अग्निपुराण : स्वतः अग्निदेवाने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नी हे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण. याची रचना इ.स.च्या सातव्या ते नवव्या शतकाच्या दरम्यानची असावी. यातील अनेक तांत्रिक अनुष्ठाने बंगाल प्रांतात आढळत असल्यामुळे ते तेथेच तयार झाले असावे असे विद्वानांचे मत आहे. सात्त्विक, राजस, तामस या प्रकारात प्रत्येक पुराणाचे विभाजन केलेले असून अग्निपुराणात केवळ अध्यात्मविषयीची चर्चा या कमी आढळत असल्याने या पुराणास तामस वर्गात ठेवले आहे. पुराणांची पाचही लक्षणे ह्या पुराणात आली असून ह्याचे एकूण ३८३ अध्याय आहेत. या पुराणाचा विस्तार खूप मोठा असून यात पुराणांच्या लक्षणांपेक्षा इतर अनेक विषयांची माहिती संकलित केलेली दिसते.

यामध्ये प्रासाद तसेच देवालय निर्माण, मूर्तिप्रतिष्ठा विधि याशिवाय भूगोल, ज्योतिषशास्त्र, वैद्यक याविषयी अनेक गोष्टींची नोंद आहे. राजनीती संदर्भात वर्णन करताना अभिषेक,संंपत्ती, सेवक, दुर्ग, राजधर्म, धनुर्वेद, प्राचीन अस्त्र-शस्त्र, सैनिक शिक्षापद्धती ही माहिती आजही महत्त्वाची आहे. तसेच आयुर्वेद, छंदःशास्त्र, अलंकारशास्त्र, व्याकरण आणि कोश विषयक माहिती उपयुक्त आहे.

प्राचीन भारतातील परा आणि अपरा विद्यांचा हा एक विशाल विश्वकोश आहे. त्यामुळेच असे म्हटले जाते की ‘आग्नेय हि पुराणेऽस्मिन् सर्वा विद्याः प्रदर्शिताः।’ अग्निपुराणात येणारे विषय विवेचन पुढीलप्रमाणे – १ ते १६ अध्यायांमध्ये अवतारांचे संपूर्ण विवेचन आढळते. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, बुद्ध यांच्याशी निगडित अनेक कथा, तसेच, रामावताराचे, कृष्णावताराचे, महाभारताचे सविस्तर वर्णन, रामायण कथेच्या बाबत वैवस्वत मनूचे वंशवर्णन, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड व उत्तरकांड इ. कथाभाग आला आहे. १७ ते २० या अध्यायांत मंत्रशास्त्र, सर्वतोभद्रादि मण्डलांची लक्षणे, वास्तुशास्त्राचे वर्णन आले आहे. प्रासाद कसा असावा, घरे कशी असावीत याचे विवरण केले आहे. २१ ते १०६ या अध्यायांमध्ये मंदिर निर्मिती, त्यांच्या बांधणीचे विविध पौलू, वासूदेवादि मूर्तिंची लक्षणे, मत्स्यादि दशावतारांच्या प्रतिमांची लक्षणे, देवींच्या प्रतिमांची लक्षणे व सर्व देवतांच्या प्रतिष्ठापनांचा विधि इ. वर्णन येते.

१०९ ते १२० या अध्यायांमध्ये गंगा, नर्मदा, काशी, गया इ. तीर्थांचे महात्म्य आले आहे. तसेच, भारतवर्षाचे वर्णन, जम्बू, कुश इ. द्विपांचे वर्णन आले आहे. १२१ ते १४० या अध्यायांमध्ये वर-वधूचे गूण जुळणे, विवाहादिसंस्कारांचे वर्णन, कालविचार, ग्रहांची महादशा, पंचांगमान, नक्षत्र वर्णन, ग्रहशांती इ. सर्व भागांचा विचार केलेला दिसतो. १४१ व्या अध्यायात ३६ औषधी वनस्पतींचे वर्णन व त्यांचा उपयोग सांगितला आहे. १५० व्या अध्यायात मन्वन्तरांचे सविस्तर वर्णन दिसून येते. १५१ ते १६७ या अध्यायांमध्ये वर्णाश्रमांचे वर्णन व त्यांच्या करावयाच्या कर्मांचे वर्णन केले आहे.

१६८ ते १७४ या अध्यायांमध्ये महापापांची माहिती व त्यासंबंधी करावयाच्या प्रायश्चित्तांचे संपूर्ण विवरण केले आहे. १७५ ते २०९ यात प्रत्येक तिथींच्या व्रताचे वर्णन त्यासंबंधी विधि निरूपण, या अध्यायांपैकी ‘पुष्पवर्गकथनम्’ अध्यायात कोणत्या देवताना कोणती फुले वाहावीत ते सांगितले आहे. ६४ वृक्षांची व फुलांची नावे यात दिसून येतात. २०३ यात नरकाचे वर्णन केले आहे. २१० ते २१७ यात १६ प्रकारच्या महादानांची, गोदानाची सविस्तर माहिती सांगितली आहे. तसेच, गायत्री मंत्र महात्म्य व त्याचे अर्थनिरूपण आले आहे. २१९ ते २३८ या सर्व अध्यायांमध्ये राजधर्माचे वर्णन येते. राज्याभिषेक कथन, राजाने पदाधिकाऱ्यांची नेमणूक कशी करावी, सेनापती कुणाला नेमावे, दूतांची निवड, राजाची कर्तव्ये, सेवकांनी राजाशी कसे वागावे, दुर्गांचे महत्त्व, संरचना, शत्रूपासून बाळगायची सावधगिरी, राजकुमारांना उपदेश, अपराध्यांना द्यावयाचे शासन, युद्धविषयक चर्चा दिसते.

