळते, तिचे क्षेत्रीय मानसशास्त्राच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे वर्णन करता येईल : व्यक्तीच्या ठिकाणी एखादी गरज निर्माण झाल्यामुळे किंवा मानस-परिस्थितीतील काही वस्तुघटकांच्या प्रभावाने व्यक्तीच्या ठिकाणी मानसिक ताण निर्माण होतो. मानसिक ताणामुळे व्यक्तीचा समतोल बिघडतो आणि विषमतोलाची अवस्था प्राप्त होते. विषमतोल नाहीसा करून समतोल साधणे हे सर्व वर्तनांचे अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणून विषमतोलाची अवस्था प्राप्त झाली असता, व्यक्तीचा पूर्ववत समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि व्यक्तीने योग्य ते स्थानांतरण केले म्हणजे तिचा मानसिक ताण कमी होऊन समतोल साधतो. स्थानांतरणाखेरीज अन्य उपायांनीही समतोल साधणे शक्य आहे. काही वेळा व्यक्तित्वाच्या एका अंतस्थ खंडातील मानसिक ताण इतर अंतस्थ खंडांमध्ये पसरल्याने समतोल साधेल. काही वेळा मानसिक ताणाचा आविष्कार अस्वस्थ शारीरिक हालचालींमध्ये झाल्याने मानसिक ताण कमी होऊन समतोल साधेल. काही वेळा काल्पनिक पातळीवरील स्थानांतरणाने मानसिक ताण कमी होऊन समतोल साधेल. अशा वेगवेगळ्या मार्गांनी समतोल साधणे शक्य असले, तरी वास्तव पातळीवरील अनुरूप स्थानांतरण हा समतोल साधण्याचा नेहमीचा स्वाभाविक मार्ग होय.
व्यक्तीच्या स्थानांतरणाची दिशा पुढीलप्रमाणे ठरते : मानस-परिस्थितीतील सर्व वस्तुघटक समान मूल्यांचे नसतात. काही वस्तुघटक व्यक्तीची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने इष्ट असतात. काही वस्तुघटक व्यक्तीची गरज पूर्ण होण्याच्या मार्गांत अडथळे आणणारे म्हणून अनिष्ट असतात. इष्ट वस्तुघटक धन मूल्याचे आणि अनिष्ट घटक ऋण मूल्याचे असतात. ल्यूइनच्या परिभाषेत मानस-परिस्थितीच्या ज्या खंडांत प्रवेश केल्याने मानसिक ताण कमी होतो, ती धन मूल्ये आणि ज्या खंडांत प्रवेश केल्याने मानसिक ताण वाढतो ती ऋण मूल्ये होत. धन मूल्ये व्यक्तीला आकर्षितात तर ऋण मूल्ये अपकर्षितात.
धन मूल्यांच्या आकर्षणामुळे आणि ऋण मूल्यांच्या अपकर्षणामुळे व्यक्तीवर होणारा परिणाम शक्तिरेषांच्या साहाय्याने दाखविता येतो. शक्तिरेषा बाणाच्या आकृतीची असते. या बाणाची लांबी शक्तीचे बल दर्शविते, बाणाची दिशा शक्तीच्या कार्याची दिशा दर्शविते आणि बाणाचे टोक शक्तीच्या कार्याचा बिंदू दर्शविते. व्यक्तीवर एकाच शक्तीचा परिणाम होत असेल, तेव्हा व्यक्तीचे स्थानांतरण शक्तिरेषेच्या दिशेने आणि अनुरूप वेगाने होते. व्यक्तीवर एकाच वेळी एकाहून अधिक शक्तींचा परिणाम होत असल्यास, व्यक्तीच्या स्थानांतरणाची दिशा आणि वेग सर्व शक्तींच्या संयुक्त-परिमाणानुसार असतात.
