खान, सलीम अब्दुल राशिद : (२४ नोव्हेंबर १९३५). भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुप्रसिद्ध कथा-पटकथाकार म्हणून गाजलेल्या सलीम-जावेद या जोडीपैकी एक. सलीम खान यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे एका सधन घरात झाला. भावंडांमध्ये ते सर्वांत लहान होते. त्यांचे वडील रशीद अली हे भारतातील तत्कालीन ब्रिटिश पोलिस सेवेत होते. सलीम यांच्या लहानपणीच त्यांची आई आणि त्यानंतर काही वर्षांतच त्यांचे वडील निवर्तले. त्यानंतर सलीम यांना त्यांच्या मोठ्या भावंडांनी सांभाळले. त्यांनी इंदूरमधील होळकर महाविद्यालयातून बी. ए.ची पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनात क्रिकेट या खेळात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. त्यांनी वैमानिकाचे प्रशिक्षणही घेतले होते. नंतर मात्र चित्रपटांविषयी त्यांचे आकर्षण वाढले.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश बारात (१९६०) या चित्रपटातील भूमिकेने झाला. १९६०—७० या दहा वर्षांत त्यांनी पोलिस डिटेक्टीव्ह, प्रोफेसर, आँधी और तूफान, तिसरी मंझिल, छलिया बाबू इत्यादी १४ चित्रपटांत लहानमोठ्या भूमिका केल्या; पण अभिनेता म्हणून त्यांना फारसे यश मिळाले नाही. सरहदी लुटेरा (१९६६) या चित्रपटावेळी सलीम खान आणि जावेद अख्तर यांची प्रथमत: भेट झाली. सलीम त्यावेळेस लेखक-दिग्दर्शक अबरार अल्वी यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम करत होते. तर जावेद हे कैफी आजमी यांचे साहाय्यक होते. दोघांनी एकत्रित काम सुरू करण्याअगोदरही पटकथालेखन केले होते; पण त्यांना त्यात यश मिळाले नाही. दोघांनी एकत्रितपणे काम करायचे ठरवल्यानंतर सलीम कथालेखन व कथेची रचना इत्यादी पाहत, तर जावेद संवादलेखनात त्यांना मदत करत असत. त्यांनी सुरुवातीस अधिकार (१९७१) आणि अंदाज (१९७१) या चित्रपटांकरता सलीम-जावेद या नावाने पटकथा लिहिल्या.

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते राजेश खन्ना यांनी हाथी मेरे साथी  (१९७१) या चित्रपटासाठी सलीम-जावेद यांना पटकथालेखक म्हणून काम करण्याची संधी दिली. तोपर्यंत, पटकथा लेखनाकरता स्वतंत्र लेखकाची पद्धत हिंदी चित्रपटसृष्टीत नव्हती. ‘सिप्पी फिल्म्स’ या प्रसिद्ध चित्रपटनिर्मितीसंस्थेने पटकथालेखनाकरता सलीम-जावेद यांच्याशी करार केला. ‘सिप्पी फिल्म्स’साठी त्यांनी अंदाज, सीता और गीता, शोले  आणि डॉन या अत्यंत यशस्वी चित्रपटांचे पटकथालेखन केले. या जोडीने अनेक दिग्गज चित्रपटनिर्मात्यांबरोबर कथा/पटकथालेखक म्हणून काम पाहिले. अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांची मालिका लिहिली. यामध्ये नासीर हुसेन यांचा यादों की बारात (१९७३), प्रकाश मेहरा यांचा जंजीर (१९७३), हाथ की सफाई (१९७४), रवी टंडन यांचा मजबूर (१९७४), यश चोप्रा यांचा दिवार (१९७५), त्रिशूल (१९७८), काला पत्थर (१९७९), चंद्रा बारोट यांचा डॉन (१९७८), शेखर कपूर यांचा मिस्टर इंडिया तसेच दोस्ताना (१९८०), क्रांती (१९८१), शक्ती (१९८२) इत्यादी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आणि समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचे आखिरी दाँव (१९७५), इमान धरम (१९७७), काला पत्थर, शान (१९८०) हे चित्रपट वगळता, इतर चित्रपटांना मिळालेले यश हे वाखाणण्याजोगे होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत सलीम-जावेद ही कथा-पटकथाकार जोडी त्यांच्या वेगळ्या लेखनशैलीमुळे गाजली. प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ या प्रतिमेचा उदय होण्यास सलीम-जावेद यांच्या लिखाणाचा हातभार लागला. या लेखकद्वयीमुळे ‘चित्रपट-पटकथाकार’ या भूमिकेला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. चित्रपटाच्या जाहिरातपृष्ठावर कथा-पटकथालेखक तसेच संवादलेखक यांचे नाव यावे असा त्यांचा आग्रह असे. यशस्वी परदेशी चित्रपटांच्या कथांचे भारतीय वातावरणास सुयोग्य असे रूपांतर, सामान्य माणसाची अन्यायाविरुद्ध असलेली चीड एखाद्या पात्राद्वारे व्यक्त करणे, मसाला चित्रपटांना साजेशी कथानके, चटपटीत संवाद, कमीतकमी वेळात आकर्षक आणि परिणामकारक प्रसंगांची मांडणी ही सलीम-जावेद यांच्या कथा-पटकथालेखनाची वैशिष्ट्ये होती. या जोडीने जवळपास २२ हिंदी आणि प्रेमदा कनिके (१९७६) व राजा नन्ना राजा (१९७६) या दोन कन्नड अशा एकूण २४ चित्रपटांकरता कथा-पटकथालेखन केले.

सलीम-जावेद या जोडीला जंजीर या चित्रपटासाठी उत्कृष्ट कथा, पटकथालेखनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला; दिवार  या चित्रपटासाठी उत्कृष्ट कथा, पटकथा व संवादलेखनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला; तर शक्ती या चित्रपटासाठी उत्कृष्ट पटकथालेखनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

बराच काळ एकत्र काम केल्यानंतर सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये बेबनाव झाला. १९८२ नंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. विभाजन होण्यापूर्वी त्यांनी जमाना (१९८५) आणि मिस्टर इंडिया (१९८७) या चित्रपटांचे काम स्वीकारले होते. विभाजनानंतरही त्यांनी या चित्रपटांच्या कथेवर एकत्र काम केले. यानंतर सलीम खान यांनी नाम (१९८६), अंगारे (१९८६), कब्जा (१९८८), तूफान (१९८९), जुर्म (१९९०), अकेला (१९९१), पत्थर के फूल  (१९९१), मजधार (१९९६) इत्यादी चित्रपटांसाठी कथा लिहिल्या. त्यांपैकी पत्थर के फूल  आणि मजधार  या चित्रपटांत त्यांचा मुलगा सलमान खान याने नायकाची भूमिका केली होती. पत्थर के फूल हा चित्रपट तिकिटबारीवर अतिशय यशस्वी झाला.

सलीम खान यांचा पूर्वाश्रमीच्या सुशीला चरक यांच्याशी १९६४ मध्ये विवाह झाला. त्यांना सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान ही मुले व अलवीरा खान ही मुलगी अशी चार मुले. त्यांची चारही मुले चित्रपट क्षेत्राशी संबंधित असून त्यांचे तीनही मुलगे हिंदी चित्रपटांत अभिनेते व निर्माते म्हणून कार्यरत आहेत. विशेषत: सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील चमकता तारा आहे. सलीम खान यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री व प्रसिद्ध नर्तिका हेलन यांच्याशी दुसरा विवाह केला. या दोघांना अर्पिता खान ही दत्तक मुलगी आहे.

समीक्षण : संतोष पाठारे