डच-आंग्रे लढाई : (६-७ जानेवारी १७५४). महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळील अरबी समुद्रात आंग्रे घराण्यातील पराक्रमी वीर तुळाजी आंग्रे आणि डच यांच्यात झालेली प्रसिद्ध आरमारी लढाई. ही लढाई विजयदुर्ग किल्ल्याजवळ झाली असावी. विमेनम (Wimmenum), फ्रीड (Vrede), याकात्रा (Jaccatra) ही डच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताफ्यातील तीन जहाजे बटाव्हिया (इंडोनेशियातील जाकार्ता) येथून कोचीनला आली. तेथून सुरतेला जाताना वाटेत तुळाजी आंग्र्यांच्या जहाजांशी त्यांची गाठ पडली आणि लढाई सुरू झाली. विमेनम जहाजाची भारवहनक्षमता ११०० टन व त्यावर ३५६ लोक होते. त्याचा कॅप्टन यान लुईस फिलिप्पी हा होता. फ्रीड जहाजाची भारवहनक्षमता ८०० टन व त्यावर ६० लोक होते. सायमन रोट हा त्याचा कॅप्टन होता. याकात्रा हे छोटे जहाज होते. त्याला दोन डोलकाठ्या होत्या. विमेनम आणि फ्रीड ही दोन्हीही जहाजे प्रत्येकी तीन डोलकाठ्यांची होती. यांच्याशी लढण्याकरिता आलेल्या तुळाजी आंग्र्यांच्या आरमारात एकूण ३६ जहाजे, तसेच अलीकडेच हस्तगत केलेले रेस्टोरेशन नावाचे एक इंग्लिश जहाजही होते. याखेरीज काही तीन डोलकाठ्यांची व उरलेली दोन डोलकाठ्यांची जहाजे व उरलेल्या छोट्या होड्या होत्या. ६ जानेवारी रोजी चकमक सुरू झाली, ती ७ जानेवारीच्या सकाळी ९ वाजेपर्यंत चालली. त्यानंतर आंग्र्यांची जहाजे माघारी जाऊन दिसेनाशी झाली. काही वेळाने डचांना काही जहाजे दिसली. ती इंग्लिश किंवा फ्रेंच असतील असे वाटल्याने त्यांपासून काही मदत मागावी असे डचांना वाटले, तेवढ्यात स्वत: तुळाजी त्यांच्या जहाजातून चालून आले.

त्यानंतर हातघाईची लढाई सुरू झाली. सर्वप्रथम विमेनम आणि फ्रीड जहाजांना लक्ष्य करून त्यांवर तोफा डागण्यात आल्या. विमेनम जहाजावरील दोऱ्या व शिडांनी पेट घेतल्यावर जहाजाला हळूहळू आग लागली. ७ जानेवारीच्या दुपारनंतर ती आग दारूगोळ्यापर्यंत पोहोचल्यावर त्याचा जोराने स्फोट झाला. जहाजावरचे बहुतेकजण मरण पावले. वाचलेल्यांना मराठ्यांनी कैद केले. त्या स्फोटात आंग्र्यांच्याही एका जहाजाचे पुष्कळ नुकसान झाले. यानंतर आंग्र्यांची दोन जहाजे याकात्रा जहाजापाशी गेली. त्यांनी त्याची डोलकाठी मारगिरी करून पाडली. त्यानंतर जहाजावर जाऊन त्याच्या कॅप्टनलाही डोक्यात गोळी मारून ठार केले. डोलकाठी कोसळून याकात्रा जहाज फ्रीड जहाजात गुंतून बसल्याने मराठ्यांनी तेथेही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथील डचांनी निकराने प्रतिकार केला. बाँब आणि पिस्तुलींचा मारा केल्याने याकात्रावरून मराठ्यांना परत फिरावे लागले. यानंतर काही वेळाने याकात्रा जहाजाचाही स्फोट झाला. अनेकजण काही लक्षात येण्याआधीच मरण पावले. त्यानंतर फ्रीडवरील उर्वरित लोकांना कॅप्टन सायमन रोटसह मराठ्यांनी पकडून विजयदुर्ग किल्ल्यात नेले. सोबतच याकात्रा जहाजही हस्तगत करण्यात आले. त्याची डागडुजी करून ते आरमारात समाविष्ट केले गेले. कैद्यांपैकी २४ यूरोपीय आणि १८ मुसलमान असल्याची नोंद आहे. त्यांना दारुगोळा तयार करण्याच्या कामी लावले गेले. विमेनम जहाजाचा उर्वरित भाग वापरून याकात्रा जहाजाची डागडुजी केली गेली आणि १२ मार्च रोजी आंग्र्यांचे आरमार विजयदुर्गहून निघून गेले. या लढाईत डचांचे बहुतांश लोक (३०० पेक्षा जास्त), तर मराठ्यांकडील ५०० ते १५०० लोक मरण पावल्याचे उल्लेख अनेक साधनांत मिळतात.

