अथैया, भानु : (२८ एप्रिल १९२९ – १५ ऑक्टोबर २०२०). जागतिक दर्जाच्या वेशभूषाकार म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. शांताबाई आणि अण्णासाहेब राजोपाध्ये ह्या दम्पतीच्या सात अपत्यांमधील ही तिसरी कन्या; भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये. अण्णासाहेब हे स्वतः उत्तम चित्रकार होते. भानुमती यांना लहानपणापासून रेखाचित्रे काढण्याची आवड होती. गांधीजींची रेखाचित्रे त्या काढत असत. त्यांच्या आईवडिलांनी ही कला विकसित करण्यासाठी त्यांना उत्तेजन दिले. मुलीच्या बोटामधील ही जादू ओळखून त्यांनी तिला मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये दाखल केले. मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्याच्या, आबाळ होण्याच्या त्या काळात आपल्या मुलीला बाहेरगावी, खर्चिक अभ्यासक्रमाला पाठवण्याची राजोपाध्ये मातापित्यांची ही कृती कौतुकास्पद होती. प्रगत विचारांच्या आईवडिलांचा वारसा लेकीने आत्मविश्वासाने पेलला आणि तेथून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून त्या सुवर्णपदक घेऊन बाहेर पडल्या. कुशाग्र बुद्धिमत्ता, अपार कष्ट करण्याची तयारी, तीव्र स्मरणशक्ती, खूपकाळ एकाग्र राहाण्याची क्षमता आणि अभिजात कलेवरील मनस्वी प्रेम ह्या त्यांच्या गुणांमुळे त्या यशस्वीपणे काम करू लागल्या.

सुरुवातीला भानू यांनी इव्ह्ज विकली सारख्या स्त्रियांकरिताच्या लोकप्रिय मासिकांतून फॅशन सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी तयार केलेली वस्त्रप्रावरणे चोखंदळ रसिकांना आवडू लागली. नंतर त्यांनी एका बुटिकमध्ये आधुनिक कपड्यांची निर्मिती सुरू केली. लवकरच उच्चभ्रू मंडळींत त्यांच्या निर्मितीची मागणी वाढली. त्यांनी तयार केलेल्या वेशभूषांचा बोलबाला झाला आणि एक नवीन दालन त्यांच्यासाठी खुले झाले.

श्री ४२०  या चित्रपटामधील नादिराच्या ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ ह्या नृत्याच्या वस्त्रप्रावरणाने भानू यांना खूप प्रसिद्धी मिळाली (१९५५). १९५६ मध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांनी भानू अथैया यांना सी.आय.डी. ह्या चित्रपटासाठी पेहराव तयार करण्याची संधी दिली. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील भानूंनी तयार केलेल्या, भूमिकांना उठाव देणाऱ्या वस्त्रप्रावरणांचा खूप बोलबाला झाला. पुढे यातच त्यांची कारकीर्द झाली. शंभराहून जास्त चित्रपटांचा कपडेपट त्यांनी डिझाईन केला. गुरुदत्त यांचे सर्व चित्रपट, राज कपूर, यश चोप्रा, आशुतोष गोवारीकर, रिचर्ड अटेनबरो, कॉनरेड रुक्स यांच्यासारख्या नामवंत दिग्दर्शकांबरोबर मनाप्रमाणे काम करायची संधी त्यांना मिळाली.

रिचर्ड अटेनबरो ह्यांच्या महत्त्वाकांक्षी गांधी  ह्या चित्रपटाचा कपडेपट तयार करण्याचे काम भानू अथैया यांना मिळाले. सर रिचर्ड त्यांच्याबाबत असे म्हणाले होते की, ”गांधी हा चित्रपट प्रत्यक्ष साकार करण्यासाठी मला १७ वर्षं लागली; पण त्यातील कपडेपट तयार करणारी व्यक्ती मला पंधरा मिनिटात मिळाली”. भानू यांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. साउथ आफ्रिकेला सुटाबुटात जाणारे बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधींपासून ते भारतातील स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व करताना फक्त खादीचे वस्त्र वापरतानाचे गांधी येथपर्यंतचा वस्त्रप्रावरणांचा खूप मोठा प्रवास होता. याकरिता भानूंनी विविध वाचनालयात जाऊन, प्रत्यक्ष सौराष्ट्रात (काठेवाड) जाऊन अभ्यासपूर्णरीतीने या चित्रपटामधील सर्व कलाकारांचे कपडे कालानुरूप तयार केले. या चित्रपटातील वेशभूषेकरिता भानू अथैया यांना जॉन मोलो यांच्याबरोबर सर्वोत्कृष्ट वेशभूषाकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला (१९८२). भारतासाठी पहिले ऑस्कर मिळवणाऱ्या त्या स्त्री विजेत्या आहेत. २०१२ मध्ये त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या पश्चात त्याचे जतन व्हावे, म्हणून अमेरिकन अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेकडे सुपूर्द केला. त्या ह्या संस्थेच्या निवड समितीवरही होत्या.

भानू अथैया यांना १९९१ मध्ये लेकीन, २००२ मध्ये लगान या चित्रपटांच्या वेशभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. लगान  या चित्रपटाची कथा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली काल्पनिक कथा होती. जुन्याकाळातील ग्रामीण भारतीय समाज आणि भारतामध्ये आलेला तत्कालीन ब्रिटीश समुदाय असा मोठा आवाका ह्या चित्रपटाचा होता. भानू यांनी हे आव्हान लिलया पेलले. या चित्रपटात काम करणारी कलाकार – ब्रिटीश अभिनेत्री रशेलसाठी लागणारी खास टोपी आणि हातमोजे आणण्यासाठी त्या स्वतः इंग्लंडला गेल्या. आपल काम त्या एकहाती करीत.

सुमारे पन्नास वर्षे भारतीय चित्रसृष्टीकरिता त्यांनी वेशभूषाकाराचे काम केले. प्यासा, चौदहवीं का चाँद, साहिब, बीबी और गुलाम, आम्रपाली या चित्रपटांसाठी त्यांनी केलेल्या वेशभूषा गाजल्या. त्यांनी मुमताज, वैजयंतीमाला, साधना यांच्यासारख्या अभिनेत्रींसाठी डिझाईन केलेल्या साड्या आणि इतर कपडे जनसामान्यांत लोकप्रिय झाले. गाईड  या चित्रपटामधील अभिनेत्री वहिदा रेहमान यांचे सौंदर्य आणखी उजळावे अशा कलात्मक दृष्टीने त्यांनी त्यांची वेशभूषा तयार केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ध्यासपर्व या चित्रपटातील त्यांनी तयार केलेली वेशभूषाही खूप गाजली. काही नाटके आणि दूरदर्शन मालिकांचा कपडेपटही त्यांनी तयार केला. त्यांच्या कुलाब्याच्या घरात अनेक होतकरू विद्यार्थी ही कला शिकायला येत असत. आपल्या कलेचा, अभ्यासाचा, अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून त्यांनी The Art Of Costume Design (२०१०) हे पुस्तक लिहिले. त्याची एक प्रत त्यांनी धरमशाला येथे जाऊन दलाई लामांना भेट दिलेली होती.

गीतकार व कवी सत्येंद्र अथैया यांच्याशी भानू यांनी विवाह केला. त्यांना राधिका गुप्ता या कन्या आहेत. भानू अथैया यांचा २००९ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. २०१२ पासून त्या मस्तिष्कातील गाठीमुळे आजारी होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताच्या विकाराने ग्रासले, त्यातच त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

समीक्षक : संतोष पाठारे