उत्तर यूरोपमधील बाल्टिक समुद्राचा अगदी उत्तरेकडील फाटा. स्वीडनचा पूर्व किनारा आणि फिनलंडचा पश्चिम किनारा यांदरम्यान स्थित असलेले हे आखात आहे. उत्तरेकडील टॉर बंदर, तर दक्षिणेकडील आलांड बेट ही या आखाताची अनुक्रमे उत्तर आणि दक्षिण सीमा निश्चित करतात. या आखाताच्या अगदी उत्तर भागात बॉथनियाचा उपसागर आहे. आखाताचा उत्तर-दक्षिण विस्तार ७२५ किमी., पूर्व-पश्चिम विस्तार ८० ते २४० किमी. आणि क्षेत्रफळ सुमारे १,१७,००० चौ. किमी. आहे. आखाताची सरासरी खोली ६० मी., तर कमाल खोली २९५ मी. असून ती आखाताच्या पश्चिममध्य भागात आढळते.

बॉथनियाच्या आखाताची निर्मिती भूसांरचनिक क्रियेतून झाली आहे. या आखाताच्या जागेवरील खळगा स्तरित खडकाच्या निक्षेपांनी भरलेला आहे. हिमयुगाच्या विविध टप्प्यांत हा भाग सतत हिमनद्यांखाली दबलेला होता. आता मात्र दर शंभर वर्षांत ८० सेंमी. या वेगाने हा भाग वर उचलला जात असल्याने या आखाताची खोली तसेच क्षेत्रफळ सतत कमी होत चालले आहे.

या आखातातील क्षारता उत्तरेपासून दक्षिणेकडे वाढत जाते. आखातास मिळणाऱ्या आँगरमन, ऊमी, लूल, टॉर्न, केमी आणि ओलू यांसारख्या बऱ्याच नद्या गोड्या पाण्याचा पुरवठा करतात. त्यामुळे या आखातातील पाण्याच्या क्षारतेचे सरासरी प्रमाण अत्यल्प आहे. याच कारणास्तव हिवाळ्यातील साधारण पाच महिने हे आखात गोठलेले असते.

बॉथनियाच्या आखाताच्या किनाऱ्यावर अनेक लाकूड कापण्याचे कारखाने आहेत. यासाठी आवश्यक असणारे लाकूड आखाताच्या सभोवतालच्या प्रदेशात पसरलेल्या दाट जंगलामधून आणले जाते. पूर्वीच्या काळी ‘बॉथनिया’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विस्तृत जंगल-प्रदेशावरून या आखाताचे नाव ‘बॉथनियाचे आखात’ असे पडले आहे. ‘बोत्तेंविकें’ या स्वीडिश नावाचे हे लॅटिन रूप आहे.

बॉथनियाच्या आखातामध्ये बेटांची संख्या जास्त असल्याने तसेच ते साधारण पाच महिने गोठलेले राहत असल्याने जलवाहतूक करणे काहीसे प्रतिकूल असते. काही काळ बर्फफोडी बोटींच्या साहाय्याने मार्ग मोकळा करून त्यातून जलवाहतूक केली जाते. फिनलंडच्या किनाऱ्यावरील तुर्कू, राउमा, पोरी, व्हासा आणि ओलू; तर स्वीडनच्या किनाऱ्यावरील गेव्ह्ल, संट्स्व्हाल, हार्नसँड अर्नशल्टसव्हीक, शेलेफ्टओ, पीतओ व लूलीओ ही मत्त्वाची बंदरे आहेत. त्याशिवाय आलांड बेटावरील मारीअहामन हे बंदरही महत्त्वाचे आहे. किनाऱ्यावरील बंदरांतून लाकडाच्या ओंडक्यांसह तेल, लोह-खनिज, कोळसा आणि कच्च्या धातुंचीदेखील वाहतूक केली जाते. या आखाताच्या कमी क्षारतेमुळे पाइक, व्हाइटफिश, पर्च यांसारखे गोड्या पाण्यातील मासे, तसेच अटलांटिक हेरिंगसारखे मचूळ अथवा कमी खाऱ्या पाण्यातील मासेदेखील आढळतात. किनारी भागात निर्वाह मासेमारी चालते.

समीक्षक : वसंत चौधरी