ब्रह्मांड पुराण : ब्रह्मांडाची उत्पत्ती व विस्तार यांचे वर्णन करणे हा या पुराणाचा मुख्य विषय असल्याने याला ब्रह्मांड असे नाव मिळाले आहे. हे पुराण वायूने व्यास मुनींना सांगितले म्हणून यास वायवीय ब्रह्मांडपुराण असेही म्हणतात. यात एकूण १०९ अध्याय व १२,००० श्लोक आहेत. हे पुराण इ.स.च्या चवथ्या ते सहाव्या शतकात तयार झाले असावे. प्रक्रिया, अनुषंग, उपोद्धात व उपसंहार ह्या चार पादात हे पुराण विभागले आहे. याचे पूर्व, मध्य आणि उत्तर असे तीन भाग आहेत. सर्ग (जगाची निर्मिती), प्रतिसर्ग (प्रलय), वंश (राजवंश), मन्वंतरे ( विशिष्ट कालखंड) व वंशानुचरित (ऋषी व राजवंशातील व्यक्तींची चरित्रे) ही पुराणांची पाचही लक्षणे या पुराणात दिसून येतात. पद्मपुराणाच्या सात्त्विक, राजस व तामस या पुराणांच्या वर्गीकरणानुसार हे पुराण राजस पुराण आहे. गोदावरी नदीच्या उगमाचा प्रदेश तसेच, सह्याद्रीचा भाग हे या पुराणाचे निर्मितीस्थान मानले जाते.

या पुराणाच्या सुरूवातीला असे सांगितले आहे की, गुरु त्याच्या सर्वात श्रेष्ठ शिष्यास आपले सर्वोत्तम ज्ञान देतात. ब्रह्माने वसिष्ठांना, वसिष्ठांनी नातू पराशराला, पराशराने जतुकर्णाला, जतुकर्णाने द्वैपायनला, द्वैपायन ऋषींनी हे पुराण पाच शिष्य – जैमिनी, सुमंतू, वैशंपायन, पेलव आणि लोमहर्षण यांना दिले. मग नैमिषारण्यात जमलेल्या ऋषींना या पुराणाची कहाणी सांगितली. सोन्याच्या अंड्यापासून सृष्टीची उत्पत्ती झाल्याच्या वर्णनाने या पुराणाची सुरुवात होते. नंतर स्वयंभुव मनु, भारत तसेच, इतर वर्षांचे वर्णन केलेले आहे. गंगा, सिन्धु, सरस्वती, नर्मदा, कावेरी, गोदावरी अशा सर्व महत्त्वाच्या नद्यांची वर्णने आढळतात. द्वीपांच्या उल्लेखामध्ये  सहस्रद्वीपांचा सात द्वीपात अंतर्भाव केलेला आहे. हिमवान्, हेमकूट,निषध, मेरू, नील, श्वेत व शृङ्ग याचा सात पर्वतांचा विस्ताराने विचार केलेला दिसतो. नंतर विष्कम्भ, उच्छ्राय, आयाम व विस्तर यांचे वर्णन येते.

सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचे वर्णन, सूर्याच्या गतिचा उल्लेख, ग्रहांची गती व त्याचा परिणाम यांचा उल्लेख दिसतो. वृक्ष, औषधी, लता, पशु, पक्षी यांच्या विषयी विवेचन, चार वर्ण, चार आश्रम यांचे सांगोपांग विवेचन आढळते. श्राद्धकल्पाविषयी माहिती तसेच, त्याच्या मुख्य व इतर भेदांचे विवेचन केलेले आहे. परशुरामाने तपश्चर्या करून शस्त्रे मिळवली ही कथा येते. परशुराम व कार्तवीर्य यांच्या संघर्षाचे वर्णन येते. भगीरथाने महत् प्रयत्नांने आणलेला गंगेचा प्रवाह, धन्वंतरीला भारद्वाजाकडून आयुर्वेदाची प्राप्ती झाल्याची कथा तसेच ललितादेवीचे आख्यान येते. यातील उत्तानपाद राजाच्या मुलाचे म्हणजेच ध्रुवाचे चरित्र हे संघर्ष करून सफलता मिळण्याचे प्रतिक होय.

यदु राजा, शंतनु राजा यांचे चरित्र विस्ताराने सांगितलेले आहे. कंस राजाची कथा व त्यापाठोपाठ कृष्णावताराचे वर्णन आलेले दिसते. तसेच कश्यप, पुलस्त्य, अत्रि, पराशर या ऋषींच्या कथा देखील आल्या आहेत. यात भार्गव ऋषी तसेच वसिष्ठ व विश्वामित्र ऋषींचे चरित्र विस्ताराने आलेले दिसते. राजा उत्तानपादाचा पुत्र ध्रुव याच्या चरित्रातून दृढ़ संकल्प आणि घोर संघर्ष करून यशस्विता कशी मिळते ते दाखवले आहे. गंगावतरणाची कथा श्रम आणि विजय यांची अनुपम गाथा आहे. चाक्षुष मनु सर्गाविषयी माहिती येते. किकुविताचे, ज्यामघाचे चरित्रही विस्ताराने केले आहे. रौरवादि नरकांचे वर्णन हे सर्व प्राण्यांनी केलेल्या पापांचा परिणाम सांगणारे आहे. ललितासहस्रनाम, सरस्वतीस्तोत्र, गणेशकवच इ.स्तोत्रे या पुराणातून घेतलेली आहेत.

आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी मनुष्याने ह्याचे अध्ययन करावे तसेच, या पुराणाच्या वाचनाने पापापासून मुक्ती मिळते असे याच्या श्रवणाचे फळ सांगितले आहे. हे पुराण पाप नाशक, पुण्यप्रदायक, तसेच सर्वाधिक पवित्र समजले जाते. यामध्ये धर्म, सदाचार, नीति, पूजा-उपासना आणि ज्ञान-विज्ञान याची महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. या पुराणाचे विशेष म्हणजे इ.स.च्या पाचव्या शतकात हे पुराण जावा बेटावर नेले गेले. तेथील प्राचीन कविभाषेत याचा अनुवाद केला गेला व तो आजही उपलब्ध आहे. भुवनाचा उल्लेख प्रत्येक पुराणात दिसून येतो. परंतु यात संपूर्ण विश्वाचा सांगोपांग विचार केलेला दिसून येतो.

संदर्भ :

  • शर्मा,श्रीराम (संपा), ब्रह्मांड पुराण, संस्कृती संस्थान, बरेली, १९६९.