मुकेश : (२६ जुलै १९२३–२८ ऑगस्ट १९७६). भारतीय चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक. त्यांचे पूर्ण नाव मुकेशचंद माथूर. त्यांचे वडील जोरावरचंद हे अभियंता होते. त्यांच्या आईचे नाव चंद्राणी. मुकेश यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांची लहान बहीण सुंदरप्यारी गायन शिकत होती. तेव्हा त्यांचेही तिच्याबरोबर थोडेफार गायनाचे शिक्षण झाले. १९३९ साली मॅट्रिक झाल्यानंतर काही दिवस दिल्लीच्या बांधकाम खात्यात त्यांनी नोकरी केली. पण त्यांना चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याची इच्छा होती. योगायोगाने एकदा अभिनेता मोतीलाल राजहंस यांनी दिल्लीला मुकेश यांचे एका कार्यक्रमातील गाणे ऐकले व त्यांना मुंबईला बोलावून घेतले.

मुकेश यांना पहिली भूमिका मिळाली ती निर्दोष (१९४१) या बोलपटात. या चित्रपटात त्यांनी ‘दिल ही बुझा हुआ हो तो’ हे गाणे गायले होते. यानंतर त्यांनी दुख सुख (१९४२) आणि आदाब अर्ज (१९४३) या चित्रपटांतही भूमिका केल्या. दरम्यान मुकेश यांनी पार्श्वगायनास सुरुवात केली. मूर्ती (१९४५) या चित्रपटात त्यांनी प्रथमच आवाज दिला असला, तरी पार्श्वगायक म्हणून ते पहली नजर (१९४५) या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले. या चित्रपटातील संगीतकार अनिल विश्वास यांनी स्वरबद्ध केलेले ‘दिल जलता है तो जलने दो’ हे त्यातील सैगल-शैलीचे गाणे प्रेक्षकांना विशेष आवडले. तेव्हापासून मुकेश चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून स्थिरावले. राजकपूर आणि मुकेश यांची मैत्रीही तेव्हापासूनच जडली. राज आणि मुकेश हे दोघेही त्यावेळी पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे गाणे शिकायला जात असत. सुरुवातीस ते सैगल–शैलीचे गाणे गात असत मात्र अंदाज (१९४८) या चित्रपटापासून त्यांनी आपल्या गायनाची शैली बदलली. या चित्रपटाचे संगीतकार नौशाद यांनी त्यांना यासाठी प्रोत्साहित केले. मुकेश यांनी मोतीलाल, दिलीपकुमार, करण दिवाण, भारतभूषण, देव आनंद, मनोजकुमार, जयराज अशा ख्यातनाम अभिनेत्यांकरिता पार्श्वगायन केले. राजकपूर यांच्या नीलकमल (१९४७) या अगदी पहिल्या चित्रपटापासून आणि आर्. के. स्टुडिओमधील राजकपूर यांच्या बव्हंशी चित्रपटांमध्ये राज यांच्यासाठी मुकेश यांनी पार्श्वगायन केले आहे. अनिल विश्वास, नौशाद, एस्. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, रोशन, गुलाम हैदर, खैयाम, लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा अनेक संगीतकारांसाठी मुकेश गायले असले, तरी त्यांना पहिल्या प्रतीचे पार्श्वगायक बनविण्यात शंकर-जयकिशन यांचा वाटा मोठा आहे.

राजकपूर अभिनित आणि मुकेश यांनी गायलेली आवारा हूँ (आवारा ,१९५१); मेरा जूता है जापानी (श्री ४२०, १९५५) ; सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार (अनाडी , १९५९) ; ओ मेहबूबा, दोस्त दोस्त ना रहाँ (संगम, १९६४) ; सजन रे झूठ मत बोलो, दुनिया बनानेवाले (तिसरी कसम, १९६६) ; जीना यहाँ मरना यहाँ, जाने कहाँ गये वो दिन (मेरा नाम जोकर, १९७०) इत्यादी गाणी खूप गाजली. याशिवाय त्यांची मेहबूब मेरे, तौबा ये मतवाली चाल (पत्थर के सनम, १९६७); सावन का महिना (मिलन, १९६७) ; कभीं कभीं मेरे दिलमें, में पल दो पल का शायर हूँ (कभीं कभीं, १९७६) इत्यादी गाणीही खूप लोकप्रिय झाली.

१९५१ साली मल्हार, १९५३ साली माशुका  आणि १९५६ साली अनुराग  या तीन चित्रपटांची निर्मिती मुकेश यांनी केली. त्यांनी यातील माशुका आणि अनुराग या चित्रपटांमध्ये अभिनयही केला; मात्र या चित्रपटांना यश मिळाले नाही. त्यानंतर मात्र ते गाण्याकडे वळले.

मुकेश यांना अनेक पुरस्कार मिळाले. ‘सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी’ (अनाडी), ‘सबसे बडा नादान’ (१९७०,पहचान), आणि ‘जय बोलो बेईमान की’ (१९७२, बेईमान)  या गीतांच्या पार्श्वगायनाकरिता त्यांना ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला. ही गाणी शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीने स्वरबद्ध केलेली होती. याशिवाय ‘कभीं कभीं मेरे दिलमें’ (कभीं कभीं) या गाण्याकरिताही मुकेश यांना मरणोपरांत फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला होता. रजनीगंधा (१९७४) या चित्रपटातील ‘कई बार यूहीं देखा हैं’ या गाण्याकरिता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.  हिंदीखेरीज मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली वगैरे भाषांतील गाणीही मुकेश यांनी म्हटलेली आहेत. त्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत ५०० पेक्षा अधिक बोलपटांत गीते गायली आहेत. संत तुलसीदासकृत रामचरितमानसच्या ८ एल. पी. ध्वनीमुद्रिका मुकेश यांच्या आवाजात निघाल्या आहेत. त्यांनी सर्वांत शेवटी ‘चंचल शीतल निर्मल कोमल’ (सत्यम शिवम सुन्दरम्) या गीतासाठी पार्श्वगायन केले होते.

मुकेश यांचा विवाह सरल त्रिवेदी उर्फ बच्चीबेन यांच्याशी झाला (१९४६). या दांपत्यास नितिन व मुकेश ही दोन मुले व रीता, नलिनी आणि नम्रता या तीन मुली. नितिन मुकेश हे गायक आहेत. त्यांचा मुलगा नील नितिन मुकेश हा हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.

भावनेत भिजलेली करुणरसप्रधान गीते सरळ, सुबोध स्वरात म्हणणे हे मुकेश यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य होते. त्यांनी भारताशिवाय परदेशातही त्यांच्या गायनाचे कार्यक्रम केले. लता मंगेशकर यांच्याबरोबर गायनाच्या कार्यक्रमासाठी ते अमेरिकेतील डिट्रॉइट, मिशिगन येथे गेले असता, तेथेच हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

समीक्षण : श्यामला वनारसे