२३ मार्च रोजी कॉर्पोरल योहान आंद्रिस रोट हा कैदी मराठ्यांची नजर चुकवून निसटला. तेथून लपतछपत, दिवसाचा प्रवास टाळत तुळाजींच्या आधिपत्याखालील प्रदेश ओलांडून तो शेजारच्या कोल्हापूर छत्रपतींच्या राज्यात पोहोचला. तेथे अन्नपाणी इ. मदत घेऊन तो पायीच दक्षिणेकडे निघाला. ९ मे रोजी तो तिरुचिरापल्ली येथे पोहोचला. तेथे फ्रेंच फौजेतील मराठ्यांनी त्याला अडवून फ्रेंच फौजेत काम करण्याची गळ घातली. त्याने नकार दिल्यावर त्याला दोन दिवस कैद करून मग सोडून देण्यात आले. तेथून तो तंजावर आणि तंजावरहून नागपट्टण येथे २० मे रोजी पोहोचला. नागपट्टण हे डच सत्तेचे कोरोमंडल विभागाचे मुख्य केंद्र होते. तेथे त्याने या लढाईची पूर्ण हकिकत कथन केली. पुढे ही बातमी डच सत्तेचे आशिया खंडातील केंद्र असलेल्या बटाव्हियाला पोहोचली. ती बातमी ऐकून डच अधिकाऱ्यांना अतिशय आश्चर्य व खेद वाटला. त्यांनी यापुढे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून जाणारी डच जहाजे किनाऱ्यापासून कैक किलोमीटर दूर खुल्या समुद्रातच राहतील आणि किनारपट्टीच्या जवळ अजिबात जाणार नाहीत, असे फर्मान काढले. विशेषत: श्रीलंकेहून सुरतेला जाताना मालदीव बेटांना वळसा घालून सुरत येईतोवर खुल्या समुद्रातच राहावे, अशी तरतूद यात होती. सुरतेहून बटाव्हियाला जाणारी जहाजेही साधारण तशाच मार्गाने जाणे अपेक्षित होते. यामुळे त्या भागातील डच जहाजांचा मार्ग पूर्णत: बदलला.

कालांतराने आंग्र्यांकडील डच कैद्यांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर नेदरलँड्समध्ये गेल्यावर फ्रीड जहाजाचा कॅप्टन रोट आणि त्यासोबतचे १८ जण यांना मिळून १७५६ साली नुकसान भरपाईखातर एकूण १०,००० रुपये देण्यात आले. सैनिकांचे तेव्हाचे पगार पाहता प्रत्येकाला मिळालेली रक्कम मोठी होती. या लढाईची बातमी तत्कालीन यूरोपातील अनेक वृत्तपत्रांत प्रकाशित झाली. सप्टेंबर १७५४ ते डिसेंबर १७५४ या तीन महिन्यांच्या कालावधीत ६ डच वृत्तपत्रांत ही बातमी १६ वेळेस, ५ इंग्लिश वृत्तपत्रांत ७ वेळेस तर दोन फ्रेंच पुस्तकांत छापून आली. याशिवाय अनेक इंग्लिश व डच पुस्तकांतही या लढाईचा उल्लेख आढळतो; तथापि मराठी कागदपत्रांत या लढाईचा फारसा उल्लेख आढळत नाही.

संदर्भ :

  • Gommans, Jos, The unseen World: The Netherlands and India from 1550, Netherlands, 2018.
  • Richardson, J. The Literary magazine: Or, Universal Review for the year 1756, Vol. 1, London, 1756-58.

                                                                                                                                                                                    समीक्षक : प्रमोद जोगळेकर