भूमध्य समुद्राचा एक फाटा. इजीअन समुद्राच्या पश्चिमेस व उत्तरेस ग्रीस आणि पूर्वेस तुर्की हे देश असून समुद्राची दक्षिणेकडील मर्यादा क्रीट या बेटाने सीमित केली आहे. या समुद्राची लांबी ६१२ किमी., रुंदी ३०० किमी. आणि क्षेत्रफळ २,१५,००० चौ. किमी. आहे. समुद्राची सर्वाधिक खोली ३,५४४ मी. असून ती प्रामुख्याने क्रीट बेटाच्या पूर्वेस आढळते. इजीअन समुद्र ही भूमध्य समुद्राच्या पूर्व भागातील अतिशय गुंतागुंतीची रचना आहे. हा समुद्र ईशान्य भागात दार्दानेल्स सामुद्रधुनीने मार्मारा समुद्राला, तर मार्मारा समुद्र बॉस्पोरस सामुद्रधुनीने काळ्या समुद्राशी जोडला आहे; तसेच दक्षिणेस क्रीट बेटाच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील सामुद्रधुनींद्वारे हा समुद्र भूमध्य समुद्रातील इतर सागरी भागांशी जोडलेला आहे. क्रीट बेट आणि ग्रीसचे पलोपनीसस द्वीपकल्प यांदरम्यानच्या सामुद्रधुनीने इजीअन समुद्र आयोनियन समुद्राशी जोडलेला आहे. इजीअन समुद्रात असलेली असंख्य बेटे समुद्रातील स्वच्छ निळ्याशार पाण्यातून वर डोकावताना दिसतात. ही सर्व बेटे म्हणजे प्रत्यक्षात मुख्य भूमीवरील पर्वतांचे विस्तारित भाग आणि त्यांवरील शिखरे आहेत. प्राचीन विच्छिन्न भूभाग बहुतांशी खचल्यामुळे शेकडो बेटांनी युक्त, कोठे खोल, तर कोठे उथळ असा हा समुद्र तयार झाला असावा. इजीअन समुद्रात अनेक समुद्र, उपसागर, आखाते, सुरक्षित खाड्या, द्वीपसमूह किंवा द्वीपमालिका आढळतात. ग्रीसमधून वाहत येणाऱ्या वार्दर, स्यूमा, नेस्तॉस, आलीआक्मान, पिनीअस या नद्या, तर तुर्कीमधून वाहत येणाऱ्या गेदिझ व मेंडेरेस या प्रमुख नद्या समुद्राला मिळतात.

इजीअन समुद्राच्या नावासंबंधी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. प्राचीन ग्रीसमध्ये ‘मुख्य समुद्र’ या अर्थी या समुद्राला आर्किपेलगो असे संबोधले जात असावे किंवा समुद्रातील असंख्य बेटांमुळे द्वीपसमूह या अर्थी आर्किपेलगो म्हणून ओळखले जात असावे. ग्रीक नगर इजीअ किंवा अ‍ॅमेझॉन्सची राणी इजीअ (या समुद्रात तिचा मृत्यू झाला) तिच्या नावावरूनही इजीअन हे नाव आल्याचे वर्तविले जाते.

इसवी सन पूर्व ३००० ते १२०० या काळात क्रीट आणि ग्रीस या प्राचीन समृद्ध संस्कृती इजीअन समुद्राच्या अवतीभोवती आणि समुद्रातील बेटांवर नांदत होत्या. त्यांतूनच आधुनिक यूरोपीयन संस्कृतीचा उदय झाला. यूरोपीयन इतिहासाच्या उदयाच्या काळात या समुद्रातील बेटांवरील लोकांचे येथील किनाऱ्यावरील प्रदेशांशी, तसेच यूरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील लोकांशी सुलभ संबंध होते. ग्रीकांनंतर इजीअन समुद्राच्या परिसरावर आणि समुद्रातील बेटांवर थ्रेसिअन, रोमन, बायझंटिन, ऑटोमन या साम्राज्यांच्या सत्ता होऊन गेल्या. थीरा बेटाजवळ प्राचीन काळी अटलांटिस नावाचे एक बेट होते व त्यावर समृद्ध प्राचीन संस्कृती अस्तित्वात असल्याची वदंता आहे; परंतु काळाच्या ओघात हे बेट नाहीसे झाले. याचा शोध घेण्यासाठी थीराभोवतालच्या अवसादांचे विश्लेषण करण्याच्या दृष्टीने १९७० च्या दशकात थीराला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले होते.

