मोदी, सोहराब मेरवानजी : (२ नोव्हेंबर १८९७ – २८ जानेवारी १९८४). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, अभिनेते व दिग्दर्शक. त्यांचा जन्म मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शासकीय सेवेत होते. सोहराब यांचे बालपण मात्र उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गेले आणि तेथेच त्यांचे शालेय शिक्षणही पूर्ण झाले. शालेय शिक्षणानंतर ते ग्वाल्हेर येथे त्यांचे थोरले बंधू केकी मोदी यांच्याकडे गेले. हे दोघे बंधू तेथील टाऊन हॉलमध्ये प्रोजेक्टरच्या साहाय्याने लोकांना पडद्यावर चलचित्रे दाखविण्याचे काम करीत असत. नंतर मोदींनी नासिकजवळ देवळाली येथे छावणीतील ब्रिटिश सैनिकांना फिरता चित्रपट दाखवण्याचा उपक्रम केला. त्याचवेळी दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटनिर्मितीचा त्यांना जवळून परिचय झाला. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी सोहराब मोदी यांनी ‘आर्य सुबोध थिएटर’ या संस्थेत अभिनेता म्हणून प्रवेश केला. काही मूक चित्रपटांचा अनुभव जरी असला, तरी सोहराब यांच्या कारकीर्दीची सुरुवात ‘पारसी रंगभूमीवरील अभिनेता’ म्हणून झाली होती. या संस्थेसोबत भारतभर दौरे करत असताना ते विशेषत: शेक्सपिअरच्या नाटकांतील भूमिका करीत. या भूमिकांमुळे त्यांना विशेष नावलौकिक मिळाला. १९२४ ते १९३४ या दहा वर्षांच्या काळात या पारशी नाटक कंपनीने संपूर्ण हिंदुस्थानात हिंदी, उर्दू आणि गुजराती या भाषांमधील नाटकांचे शेकडो प्रयोग केले. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर मोदींच्या संस्थेसाठी मराठी नाटके लिहीत असत.

१९३१ च्या दरम्यान बोलपटांचा उदय होऊ लागल्यावर रंगभूमीला उतरती कळा लागली. मृतावस्थेला लागलेल्या या कलेला संजीवनी देण्यासाठी मोदी यांनी ‘स्टेज फिल्म’ या संस्थेची स्थापना केली (१९३५). हिचे पहिले दोन चित्रपट हे शेक्सपिअरच्या दोन वेगवेगळ्या नाटकांचे थेट चित्रमय रूपांतर होते. अभिनेत्री सायरा बानोची आई नसीम बानोचे पदार्पण असलेला खून का खून हा चित्रपट हॅम्लेट (१९३५) या नाटकावर तर सईद-ए -हवस (१९३६) हा चित्रपट शेक्सपिअरच्याच किंग जॉन या नाटकावर आधारित होता; पण हे चित्रपट फारसे चालले नाहीत. १९३०-३२ च्या दरम्यान मोदी बंधूंनी ‘वेस्टर्न इंडिया थिएटर कंपनी’ ही चित्रपट वितरणसंस्था स्थापन केली. पुढच्या २-३ वर्षांत या संस्थेने हिंदुस्थानातील तब्बल ४५ चित्रपटगृहे चालवायला घेतली. यामध्ये मुंबईतील स्ट्रॅन्ड, एक्सेल्सिअर, नाझ, सेंट्रल कृष्ण आणि मिनर्व्हा ही चित्रपटगृहे होती. मोदींनी मिनर्व्हा चित्रपटगृह तर खास त्यांच्याच चित्रपटांसाठी राखून ठेवले होते. १९३६ मध्ये या संस्थेचे मिनर्व्हा मुव्हिटोनमध्ये रूपांतर झाले. या संस्थेतर्फे नामाचा महिमा /संत नामदेव  (१९३७) आणि अकरावा अवतार (१९३९) या ऐतिहासिक मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. या संस्थेकडून सुरुवातीच्या काळात निर्मिती झालेल्या चित्रपटांमध्ये समकालीन सामाजिक विषय मांडण्यात आले. यामधील १९३८ मध्ये आलेला मिठा जहर हा चित्रपट दारूबंदीवर आधारित होता, तर त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या तलाकमध्ये हिंदू महिलांच्या घटस्फोटाचा हक्क हा विषय प्रकर्षाने मांडण्यात आला होता. या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. यानंतर आलेल्या पुकार (१९३९), सिकंदर (१९४१) आणि पृथ्वी वल्लभ (१९४३) या तीन अप्रतिम ऐतिहासिक चित्रपटांमुळे मिनर्व्हा मुव्हिटोनला आणि मोदींनाही अमाप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटांतून मोदींनी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि सामाजिक आशय असलेल्या विषयांना उत्कृष्ट भाषा आणि समर्पक मांडणीद्वारे वाचा फोडली. या चित्रपटांचे नंतर गुजरातीतही भाषांतरण केले होते.