व्यक्तिवर्तनाच्या या उपपत्तीमध्ये गरज ही एक केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे. गरजेमुळे मानसिक ताण निर्माण होऊन व्यक्तीचा समतोल बिघडतो, मानस-परिस्थितीतील वस्तुघटकांना मूल्ये प्राप्त होतात, व्यक्तीवरमानसशास्त्रीय शक्ती कार्य करू लागतात आणि व्यक्तीचे अनुरूप स्थानांतरण होते. व्यक्तीच्या गरजांचे ल्यूइनने दोन स्थूल वर्ग मानले आहेत : काहीगरजा या स्वाभाविक गरजा असतात. उदा., अन्नाची गरज ही स्वाभाविक गरज होय. काही गरजा कृतक गरजा असतात. उदा., विशिष्ट ठिकाणी विशिष्ट अन्नपदार्थ खाण्याची गरज ही कृतक गरज होय.
व्यक्तीची स्थानांतरणाची क्रिया नेहमीच सुलभतेने होत नाही. अनेकवेळा स्थानांतरणाला काही घटकांमुळे बाध येतो. दोन खंडांच्या दरम्यान असलेली सीमा व्यक्तीला सहज ओलांडता येत नाही. व्यक्तीच्या उद्दिष्टप्राप्तीच्या मार्गात अडथळा आणणारे हे घटक ‘गतिरोधक’ होत. गतिरोधकांमुळे व्यक्तीच्या स्थानांतरणाची क्रिया नेहमीच कुंठित होत नाही. काही वेळा व्यक्ती गतिरोधकांवर मात करून इष्ट स्थानांतरण करील. काही वेळा, एका मार्गात प्रबल गतिरोधक असल्यास, वेगळ्या मार्गाने स्थानांतरण करील. इष्ट स्थानांतरणाच्या एकमेव मार्गात प्रबल गतिरोधक असल्यास पर्यायी स्थानांतरण करील. इष्ट स्थानांतरण अशक्य झाल्यास आणि अन्य उपायही न सापडल्यास व्यक्तीचा मानसिक ताण कमीहोत नाही. त्यामुळे व्यक्तीची अवस्था विषमतोलाची होते.
जैव-अवकाशात, म्हणजे व्यक्तित्वात आणि मानस-परिस्थितीत, विवक्षित क्षणी जे वस्तुघटक उपस्थित असतात त्यांच्या परस्परांवरील परिणामाने व्यक्तिवर्तन कसे होते याचे विवेचन झाले. परंतु मानस-परिस्थितीतील वस्तुघटकांची रचना स्थिर नसते. त्याचप्रमाणे व्यक्तित्वातील वस्तुघटकांची रचनाही स्थिर नसते. क्षेत्रीय मानसशास्त्राच्या परिभाषेत व्यक्तित्व आणि मानस-परिस्थिती या दोन्ही अवकाशविभागातील खंडांचे प्रतिक्षणी पुनर्रचन होत असते, एका क्षणी व्यक्तीच्या मानस-परिस्थितीत असलेले काही वस्तुघटक दुसऱ्या क्षणी वगळले जातील, तर एका क्षणी मानस-परिस्थितीत नसलेले वस्तुघटक दुसऱ्या क्षणी तीमध्ये प्रवेश करतील. वस्तुघटकांची संख्या बदलली म्हणजे सीमांची संख्या बदलेल, सीमांच्या वहनक्षमतेत बदल होईल, वस्तुघटकांची मूल्ये बदलतील. अशा वेगवेगळ्या रीतींनी मानस-परिस्थितीचे पुनर्रचन होते. तसेच व्यक्तित्वाचेही संभवते.
