इरफान खान : (७ जानेवारी १९६७ –२९ एप्रिल २०२०). प्रसिद्ध भारतीय अभिनेते. त्यांचे पूर्ण नाव साहेबजादे इरफान अली खान असे आहे. त्यांचा जन्म राजस्थानातील टोंक जिल्ह्यात यासीन अली खान व सईदा बेगम खान यांच्यापोटी झाला. त्यांचे वडील व्यावसायिक होते. इरफान यांचे बालपण टोंकमध्ये तर नंतर ते जयपूरला गेले. शाळेत असताना त्यांना क्रिकेटची आवड होती आणि त्यात गतीही होती. त्यांची सी. के. नायडू ट्रॉफीसाठी निवड झाली होती; पण बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते जाऊ शकले नाहीत. जयपूरमधील नाट्यकर्मी असणाऱ्या त्यांच्या मामांमुळे त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी बऱ्याच नाटकांत कामेदेखील केली. त्यांनी त्यांचे एम. ए. चे शिक्षण जयपूरमध्ये पूर्ण केले. पुढे १९८४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये (एनएसडी) अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला.

राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधील शिक्षण संपल्यावर इरफान खान चित्रपटांत काम करण्याकरिता मुंबईला आले. सुरुवातीला लहानलहान भूमिका करत असतानाच त्यांनी चरितार्थाकरिता छोट्या नोकऱ्याही केल्या. त्यांनी सलाम बॉम्बे (१९८७) या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या चित्रपटात काम केले होते; पण संकलनात त्यांनी भूमिका केलेला भाग काढून टाकण्यात आला होता. हिंदीतील सुप्रसिद्ध लेखक उदय प्रकाश यांनी अनुवादित केलेल्या मिखाईल शात्रोव्ह यांच्या रशियन नाटकावर आधारित दूरदर्शनवरील रूपांतर लाल घास पर नीले घोडे  यामध्ये लेनिनचे पात्र साकारले होते. अली सरदार जाफरींची निर्मिती व जलाल आगांनी दिग्दर्शित केलेल्या कहकशाँ  या दूरचित्रवाणी मालिकेत उर्दू कवी, मार्क्सवादी राजकीय कार्यकर्ते मखदूम मोहिउद्दिन यांचे पात्र त्यांनी साकारले होते. तसेच त्यांनी नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला व मध्यावर विविध वाहिन्यांवर अनेक छोट्याछोट्या भूमिका केल्या. त्यांत भारत एक खोज, श्रीकांत, चाणक्य, सारा जहाँ हमारा, बनेगी अपनी बात, अनुगूंज, स्पर्श आणि द ग्रेट मराठा इत्यादी मालिकांतील भूमिकांचा समावेश होतो. तसेच संजय खान यांच्या जय हनुमान (१९९८) या मालिकेत वाल्मिकी ऋषींची भूमिका केली. याच काळात बासू चटर्जी दिग्दर्शित कमला की मौत  या चित्रपटामध्ये (१९८९) त्यांनी रूपा गांगुलींसोबत काम केले. एक डॉक्टर की मौत (१९९०) व सच अ लाँग जर्नी (१९९८) यासहीत इतरही बरेच चित्रपट केले; पण त्यांची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही.

आसिफ कपाडिया यांच्या द वॉरीअर (२००१) या चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळे इरफान खान यांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांची कवाडे खुली झाली. रोड टू लडाख (२००३) व मकबूल (२००४) या दोन चित्रपटांमधील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. मकबूल  हा चित्रपट विल्यम शेक्सपिअरच्या मॅकबेथ  या सुप्रसिद्ध नाटकाचे हिंदी रूपांतर होता. हासील (२००३) चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. रोगमध्ये (२००५) त्यांनी मुख्य नायकाची भूमिका केली. सैनीकुडू (२००६) नावाच्या तेलुगू चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केली. लाईफ इन अ मेट्रो (२००७) आणि द नेमसेक (२००७) या चित्रपटातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले. लाईफ इन अ मेट्रोसाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याचवर्षी त्यांचे अ मायटी हार्ट (२००७) व दार्जिलिंग अनलिमिटेड (२००७) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. हिंदी चित्रपटात यशस्वी झाले असले, तरी त्यांनी दूरचित्रवाणीवरील भूमिका करण्याचे काम सोडले नाही. मानो या ना मानो  व क्या कहें  या मालिकांसाठी त्यांनी काम केले.