सोहराब मोदींचे नाटकातील वेशभूषेचे छायाचित्र

पुकार या चित्रपटाची मांडणी मोगल सम्राट जहांगीर याच्या दरबारातील, त्याच्या न्यायावरील जाणिवेवर प्रकाश टाकणाऱ्या थोड्याफार काल्पनिक घटनेवर चित्रित करण्यात आली होती. या चित्रपटातील बरेचसे महत्त्वाचे प्रसंग हे प्रत्यक्ष मोगलकालीन राजवाडे आणि भव्य दरबारांमध्ये चित्रित करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपट कलागृहांमध्ये सेट लावून मिळाली नसती एवढी सत्यता आणि मान्यता या चित्रपटाला मिळाली. प्रत्यक्ष चित्रीकरण स्थळावरील चित्रण, चंद्रमोहन आणि नसीम बानो या कलाकारांचा करिष्मा आणि कमाल अमरोही यांचे संपन्न संवाद या तीन गोष्टींनी या चित्रपटाच्या यशावर शिक्कामोर्तब केले. या चित्रपटात मोदींनी राजपूत सरदार संग्रामसिंहांची भूमिका निभावली होती. पुकारने हिंदुस्तानातील अनेक चित्रपटगृहांमध्ये रजत जयंती साजरी केली.

पृथ्वीराज कपूर यांनी मुख्य भूमिका केलेला सिकंदर हा सोहराब मोदी यांचा एक सर्वोत्तम चित्रपट होता. ख्रिस्तपूर्व ३२६ मधील काळावर चित्रित केलेला हा चित्रपट अलेक्झांडर द ग्रेट ह्या सम्राटाच्या उत्तरायुष्यावर आधारित होता. सम्राट पर्शिया आणि काबूल खोऱ्यावर कबजा करून खाली हिंदुस्तानच्या सीमारेषेनजीक झेलम येथे येतो आणि ज्याने त्याचे सैन्य थोपवून धरलेले असते त्या पोरस राजाचा पराभव करतो. राजा पोरसची भूमिका सोहराब मोदींनी केली होती. सिकंदरचा खानदानी पोशाख, भव्यदिव्य सेट, उच्च निर्मितीमूल्ये आणि विशेषतः त्यातील युद्धाचे डोळे दिपवून टाकणारे प्रसंग या सर्वांमुळे या चित्रपटाने हॉलीवूडमधील तत्कालीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांशी बरोबरी साधली. सिकंदरच्या निर्मितीसाठी कोल्हापूरचे छत्रपती राजाराम यांनी आपल्या ताफ्यातील बरेच हत्ती-घोडे, जडजवाहीर व पोशाख पुरवले होते. तसेच बाळासाहेब यादव यांनी युद्धप्रसंगासाठी कोल्हापुरातील सर्व टांगेवाल्यांचे घोडे वापरावयास दिले होते. हिंदुस्थानात गांधीजींनी कायदेभंग करण्याची दिलेली हाक आणि त्यामुळे निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण आणि दुसऱ्या महायुद्धाने गाठलेला कळस याच वेळी सिकंदर प्रदर्शित झाला आणि त्याने लोकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करण्यात हातभार लावला. परिणामी बॉम्बे सेन्सॉर बोर्डाने जरी या चित्रपटाला परवानगी दिली असली, तरी नंतर सैनिकी तळ असलेल्या भागांमधील चित्रपटगृहांनी हा चित्रपट प्रदर्शित करणे बंद केले. तरीसुद्धा या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कडव्या राष्ट्रप्रेमाच्या संदेशामुळे पुढील बरीच वर्षे सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात राहिला. १९४३ मध्ये प्रदर्शित झालेला पृथ्वी वल्लभ हा चित्रपट के. एन. मुन्शी यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारीत होता. मोदी हे जरी पारसी रंगमंचापासून दूर गेले असले तरी त्यांची नाळ या रंगमंचाशी जोडलेली होती. हे जेलर (१९३८) आणि भरोसा (१९४०) आदी चित्रपटांतील कथांमधून दिसून येते. त्यांनी वेशभूषा, अवकाशीय आविर्भाव, देहबोली आणि संवादांमध्ये उर्दू भाषेचा चपखलपणे उपयोग करून पारसी रंगमंचीय अविष्कार सतत जागता ठेवला.

