स्मार्ट सिटीच्या निमित्ताने शहरात अस्तित्वात असणाऱ्या उद्यानांचे नूतनीकरण आणि नवनिर्मिती करण्याची संधी शहर प्रशासनाला आता उपलब्ध झाली आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना आकृष्ट करणारे वेगळे स्वरूप उद्यानांना त्यासाठी आपणास द्यावे लागेल. गेल्या काही वर्षात मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, थायलंड, युरोपीय देशांनी आपल्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि जतन करून पर्यटन क्षेत्रातील आपले स्थान बळकट केले. परंतु देशात अशा कोणत्याही गोष्टी नसताना पर्यटन क्षेत्रातील दुबई देशाने केलेली आजची प्रगती आश्चर्यकारक आहे.
पार्श्वभूमी : दहा वर्षांपूर्वीच दुबईच्या राज्यकर्त्यांना जाणवले की, आपल्याकडील तेलाचे साठे भविष्यात कधीनकधी संपणार आहेत. तेव्हापासून आपला देश पर्यटनासाठी सक्षम बनवण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यास त्यांनी सुरुवात केली. काही कालावधीत देशाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण केले. अथक परिश्रमाने दुबईला पर्यटनासाठी सर्व जगाचे केंद्रबिंदू बनवले. देशात स्थानिक आणि पर्यटकांसाठी येथे अनेक शॉपिंग मॉल आणि पर्यटन स्थळे विकसित केली . कमतरता होती फक्त एका आगळ्यावेगळ्या भव्य उद्यानाची. भौगोलिक दृष्ट्या दुबई हा आखाती प्रदेशातील रखरखीत उष्ण हवामानाचा वाळवंटी प्रदेश आहे. वार्षिक पर्जन्याचे प्रमाण देखील नगण्य आहे. परंतु अशा प्रतिकूल वातावरणातही मिरॅकल पुष्पोद्यान हा प्रकल्प उल्लेखनीय आहे.
प्रकल्प नियोजन : मिरॅकल पुष्पोद्यान या प्रकल्पाची सुरुवात १४ फेब्रुवारी २०१३ मध्ये झाली. त्यासाठी मध्यवर्ती भागात दुबईलॅंड येथे अंदाजे ७ लक्ष २१ हजार चौ. फूट जागा विकसित करण्यात आली. फक्त २ महिन्याच्या कालावधीत ४०० मजुरांच्या अथक परिश्रमातून मिरॅकल पुष्पोद्यानाची निर्मिती झाली. उद्यानासाठी ४० मिलियन दिर्रम म्हणजे अंदाजे ६० कोटी रुपये खर्च आला.
उद्यानाची निर्मिती दोन टप्प्यांत केली गेली. पहिल्या टप्प्यात मुख्य उद्यान, तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या भागाचे विस्तारीकरण म्हणजेच फुलपाखरू उद्यान (Butterfly garden) आणि बहुमजली वाहनतळ (Parking) अशा अनेक सुविधा करण्यात आल्या. ऑक्टोबर २०१३ मध्ये सर्व काम पूर्ण झाले.
दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यापर्यंत मिरॅकल पुष्पोद्यान सर्वांसाठी खुले असते. त्यानंतर दुबईतील तीव्र उष्ण तापमानामुळे मे पासून सप्टेंबरपर्यंत पाच महिने बंद असते. परंतु याच कालावधीत आगामी वर्षीच्या नवीन रचनांची तयारी केली जाते. उद्यानात दरवर्षी फुलांच्या रचना केल्या जातात. फुले टवटवीत ठेवण्यासाठी आणि देखभालीसाठी प्रतिदिन अंदाजे ७ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. यासाठी पर्यावरणपूरक जलसिंचन प्रणाली (Ecofriendly irrigation system) अवलंबण्यात आली आहे. पाण्याचा पुनर्वापर करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जातो. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील बदलामुळे फुलझाडांना जास्त पाणी लागत नाही. पुष्पोद्यान तयार करतानाच सूक्ष्म छिद्रे असणारी जाळी आणि बहुवारिकांचा (Polymer) वापर केल्याने जमिनीत पाणी मुरते.
मिरॅकल पुष्पोद्यानाचा आराखडा : या पुष्पोद्यानाची रचना गोलाकार असून परिघ जवळजवळ एक किमी. लांबीचा आहे. अंतर्भागात ४ किमी. लांबीचे पदपथ असून विविध प्रकारच्या एकूण ४ कोटी फुलझाडांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. फुलझाडांच्या असंख्य विविध रचना येथे पाहायला मिळतात. दर्शनी भागात स्वागतासाठी विविधरंगी फुलांनी सजवलेल्या अनेक भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्या पाहताना त्रिमितीय पद्धतीचा भास होतो. संपूर्ण उद्यानातील भूभागाचे (Landscape) आकर्षक नक्षीकाम केले आहे. रंगीबेरंगी टवटवीत फुलांपासून बनवलेले बदाम (Heart), तारा (Star), इग्लू, छत्री (Umbrella), पिरॅमिड, बुर्ज खलिफा, मोर, फुलांचा बोगदा (Flower tunnel), घुमट (Dome) असे अनेक आकर्षक आकार येथे पाहायला मिळतात. येथील फुलांनी सजवलेले घड्याळ १३ मी. व्यासाचे असून जगातील सर्वांत मोठे समजले जाते. पुष्पोद्यानामधील फुलांची भिंत सर्वांत जास्त लांबीची गणली जाते. फुलांनी बनवलेला सर्वांत मोठा पिरॅमिड येथे आहे. उद्यानाचा एक भाग पुरातन वाहने (Vintage cars) फुलांनी सजवून बनवला आहे. दुसऱ्या भागात भव्य कृत्रिम तळे आणि त्यात अनेक कारंजी आहेत. सायकांळी उद्यानात आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली जाते. उद्यानात उपहारगृहे, स्वच्छतागृहे, स्नानगृहे आणि प्रार्थनागृहांची सुविधा आहे.
दुबईतील अनेक पर्यटनस्थळांपैकी मिरॅकल पुष्पोद्यानाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे उद्यानाच्या निर्मितीपासून दरवर्षी अंदाजे १० लाख पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत.