तत्त्वज्ञानाची एक शाखा ह्या नात्याने नीतिशास्त्र हे तत्त्वज्ञानाच्या इतर शाखांपासून, विशेषतः सत्तामीमांसा ह्या शाखेपासून, विलग राहू शकत नाही. कोणी एक तत्त्वज्ञ जेव्हा नीतिशास्त्राच्या परिघामध्ये एखाद्या सिद्धान्ताचे प्रतिपादन करतो, तेव्हा वास्तव जगाविषयीच्या कल्पना व विचाराची बैठक यांचा प्रभाव त्या सिद्धान्ताच्या मांडणीमध्ये अनुस्यूत असतो. उदा., आस्तिक व्यक्ती जेव्हा असे मानते की, तिची चांगली कृती तिला स्वर्ग प्राप्त करण्यास पूरक ठरेल, तेव्हा स्वर्ग आणि नरक ह्या संकल्पनांचे अस्तित्त्व तिने गृहीत धरलेले असते. याशिवाय, जेव्हा एखादी कृती करणे आवश्यक आहे असा नैतिक निर्णय (Judgement) उच्चारला जातो, तेव्हा व्यक्तीला ती कृती करण्याचे वा निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे, हे गृहीत धरले जाते. प्रा. विल्यम लिली यांच्या मते, सत्तामीमांसा व नीतिशास्त्र यांचा परस्परांशी असलेला संबंध पुढील चार प्रकारचा आहे :

  • नीतिशास्त्र काही गृहीतकांवर आधारलेले असते आणि ह्या गृहीतकांची वैधता पडताळून पाहणे हा  सत्तामीमांसेच्या अभ्यासविषयाचा भाग होय.
  • सत्तामीमांसेच्या धारणांचा परिणाम थेट नीतिशास्त्राच्या धारणांवर होत असतो.
  • सर्व नैतिक निर्णयांची वैधता केवळ सत्तामीमांसेच्या आधारावर व अनुषंगाने ठरत असते.
  • नीतिशास्त्रातील नैतिक मूल्यांविषयीचे निर्णय सत्तामीमांसेला माहिती (data) पुरवण्याचे काम करतात.

हा संबंध पाहता नीतिशास्त्रातील कोणताही सिद्धान्त तात्त्विक दृष्टीने समजून घेण्यासाठी त्यामागची सत्ताशास्त्रीय भूमिका जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे सत्तामीमांसा किंवा एकूणच तत्त्वज्ञानाच्या कक्षेतून साधित केलेली गृहीतके म्हणजे नैतिकतेची गृहीतके होय.

एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट ह्यांनी नैतिकतेची प्रमुख तीन गृहीतके मांडली. ती म्हणजे स्वातंत्र्य, ईश्वराचे अस्तित्व व आत्म्याचे अमरत्व. ह्या गृहीतकांविषयी आता थोड्या विस्ताराने जाणून घेऊया.

१. स्वातंत्र्य : नैतिकतेचे सर्वांत मूलभूत गृहीतक म्हणजे स्वातंत्र्य. ज्याच्याशिवाय नैतिक कृतीच्या योग्यायोग्यतेविषयीचे विधान करणे तत्त्वतः शक्य नाही. मानवी कृतीच्या नैतिकतेविषयीचा किंवा अनैतिकतेविषयीचा निर्णय घेणे तेव्हाच योग्य ठरेल, जेव्हा मानवाला ती कृती करण्याचे किंवा उपलब्ध पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे, हे गृहीत धरलेले असते. जर कोणतीही व्यक्ती ही स्वतःच्या कृतीमागचे प्रमुख कारण नसेल, तर तिला त्या कृतींच्या आधारे चांगली किंवा वाईट, योग्य वा अयोग्य कसे ठरवता येईल? काही जडवादी विचारप्रवाहांचा कल मानवाचे हे स्वातंत्र्य नाकारून मानवी कृतीचे कारण मनुष्याच्या बाह्य जगतात आहे, अशा अर्थाचा आहे, असे दिसते. जडवाद्यांचे हे मत योग्य मानल्यास, नैतिकतेची संकल्पनाच विफल ठरते; कारण अशा स्थितीत मनुष्य त्याने केलेल्या कृतीसाठी किंवा कृतीच्या परिणामांसाठी जबाबदार कसा ठरेल? उलटपक्षी, काही आदर्शवाद्यांच्या मते, ईश्वर हा सर्व मानवी कृतींचा प्रणेता आहे. मात्र अशा प्रकारे ईश्वराला सर्व कृतींचा प्रणेता मानणे, म्हणजे पुन्हा एकदा कुठल्याही कृतीच्या नैतिकतेविषयी काही निर्णय देणे निरर्थक ठरते. व्यक्ती जर तिच्या कोणत्याही कृतीचे कारण नसेल असे मानले, तर अशी कृती नैतिकतेच्या कुठल्याही चौकटीत बसू शकणार नाही. कृती करण्यासाठीचे किंवा ती निवडण्यासाठी मनुष्याला स्वातंत्र्य नसल्यास त्याला त्या कृतीसाठी जबाबदार धरणे आणि त्याबद्दल त्याला शिक्षा करणे किंवा पारितोषिक देणे या दोन्ही गोष्टी तितक्याच अयोग्य होत. उदा., कोण्या एका व्यक्तीला जीवे मारण्याची भीती दाखवून दुसऱ्या व्यक्तीशी खोटे बोलण्यास भाग पाडले, तर खोटे बोलण्याची पहिल्या व्यक्तीची कृती अनैतिक ठरवता येईल का? त्या व्यक्तीसमोर खोटे बोलणे आणि स्वतःचा जीव गमावणे हे दोनच पर्याय असतील, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने खोटे बोलण्याचा पर्याय निवडणे साहजिक नाही का? अशा वेळी अनैतिक कृत्य केल्याबद्दल ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरेल का? स्वातंत्र्य हे नीतिशास्त्राचे एक गृहीतक आहे, हे मान्य केल्यास वरील प्रश्नांचे उत्तर नक्कीच नकारार्थी द्यावे लागेल.

