भारतीय चित्रपटसृष्टीतील समांतर चित्रपटशैलीच्या प्रारंभीच्या काळातील महत्त्वाचा चित्रपट. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची पटकथा श्याम बेनेगल यांनी, तर संवाद सत्यदेव दुबे यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे प्रकाशचित्रण गोविंद निहलानी यांनी केले आहे. या चित्रपटात अनंत नाग, शबाना आझमी, साधू मेहेर, प्रिया तेंडुलकर या कलावंतांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अंकूर चित्रपटातील एक दृश्य

श्याम बेनेगल यांनी आपली कारकीर्द जाहिरात आणि माहितीपटांमधून सुरू केली. अंकुर हा श्याम बेनेगल यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. श्याम बेनेगल दिग्दर्शित अंकुर, निशांत आणि मंथन ही भारतीय ग्रामीण जीवनातील अन्याय आणि संघर्ष दर्शवणारी बहुचर्चित चित्रत्रयी आहे.

अंकुरमध्ये दिग्दर्शक जातव्यवस्थेचे, मानवी वर्तनाचे आणि अत्याचाराचे दर्शन घडवतो. अंकुर ही १९५०च्या दशकात हैदराबादजवळील एका खेड्यात घडलेल्या आर्थिक आणि लैंगिक शोषणाची कहाणी आहे. या चित्रपटाची कथा ‘लक्ष्मी’ आणि ‘सूर्या’ या दोन प्रमुख पात्रांभोवती फिरते. खेड्यातील वंशपरंपरागत जमीनदारी वारसाहक्क मिळालेला सूर्या आणि कष्टाचे जीवन जगत असलेली शोषित स्त्री लक्ष्मी या प्रमुख पात्रांद्वारे श्रीमंती-गरिबी आणि जातव्यवस्थेवर भाष्य करण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये श्याम बेनेगल यांनी केला आहे.

चित्रपटाचे कथासूत्र थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. गावच्या जमीनदाराचा मुलगा सूर्या (अनंत नाग) हैदराबाद शहरामध्ये शिक्षण पूर्ण करून घरी परततो. सूर्याच्या वडिलांना कौशल्या या रखेलीपासून प्रताप नावाचा अनौरस मुलगा असतो. सूर्याच्या वडिलांनी कौशल्याला गावातली मोठी जमीन भेट म्हणून दिलेली असते. सूर्याला त्याच्या वडिलांनी सक्तीने लहानवयाच्या सरू (प्रिया तेंडुलकर) या मुलीबरोबर लग्न करण्यास भाग पाडलेले असते. सूर्याचे वडील त्याचे पुढील शिक्षण नाकारून, गावातील मालकी हक्कांच्या जमिनींची जबाबदारी त्याच्यावर टाकतात. नाईलाजाने सूर्या आपल्या खेड्यातील जमिनीच्या जबाबदाऱ्या स्वीकारतो. सूर्या घरकाम करणाऱ्या लक्ष्मी (शबाना आझमी) या स्त्रीकडे आकर्षित होतो. लक्ष्मीच्या विनंतीवरून सूर्या, किश्त्याला (लक्ष्मीचा नवरा – साधू मेहेर) बैलगाडी चालवण्याची नोकरी देतो. किश्त्याला ताडीचे व्यसन असल्यामुळे तो रोज सूर्याच्या मालकीच्या ताडीच्या झाडावरील ताडी चोरून पीत असतो. एक दिवस किश्त्याची चोरी पकडली जाते आणि सूर्या त्याची पूर्ण गावात गाढवावरून धिंड काढतो. गावात झालेला अपमान सहन न झाल्यामुळे किश्त्या गाव सोडून निघून जातो. दरम्यान किश्त्याच्या गैरहजेरीत सूर्या लक्ष्मीची सहानभूती मिळवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतो. काही दिवसांनी सरू त्याच्यासोबत राहण्यास गावात येते आणि संसार करू लागते. सूर्या आणि लक्ष्मी मधील संबंध लक्षात येऊन सरू लक्ष्मीचा घरातील वावर कमी करते. लक्ष्मी गर्भवती राहते.

एक दिवस लक्ष्मीचा नवरा किश्त्या गावात परत येतो; परंतु लक्ष्मी, आपण आपल्या नवऱ्यासोबत विश्वासघात केला, या भावनेने स्वत:ला दोष देत असते. किश्त्या पुन्हा एकदा सूर्याची बैलगाडी चालवण्याचा निर्णय घेतो आणि कामावर जाण्यासाठी निघतो; परंतु आपण लक्ष्मीसोबत केलेल्या कुकृत्याचा सूड घ्यायला किश्त्या आपल्याला शोधत आहे, या भीतीने सूर्या आजूबाजूच्या लोकांना बोलावतो आणि किश्त्यावर आरोप करून सर्वांसमोर चाबकाने जबर मारहाण करतो. हे बघताच लक्ष्मी आपल्या पतीचा बचाव करण्यासाठी धाव घेते. आपल्या नवऱ्याला केलेल्या मारहाणीबद्दल ती सूर्याला शिव्याशाप देऊन किश्त्याबरोबर घरी निघून जाते.

चित्रपटातील शेवटच्या दृश्यात, इतर सर्वजण निघून गेल्यानंतर, एक लहान मुलगा सूर्याच्या घराच्या काचेच्या खिडकीवर दगड फेकतो आणि तेथून पळून जातो. हा फेकलेला दगड शोषित समाजाच्या बंडखोरीचे प्रतीक म्हणून समोर येतो.

वैशिष्ट्ये : 

भारतीय चित्रपटसृष्टीतील समांतर चित्रपटशैलीच्या प्रारंभीच्या काळातील महत्त्वाचा चित्रपट म्हणून अंकुरचा उल्लेख केला जातो. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी प्रादेशिक अवकाश आणि आशय याचा प्रभावी उपयोग करून अंकुरचे कथानक रचले आहे. अंकुरनंतर आलेल्या निशांत (१९७५) आणि मंथन (१९७६) या चित्रपटांतून त्यांनी भारतीय जनमानसात रुजलेली सामाजिक विषमता आणि त्या अनुषंगाने होणारे लैंगिक शोषण व या शोषणाविरुद्ध शोषितांनी केलेली बंडखोरी यांचे भेदक चित्रण केलेले आहे.

अंकुर चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ असे तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले. त्याचसोबत भारत आणि परदेशात एकूण इतर ४३ पुरस्कार प्राप्त झाले. २४ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन बेअर’ या सर्वश्रेष्ठ पुरस्कारासाठी या चित्रपटाला नामांकनदेखील मिळाले होते.

समीक्षक : गणेश मतकरी