राजनीती या विषयासंदर्भात रामायणात रामाने लक्ष्मणाला ज्या नीतीचा उपदेश केला, तोच येथे सांगितला आहे. यानंतर वारसाहक्काने मिळणारे धन, स्त्रीधन, पुत्राचा हक्क या विषयी चर्चा केलेली दिसते. यानंतर वेदातील मंत्रांचा विविध कार्यांमध्ये उपयोग करण्याचे विवेचन केले आहे. उदा. कामना पूर्ण होण्यासाठी ऋग्वेदातील मंत्रांचा वापर, वेद महात्म्य सांगितले आहे. नंतर सूर्यवंश, सोमवंश, यदुवंश, कृष्णाच्या पत्नी व पुत्रांविषयी चर्चा, तुर्वसु व पुरुवंशाचे वर्णन येते. २८२ हा वृक्षायुर्वेदाचा अध्याय आहे. यात कोणते वृक्ष कुठे लावावेत, त्यांच्या वाढीसाठी काय करावे हे सांगितले आहे. २८३ व्या आध्यायातही विविध छोटे-मोठे शारीरिक त्रास व त्यावरचे उपाय सांगितले आहे. उदा. लहान मुलांना होणाऱ्या कृमिरोगात त्रिफळा, भृंगराज व सुंठ यांचा काढा मध व तुपात मिसळून द्यावा. यानंतर काही अध्याय गजचिकित्सा, गोचिकित्सा, अश्वचिकित्सा याबद्दल आहेत. उत्तम हत्ती किंवा उत्तम घोडा ओळखण्याची लक्षणे, विशेष म्हणजे या प्राण्यांना रोग होऊ नये म्हणून शांतिप्रयोग सांगितला आहे. लहान मुलांना होणाऱ्या रोगांवर बालरोग चिकित्सा हा स्वंतत्र अध्याय आहे. ३२८ ते ३३५ या अध्यायांमध्ये छन्दःशास्त्र विचार केला आहे. छंदाचे गण, लघु-गुरू विचार यात केलेला आहे. ३३६ व्या अध्यायात शिक्षानिरूपण म्हणजेच उच्चारणशास्त्रासंबंधी विचार मांडला आहे. ३३७ ते ३४८ यामध्ये सर्व अध्यायात काव्य, नाटक, नृत्याभिनय, हस्तप्रचार, वृत्ती, अलंकार लक्षण व त्याचे प्रकार, काव्याचे गुण व दोषांची चर्चा ह्या सर्व साहित्य व कलेसंबंधी विचार मांडलेले दिसतात. ३६० व्या अध्यायात स्वर्ग व पाताळाचे वर्णन आले आहे. ३६१ वा अध्याय ‘नानार्थ वर्ग’ आहे. यात एखादा शब्द कोणकोणत्या अर्थाने येतो ह्याची चर्चा केली आहे. उदा. ‘क’ अक्षर पुंलिंगात असेल तर वायु, ब्रह्मा, सूर्य हे अर्थ दाखवते व नपुंसकात मस्तक किंवा पाणी अर्थ दाखवते. यानंतर चातुर्वर्ण्याचे वर्णन, प्रलयांचे वर्णन येते.

३७१ ते ३७९ यात योगनिरूपण आहे. यम, नियमादि सर्व अंगांचे विवरण आले आहे. ३८० व्या अध्यायात जडभरत व सौवीर-नरेश संवाद, अद्वैत ब्रह्मविज्ञानाचे वर्णन येते. ३८१ व ३८२ ह्या दोन अध्यायात गीतासार व यमगीता आली आहे. ३८३ अग्निदेवाने अग्निपुराणाचे महात्म्य सांगितले आहे. येथे पुराणाची समाप्ती होते.
अशाप्रकारे, अग्निपुराणात अनेक विषयांची चर्चा केलेली दिसते.

अग्निपुराणाची पहिली छापील आवृत्ती १८७० साली कलकत्ता येथून प्रसिद्ध झाली, राजेन्द्रलाल मिश्रा यांनी त्याचे संपादन केले होते. मन्मथनाथ दत्त यांनी १९०3-०४ साली त्याचे इंग्रजी भाषांतर दोन खंडांमध्ये प्रसिद्ध केले.

संदर्भ :

  • Dutt. M.N, Agni Purana ,Cosmo publications, 1904.
  • N.Gangadharan, Agni Puran  (Translated and Annotated),Motilal Banarasidass, 1984.

समीक्षक : सुनीला गोंधळेकर