झाँसी की रानी हा सोहराब मोदी यांनी हॉलिवूडमधून आणलेल्या विशेष तंत्रज्ञांच्या मदतीने बनवलेला पहिला भारतीय रंगीत तंत्रशुद्ध चित्रपट. टायगर अँड द फ्लेम  या नावाने तो इंग्लिशमध्येही काढण्यात आला होता. यामध्ये १८५७ च्या राष्ट्रीय उठावात ब्रिटीशांच्या विरुद्ध तलवार उपसणाऱ्या झाशीच्या राणीची भूमिका अभिनेत्री मेहताब हिने केली होती आणि मोदी यांनी तिच्या राजगुरू नावाच्या प्रमुख सल्लागाराची भूमिका वठवली होती. अवर्णनीय समरप्रसंग आणि मुख्य कलाकारांचे अफलातून अभिनय यामुळे जरी या चित्रपटाने त्या काळाचा प्रभाव मांडण्यात योग्य उंची गाठली असली, तरी प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिकिटबारीवर हा चित्रपट आपटला आणि मोदींना याचा मोठाच आर्थिक फटका बसला; तथापि १९५४ साली बहादूर शाह जफरच्या दरबारातील प्रसिद्ध भारतीय कवी मिर्झा गालिब याच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित असलेल्या त्याच नावाच्या चित्रपटातून मोदींनी यशस्वी पुनरागमन केले आणि या चित्रपटाला १९५४ चा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. या चित्रपटात त्या काळची सुखवस्तू शैली तसेच दरबारातील भव्यतासुद्धा कल्पकतेने दाखवण्यात आली होती. या चित्रपटात विवाहित गालिबच्या प्रेमिकेची भूमिका करणाऱ्या सुरैय्याचा ताकदीचा नाट्यपूर्ण अभिनय प्रेक्षकांना बघावयास मिळाला.

सोहराब मोदींनी आपल्या मिनर्व्हा मुव्हीटोन संस्थेतर्फे सु. चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. त्यातील २५ चित्रपटांचे दिग्दर्शन व २६ चित्रपटांतून त्यांनी स्वतः भूमिका केल्या होत्या. त्यामध्ये वरील नमूद केलेल्या नावांबरोबरच अजून काही नावे घ्यावी लागतील. ती म्हणजे आत्मा तरंग (१९३७), खान बहादूर (१९३७), फिर मिलेंगे (१९४२), एक दिन का सुलतान (१९४५), मझदार (१९४७), नरसिंह अवतार (१९४९), दौलत (१९४९), शीशमहल (१९५०), कुंदन (१९५५), मेरा घर मेरे बच्चे (१९६०), समय बडा बलवान (१९६९) इत्यादी. या सर्व चित्रपटांमध्ये सोहराब मोदी यांनी दिग्दर्शनाबरोबर अभिनेता म्हणूनही छाप पाडली. त्यांनी फक्त अभिनेता म्हणूनही ज्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांमध्ये यहुदी (१९५८), पहली रात (१९५९), वह कोई और होगा (१९६७), ज्वाला (१९७१), एक नारी एक ब्रह्मचारी (१९७१), रझिया सुलतान (१९८३) इत्यादी चित्रपट आहेत. ज्यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका तसेच चरित्र अभिनेता म्हणूनही काम केले. त्यांच्या नवरत्न नाटक कंपनीने गुजराती भाषेतील धरती नो छेडो घर व उर्दू भाषेतील सुबह का भूला ही नाटके सादर केली. उंच व भरदार शरिरयष्टी, भेदक डोळे, करारी मुद्रा, गंभीर धारदार आवाज, शब्दांची प्रभावी फेक करण्याची कुशलता या गुणांनी त्यांच्या भूमिका परिणामकारक होत.

१९६० च्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्यूरींपैकी एक म्हणून सोहराब मोदींची निवड झाली होती. त्यांना दादासाहेब फाळके या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सोहराब मोदी यांचा विवाह त्यांच्याच परख (१९४४) या चित्रपटातून पदार्पण केलेल्या मेहताब या गुजरातस्थित मुस्लिम कुटुंबातील अभिनेत्रीशी २८ एप्रिल १९४६ रोजी झाला. या दोघांना झालेला पुत्र मेहेली हा १९६७ च्या दरम्यान परदेशी स्थायिक झाला.

मीनाकुमारी की अमर कहानी (१९७६) हा सोहराब मोदी यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होय. तर रझिया सुलताना (१९८३) या चित्रपटात वझिरे-आझमची केलेली भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका. वयाच्या ८५ व्या वर्षी १९८२ साली त्यांनी गुरुदक्षिणा या चित्रपटाचा मुहूर्त केला होता; परंतु त्यांना फसवणुकीला सामोरे जावे लागले आणि हा चित्रपट पूर्ण झाला नाही. त्यामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले. या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर दोनच दिवसांनी ते आजारी पडले. त्यातून ते पुन्हा बरे होऊ शकले नाहीत. त्यांना कर्करोगाने ग्रासल्याने वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

भारतामध्ये हिंदी सिनेमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आणि त्यानंतर त्याचा पाया मजबूत करण्यात जे काही दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते आघाडीवर होते. त्यांच्यात सोहराब मोदी हे नाव नक्कीच अग्रस्थानी घ्यावे लागेल.

समीक्षक : अरुण पुराणिक