स्लमडॉग मिलेनिअर (२००८) या ऑस्कर व इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या चित्रपटात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी इरफान खान एखाद्या निष्णात धावपटूसारखे आहेत, जे एकच हालचाल परत परत उत्तम प्रकारे करू शकतात, असे गौरवोद्गार काढले. न्यूयॉर्क, आय लव्ह यू  या चित्रपटामध्ये (२००८) मीरा नायरनी दिग्दर्शित केलेल्या भागात त्यांनी एका गुजराती हिरे व्यापाऱ्याची भूमिका केली. ॲसिड फॅक्टरी  (२००९) व न्यूयॉर्क (२००९) हे दोन चित्रपट त्यानंतर प्रदर्शित झाले.

इन ट्रीटमेंट (२०१०) या एचबीओ वाहिनीवरील मालिकेच्या तिसऱ्या सिझनमध्ये त्यांनी भाग घेतला. अमेझिंग स्पायडरमॅन (२०१२) व जगात सर्वत्र यशस्वी झालेल्या लाईफ ऑफ पाय  या चित्रपटामध्ये (२०१२) त्यांनी काम केले. त्याचवर्षी पानसिंग तोमर (२०१२) मधील वास्तव आयुष्यातील धावपटूचे डाकूमध्ये झालेले रूपांतर या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड रेल डी’ऑर पुरस्कारप्राप्त व बाफ्ता नामांकन मिळवणाऱ्या द लंचबॉक्समध्ये (२०१३) त्यांनी मुख्य नायकाची भूमिका केली. हा चित्रपट त्यांचा तोपर्यंतची बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.

पुढील वर्षांत इरफान खान यांनी गुंडे (२०१४), द एक्स्पोज (२०१४), हैदर (२०१४), पिकू (२०१५), ज्युरासिक वर्ल्ड (२०१५), तलवार (२०१५)  व जज्बा (२०१५) इत्यादी चित्रपटांतून कामे केली. टॉम हँक्ससोबत इन्फर्नो (२०१६) तर दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मदारीमध्ये (२०१६) मुख्य नायकाची भूमिका त्यांनी केली. त्यांच्या हिंदी मिडियम (२०१७) या चित्रपटाने ३२० कोटींची घसघशीत कमाई केली. या चित्रपटाने पूर्वीच्या त्यांच्या द लंचबॉक्स या चित्रपटाच्या कमाईचा विक्रम मोडला. याच चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच त्यांनी नो बेड ऑफ रोजेस (२०१७) या बांग्लादेशी चित्रपटातही काम केले. होमी अदजानिया दिग्दर्शित अंग्रेजी मिडीयम (२०२०) हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होय.

भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मनित केले (२०११). राजस्थान सरकारच्या रिसर्जन्ट राजस्थान (२०१५) मोहिमेचे ते सदिच्छादूत (ब्रँड अँबॅसिडर) होते. त्यांनी सुतापा सिकदर या त्यांच्या एनएसडीमधील सहकारी विद्यार्थिनीसोबत १९९५ साली लग्न केले. त्यांना बाबिल व अयान ही दोन मुले आहेत. न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर या आजारामुळे त्यांचे मुंबई येथे अकाली निधन झाले.

इरफान खान यांच्या एकूण चित्रपट कारकीर्दीत त्यांना चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्कार, आशियाई पुरस्कार मिळाले. हिंदी सोबतच अनेक भारतीय भाषांमध्ये आणि हॉलिवूड व इतर देशांतील चित्रपटांतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. इरफान खान यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून गणना केली जाते.

समीक्षक : अभिजीत देशपांडे