व्यक्तित्वाच्या विकसनक्रियेमध्ये जे पुनर्रचन होते त्यामध्ये ‘जटिली-भवन’ ही ल्यूइनच्या मते महत्त्वाची क्रिया होय. ‘जटिलीभवना’ची व्याख्या – ‘संघातातील घटकांच्या संख्येत वाढ होणे’ अशी केली आहे. नवजात बालकाचे व्यक्तित्व अविभक्त संघाताच्या स्वरूपाचे असते. व्यक्तित्व आणि मानस-परिस्थिती यांच्या परस्परांवरील प्रतिक्रियांमुळे व्यक्तित्वाचे जटिलीभवन होते. प्रथमतः कारक-बोधक खंड वेगळा होतो. मग क्रमशः व्यक्तित्वांतर्गत खंडांचे स्मृतिखंड, प्रतिमाखंड इ. खंडांमध्ये विभाजन होते. वास्तवतेच्या पातळ्या अधिकाधिक स्पष्टपणे विभक्त होतात. व्यक्तित्वांतील खंडांची संख्या वाढली म्हणजे सीमांची संख्या वाढते. या सीमांच्या लक्षणांमध्येही बदल होत जातो. अशा रीतीने विकसनप्रक्रियेत व्यक्तित्व अधिकाधिक जटिल होत जाते. बालकांच्या व्यक्तित्वाच्या तुलनेने प्रौढांचे व्यक्तित्व स्वाभाविकपणे अतिशय जटिल बनलेले असते.
व्यक्तिवर्तनासंबंधी ल्यूइनने तीन तत्त्वे सांगितली : (१) संबद्धता तत्त्व – मानवी वर्तन ही मानसशास्त्रीय घटना जैव-अवकाशतील दोन अथवा अधिक वस्तुघटकांच्या परस्परप्रतिक्रियेतून उद्भवते, केवळ एका वस्तुघटकामुळे कोणतीही मानसशास्त्रीय घटना घडत नाही. (२) मूर्ततातत्त्व – मूर्त वस्तुघटकांमुळेच मानसशास्त्रीय घटना घडतात. अमूर्त म्हणजे सुप्त किंवा अबोध वस्तुघटकांमुळे मानसशास्त्रीय घटना घडत नाहीत. (३) समकालीनता तत्त्व – वर्तमानकालीन वस्तुघटकांमुळेच वर्तमानकालीन मानसशास्त्रीय घटना घडतात. भूतकालीन किंवा भविष्यकालीन वस्तुघटकांचा वर्तमानकालीन मानसशास्त्रीय घटनांवर परिणाम होऊ शकत नाही.
सारांश, विवक्षित क्षणी जैव-अवकाशात उपस्थित असलेल्या दोन किंवा अधिक मूर्त वस्तुघटकांच्या परस्परप्रतिक्रियांमुळे त्या क्षणीची मानसशास्त्रीय घटना घडते.
ल्यूइनने असे प्रतिपादन केले, की क्षेत्रीय मानसशास्त्र ही इतर अनेक उपपत्तींप्रमाणे केवळ एक मानसशास्त्रीय उपपत्ती नसून ती मानसशास्त्राची नवीन विचारपद्धती आहे. व्यक्तीच्या आणि समूहाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी स्वीकारावयाची ती एक भूमिका आहे. बालमानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र इत्यादी मानसशास्त्राच्या सर्व शाखांत या भूमिकेचा स्वीकार व्हावा असा ल्यूइनचा आग्रह होता. याकरिता त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विविध प्रश्नांसंबंधी क्षेत्रीय मानसशास्त्राच्या भूमिकेवरून प्रायोगिक संशोधन करून या भूमिकेची उपयुक्तता दाखविली.
एखाद्या व्यक्तीला उद्दिष्टप्राप्तीच्या प्रयत्नात अपयश आल्याने जी वैफल्यभावना निर्माण होते, त्यामुळे व्यक्तीच्या वर्तनात बदल होतो आणि प्रौढ व्यक्ती बालसदृश वर्तन करू लागते. वैफल्यामुळे होणाऱ्या या बदलास सिग्मंड फ्रॉइडने ‘परागमन’ असे नाव दिले होते. ल्यूइन आणि त्याचे सहकारी यांनी क्षेत्रीय मानसशास्त्राच्या भूमिकेनुसार असा अभ्युपगम मांडला, की ‘परागमन’ म्हणजे ‘निर्जटिलीभवन’ होय. वैफल्यामुळे व्यक्तित्वाचे निर्जटिलीभवन होते आणि परिणामतः व्यक्तीचे वर्तन बालसदृश होते. बालकांवर केलेल्या प्रयोगावरून निर्जटिलीभवनाचा अभ्युपगम वस्तुस्थितीशी जुळणारा आहे, असे दिसते. वैफल्यामुळे क्षेत्रीय परिवर्तन होते.