२.  ईश्वराचे अस्तित्व : कांट यांच्या मते ईश्वराचे अस्तित्व हे नैतिकतेचे दुसरे गृहीतक आहे. प्रत्येक सत्कृत्याचे फळ म्हणून कृती करणाऱ्या व्यक्तीला कृतीच्या तुल्यबळ असे सुख प्राप्त होते, अशी धारणा प्रचलित आहे. परंतु चांगली कृती व सुख (भौतिक कल्याण), आणि वाईट कृत्य व दुःख (भौतिक अकल्याण) हे समीकरण जाणण्यासाठी त्यांमध्ये काही संबंध अंतर्भूत आहे का, ह्याचे परीक्षण केले असता असे लक्षात येते की, सद्गुण आणि सुखप्राप्ती (व पर्यायाने दुर्गुण आणि दुःखप्राप्ती) यांच्यात असा काहीच आंतरिक संबंध (उदा., कार्यकारणभाव) नाही; कारण आपल्याभोवती आपण अशा अनेक व्यक्ती पाहतो, ज्या सद्गुणी असूनही दुःखी असतात. मग कोणत्या न्यायाने आणि केव्हा व कसे, सद्गुणाचे फळ म्हणून मनुष्याला सुख प्राप्त होते? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात कांट यांचे दुसरे गृहीतक मार्गदर्शक ठरते. त्यानुसार ईश्वर हे एक असे बुद्धिमान तत्त्व (Intelligent Principle) आहे, जे विश्वातील घटनांचा क्रम अशा प्रकारे लावते जेणेकरून सद्गुण व सुख आणि दुर्गुण व दुःख यांच्यातील संबंध अबाधित ठेवला जातो. ईश्वराच्या अस्तित्त्वाचे हे गृहीतक सश्रद्ध लोकांसाठी नक्कीच दिलासा देणारे आहे.

३. आत्म्याचे अमरत्व : कांट यांच्या मते सार्वत्रिक नैतिक नियम (Universal Moral Law) आपल्याला सद्गुण (virtue) प्राप्त करण्याकडे प्रवृत्त करत असतो. ह्या सार्वत्रिक नैतिक नियमाला सतत अनुषंगून भावना आणि संकल्प असणे म्हणजे सद्गुण होय. मानवाची व्यावहारिक प्रज्ञा (Practical Reason) त्याला संपूर्ण सद्गुणांचे आचरण करण्याची आज्ञा देत असते. अशा प्रकारची परिपूर्णता आत्मसात करणे एका मनुष्यजन्माच्या काळात शक्य नसते, अशी कांट यांची धारणा आहे. म्हणूनच एका परिपूर्ण अशा सत्संकल्पाप्रत पोहोचण्यासाठीचा प्रवास पूर्ण होण्यासाठी अनेक जन्मांचा प्रवास गृहीत धरणे आणि पर्यायाने आत्म्याचे अमरत्व गृहीत धरणे क्रमप्राप्त आहे. आत्म्याचे अशा प्रकारचे अमरत्व हे कांट यांच्या व्यावहारिक प्रज्ञेचे म्हणजेच पर्यायाने नैतिकतेचे गृहीतक आहे. ह्या गृहीतकाची तार्किक दृष्ट्या सिद्धता देणे जरी शक्य नसले, तरीही त्याचे व्यावहारिक मूल्य नाकारता येणार नाही; कारण कांट यांच्या तात्त्विक संरचनेत अमरत्व नाकारणे म्हणजे एकप्रकारे नीतिनियम नाकारणेच होय.

नीतीमध्ये सद्गुण व सुख किंवा भौतिक कल्याण यांची सांगड घालण्यासाठी कांट यांनी सांगितलेले स्वातंत्र्य, ईश्वराचे अस्तित्त्व आणि आत्म्याचे अमरत्व गृहीत धरणे आवश्यक ठरते. अन्यथा तार्किक व व्यावहारिक या दोन्ही परिप्रेक्ष्यांतून नीतीच्या संकल्पनेविषयीचे व आचरणाविषयीचे अनेक प्रश्न अनुत्तरित राहण्याची स्थिती उद्भवते.

संदर्भ :

  • Kant, Immanuel; Paton, H. J. Trans. The Moral Law : Groundwork of the Metaphysic of Morals, Routledge Classics, Indian Reprint, 2012.
  • Lillie, William, An introduction to Ethics, London, 1955.
  • जोशी, ग. ना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इतिहास, खंड दुसरा, पुणे, १९७५.
  • URL = https://plato.stanford.edu/archives/fall2014/entries/kant-religion/

समीक्षक – वेदप्रकाश डोणगावकर

प्रतिक्रिया व्यक्त करा