इजीअन सागरी प्रदेशात भूमध्य सागरी प्रकारचे हवामान आढळते. सप्टेंबर ते मे अखेर येथे उत्तरी वारे वाहतात. सामान्यपणे पूर्व भूमध्य समुद्रातील लाटांच्या स्थितीप्रमाणेच येथील लाटांची स्थिती राहते. या समुद्रातील सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत वाहतात. त्यांवर प्रामुख्याने येथून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव अधिक असतो. ईशान्येकडील काळ्या समुद्राकडून वाहत येणाऱ्या कमी तापमानाच्या थंड जलराशींचा परिणाम इजीअन समुद्रातील पाण्याच्या तापमानावर होतो. येथील सागरपृष्ठाचे तापमान १६° ते २५° से.च्या दरम्यान असते; परंतु त्यात स्थान व कालपरत्वे तफावत आढळते.

इजीअन समुद्र हा भूमध्य समुद्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रमुख नैसर्गिक भाग असून शास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीनेही त्यात अनेक असाधारण वैशिष्ट्ये आढळतात. हा परिसर भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. अगदी दक्षिणेकडील थीरा बेटावर ज्वालामुखी असून त्याचा अखेरचा उद्रेक १९२५ मध्ये झाला होता. या समुद्राचा तळ मूलत: चुनखडीपासून बनलेला असून अलीकडच्या काळातील ज्वालामुखी क्रीयांमुळे त्यात बदल घडून आले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण रंगीत अवसाद प्रामुख्याने दक्षिण भागात असलेल्या थीरा, मीलॉस आणि सांतोरिनी या बेटांवर आढळतात.

इजीअन समुद्रात सुमारे १,४१५ बेटे आणि द्वीपके आहेत. त्यांतील बहुतेक बेटे ग्रीसची असून उर्वरित तुर्कीची आहेत. सिक्लाडीझ, डोडेकानीझ, स्पॉरडीझ हे येथील प्रमुख द्वीपसमूह असून यूबीआ, लेझ्बॉस, क्रीट, रोड्झ, कीऑस, सेमॉस इत्यादी यातील प्रमुख बेटे आहेत. इजीअन बेटांची उत्तरेकडून दक्षिणेकडे थ्रेसिअन सागरी गट, पूर्व इजीअन गट (यूबीआ), नॉर्दर्न स्पॉरडीझ, सिक्लाडीझ, सारॉनिक बेटे, डोडेकानीझ गट आणि क्रीट व लगतची छोटी बेटे या एकूण सात गटांत विभागणी केली जाते. भौगोलिक दृष्ट्या क्रीट, कार्पाथॉस आणि रोड्झ या बेटांमुळे ग्रीस आणि तुर्की यांना जोडणारा प्रचंड कमानीदार मार्ग निर्माण झाला आहे. या समुद्रातील काही बेटे ज्वालामुखीजन्य, खडकाळ, ओसाड आहेत; तर काही बेटे शुभ्र संगमरवरातील आहेत.

लेझ्बॉस, कीऑस, रोड्झ आणि क्रीटसारख्या मोठ्या बेटांवर सुपीक जमीन, सुजल खोरी व मैदाने असून तेथे विकसित कृषिप्रदेश आहेत. तेथून गहू, अंजीर, द्राक्ष, कापूस, रेशीम, भाजीपाला इत्यादी कृषि उत्पादने घेतली जातात. त्याशिवाय या बेटांवर तेल, मनुका, मध, मेण, वाइन, संगमरवर, खनिजे, स्पंज, पोवळी इत्यादी आर्थिक उत्पादने घेतली जातात. शक्य असेल त्या बेटांवर पायऱ्यापायऱ्याची शेती केली जाते. दक्षिणेकडील बेटांपेक्षा उत्तरेकडील बेटे अधिक वनाच्छादित आहेत. काही बेटांवर लोहखनिज मिळते. या सागरी प्रदेशात मासेमारी केली जाते; परंतु फॉस्फेट व नायट्रेटच्या कमतरतेमुळे आणि उबदार पाण्यामुळे मत्स्यपैदास मर्यादित होते. येथे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत असून लगतच्या प्रदेशांच्या उत्पन्नाचा तो एक महत्त्वाचा स्रोत आहे. श्वेत रंगातील घरे असलेली खेडी, हस्तकलावस्तू, इतिहासपूर्व काळातील समृद्ध संस्कृतींसंबंधातील स्मारके, समुद्रातील बेटे व त्यांवरील जागतिक वारसास्थळे ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. उन्हाळ्यात उत्तरेकडील सौम्य, नियमित वाऱ्यांमुळे समुद्रसंचार सुखकारक होतो. अथेन्स, थेसालोनायकी, व्हॉलॉस, कव्हाल, ईराक्लीऑन (ग्रीस), इझमिर, बॉद्रूम (तुर्की) ही या समुद्रकिनाऱ्यावरील प्रमुख शहरे आहेत. दोन्ही देशांच्या किनाऱ्यांवर आणि बेटांवर अनेक बंदरे आहेत. इजीअन समुद्रावरील सार्वभौमत्व, सीमा, हक्क अशा अनेक बाबींबाबत ग्रीस आणि तुर्की यांच्यात वाद आहेत.

 समीक्षक : माधव चौंडे