झीगार्निक या ल्यूइनच्या विद्यार्थिनीने मानसिक ताण ही संकल्पना वस्तुस्थितीशी जुळणारी आहे हे दाखविले. प्रयोगशाळेत तिने अनेक प्रयुक्त व्यक्तींना प्रायोगिक कार्ये दिली. काही प्रयुक्त व्यक्तींना ही कार्ये पूर्ण करू दिली आणि काही प्रयुक्त व्यक्तींची कार्ये अपूर्ण असतानाच त्यांना थांबविले. नंतर घेतलेल्या कसोटीत झीगार्निकला असे आढळले, की प्रयुक्त व्यक्तींना पूर्ण केलेल्या कार्यापेक्षा अपूर्ण राहिलेल्या कार्याचे स्मरण सुलभतेने होते. हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याच्या कृतक गरजेमुळे निर्माण झालेला मानसिक ताण ते कार्य पूर्ण होईपर्यंत किंवा दुसरा काही उपाय योजिला जाईपर्यंत, कायम राहतो. व्यक्तीच्या मानस-परिस्थितीमध्ये भौतिक वस्तुघटकांबरोबरच सामाजिक वस्तुघटकांचा समावेश होतो. भौतिक वस्तुघटक ज्याप्रमाणे व्यक्तित्वावर परिणाम करतात, त्याप्रमाणे सामाजिक वस्तुघटकही व्यक्तित्वावर परिणाम करतात. सामाजिक परिस्थितीचा व्यक्तित्वावर कसा परिणाम होतो, याचा ल्यूइनने क्षेत्रीय मानसशास्त्राच्या भूमिकेवरून अभ्यास केला. समूहातील वातावरण ‘लोकशाही’ अथवा ‘हुकूमशाही’ असेल, तर त्या वातावरणाचा व्यक्तीच्या आणि समूहाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, हे त्याने प्रायोगिक संशोधनाने दाखविले. वांशिक, धार्मिक आणि इतर अनेक प्रकारच्या सामाजिक भेदांमुळे व्यक्तीच्या ठिकाणी मानसिक ताण निर्माण होतात. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे मानसिक ताण विघातक ठरतात. म्हणून या मानसिक ताणांचा निरास कोणत्या उपायाने होऊ शकेल, याविषयी ल्यूइनने संशोधन केले. अशा विविध प्रश्नांच्या प्रायोगिक संशोधनाने सामाजिक मानसशास्त्रात संशोधनाचे एक नवे पर्व सुरू झाले.
क्षेत्रीय मानसशास्त्राचे अनेक संशोधकांनी स्वागत केले, तशी काहींनी विरोधी प्रतिक्रियाही व्यक्त केली. क्षेत्रीय मानसशास्त्रावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांपैकी एक आक्षेप असा, की अवकाशसंबंधशास्त्रीय आणि शक्तिरेषा-विश्लेषक वर्णनामुळे मानवी वर्तनासंबंधी काही नवीन ज्ञान प्राप्त होत नाही. एखाद्या मानसशास्त्रीय उपपत्तीने मानवी वर्तनाचा अधिक चांगला खुलासा होत असेल तर ती स्वीकारार्ह ठरते. क्षेत्रीय मानसशास्त्राच्या भूमिकेवरून असा काही चांगला खुलासा होत नाही इतकेच नव्हे, तर या भूमिकेच्या परिभाषेमुळे साध्यासुध्या परिस्थितीचे वर्णन दुर्बोध होते.
क्षेत्रीय मानसशास्त्राने उपयोगात आणलेल्या इतर शास्त्रांतील संकल्पनांमुळे काही विशेष फायदा झालेला दिसत नाही. उदा., व्यक्तीवर ज्या मानसशास्त्रीय शक्तींचा परिणाम होतो त्यांच्या प्रातिनिधिक शक्तिरेषा काढता आल्या, तरी पदार्थशास्त्रामध्ये अनेक शक्तिरेषांचे संयुक्त-परिमाण ज्या नियमाने ठरविता येते, त्या नियमाने मानसशास्त्रीय शक्तिरेषांचे संयुक्त-परिमाण ठरविता येत नाही. उत्तरेकडील एक वस्तुघटक आणि पश्चिमेकडील दुसरा वस्तुघटक एकाच वेळी व्यक्तीला आकर्षित करीत असतील, तर व्यक्तीची मानसगती वायव्येकडे होणार नाही. दुसरे असे, की इतर शास्त्रांतील संकल्पनांचा मानसशास्त्रातील संदर्भात अर्थ बदलतो हे लक्षात घेऊन त्या संकल्पनांच्या मानसशास्त्रीय संदर्भातील व्याख्या देणे अवश्य होते. क्षेत्रीय मानसशास्त्राने हे केले नसल्याने इतर शास्त्रांतील संकल्पनांचा उपयोग संदिग्ध आणि काही वेळा दिशाभूल करणारा ठरतो. तिसरे असे, की क्षेत्रीय मानसशास्त्राने नवीन गणिती पद्धतीचा उपयोग केल्याचा दावाही फोल आहे. ल्यूइनने अवकाशसंबंधशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग केला तो रचनात्मक वर्णनापुरताच. मानसशास्त्रीय सिद्धांत अवकाशसंबंधशास्त्राने निष्पन्न झाले नाहीत. क्षेत्रीय मानसशास्त्रज्ञांनी जी गणिते केली ती प्रायोगिक संशोधनानंतर केली. म्हणजे त्यांनी मांडलेली समीकरणे गणिती प्रक्रियांवर आधारलेली नव्हती, तर निरीक्षणांवर आधारलेली होती.
ऑल्पोर्टने असा आक्षेप घेतला आहे, की व्यक्ती आणि मानस-परिस्थिती हे एकाच जैव-अवकाशाचे विभाग असले, तरी त्यांच्या स्वरूप-लक्षणांत भेद करणे आवश्यक आहे. मानस-परिस्थितीतील वस्तु-घटक वास्तव असतात. व्यक्तित्वांतर्गत घटक मानसिक असतात. या दोहोंच्या संदर्भात ‘सीमा’, ‘गतिरोधक’ इत्यादी शब्दांचे अर्थ एकरूप असत नाहीत.
क्षेत्रीय मानसशास्त्रात व्यक्तीच्या वास्तव परिस्थितीची उपेक्षा केली गेली आहे. मानस-परिस्थिती हा वास्तव परिस्थितीचा एक भाग आहे. वास्तव परिस्थितीतील घटकांचा मानस-परिस्थितीवर परिणाम होणे शक्य आहे. हे मान्य करूनही ल्यूइनने वास्तव परिस्थितीची पुरेशी दखल घेतलेली नाही. तसेच क्षेत्रीय मानसशास्त्र व्यक्तीच्या पूर्वेतिहासाची दखल घेत नाही. वर्तमानकालाच्या विवक्षित क्षणी व्यक्तित्वांतर्गत घटक कोणते, एवढेच विचारात घेणे पुरेसे नाही. व्यक्तीच्या वर्तमानकालीन वर्तनाच्या खुलाशासाठी व्यक्तीच्या पूर्वचरित्राचा विचार करणे आवश्यक आहे. वेगळ्या शब्दात सांगावयाचे तर क्षेत्रीय मानसशास्त्र व्यक्तित्वाचा जणू एक छेद घेऊन या छेदाचाच विचार करते.
ल्यूइनने सर्वच आक्षेपांना सविस्तर उत्तरे दिली नाहीत; परंतु क्षेत्रीय मानसशास्त्रावरील काही आक्षेप गैरसमजुतीवर आधारलेले आहेत, असे त्याने प्रतिपादन केले. उदा., क्षेत्रीय मानसशास्त्रात व्यक्तीच्या पूर्वेतिहासाची दखल घेतली जात नाही, हा आक्षेप ‘समकालीनता तत्त्वा’च्या विपर्यासावर आधारलेला आहे. भूतकालीन घटनांचा व्यक्तीच्या वर्तमानकालीन वर्तनावर परिणाम होऊ शकत नाही, असा त्या तत्त्वांचा अर्थ नाही; ज्या भूतकालीन घटनांचा कोणताही परिणाम आज अस्तित्वात नाही, अशा घटनांचा वर्तमानकालीन वर्तनावर परिणाम होणे शक्य नाही, असा त्या तत्त्वाचा अर्थ आहे. क्षेत्रीय मानसशास्त्राच्या भूमिकेमुळे मानवी वर्तनाविषयी काही नवीन ज्ञान प्राप्त होत नाही, या आक्षेपाला ल्यूइनचे उत्तर असे, की वर्तनाच्या वेगवेगळ्या अंगांसंबंधी पूर्वी वेगवेगळ्या उपपत्ती मांडाव्या लागत असत. त्याऐवजी क्षेत्रीय मानसशास्त्राच्या एका भूमिकेनुसार वर्तनाच्या विविध अंगांचे वर्णन करता येते. क्षेत्रीय मानसशास्त्रामुळे केवळ पूर्वप्राप्त ज्ञानाची अधिक व्यवस्थित मांडणी करता आली, तरी तो फायदाच म्हटला पाहिजे.
क्षेत्रीय मानसशास्त्रावरील अनेक आक्षेपांत सत्याचा अंश आहे, हे नाकारता येत नाही. क्षेत्रीय मानसशास्त्राच्या पाठिराख्यांचे म्हणणे असे, की या भूमिकेत तात्त्विक उणिवा आणि दोष आहेत हे मान्य केले तरी त्यावरून या भूमिकेचे यथार्थ मूल्यमापन होत नाही. एखाद्या दृष्टिकोनाचे मूल्य केवळ त्यातील तात्त्विक सुसंगतीवर अवलंबून नसते; तर त्या दृष्टिकोनाच्या शास्त्रीय संशोधनातील उपयुक्ततेचाही विचार केला पाहिजे, या दृष्टीने क्षेत्रीय मानसशास्त्राचे मूल्य फार मोठे आहे. क्षेत्रीय मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाने मानसशास्त्रीय ज्ञानात मोलाची भर घातली गेली.
ल्यूइनच्या कार्याचा सामाजिक मानसशास्त्रावर सर्वांत अधिक परिणाम झाला आहे. त्याचे समूह-गतिशास्त्र हे सामाजिक मानसशास्त्राचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे. त्याच्या प्रभावी प्रेरणेमुळे विविध सामाजिक प्रश्नांचे संशोधन केले गेले. व्यक्तिमानसशास्त्रातही ल्यूइनच्या भूमिकेची उपेक्षा झालेली नाही. त्याने उपयोगात आणलेल्या संकल्पना आणि पारिभाषिक संज्ञा आधुनिक मानसशास्त्रज्ञांत रूढ झाल्या आहेत. उदा., ‘क्षेत्र’, ‘मानसिक ताण’, ‘कृतक गरजा’ इत्यादी.
पहा : ल्यूइन, कुर्ट.
संदर्भ :
• Hall, C. S. Lindzey, G. Theories of Personality, 1979.
• Leeper, Robert, Lewin’s Topological and Vector Psychology, Eugene, 1943.
• Marrow, A. J. The Practial Theorist : The Life and Work of Kurt Lewin, New York, 1969.