विन्सेंट संसर्ग

विन्सेंटचा संसर्ग या आजारास विन्सेंटचे तोंड येणे, विन्सेंट्स अँजायना, ट्रेंच माऊथ किंवा तीव्र विनाशकारी हिरड्यांचा संसर्ग (Acute necrotizing ulcerative gingivitis) अशा विविध नावांनी ओळखले जाते. हा आजार प्रामुख्याने हिरड्या आणि दातांशी निगडित असल्याने तो दंतवैद्यकाच्या कार्यकक्षेत येतो.

पार्श्वभूमी : वैद्यकशास्त्राला विन्सेंटचा आजार शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून परिचित आहे. पहिल्या महायुद्धात (१९१४) लढणाऱ्या जवानांमध्ये तो मोठ्या प्रमाणावर पाहण्यात आला. यास युद्धाचा मानसिक तणाव, अपूर्ण झोप, मुख स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव, अनियंत्रित मधुमेह आणि निकस आहार व कुपोषण ही कारणे जबाबदार होती. अलिकडच्या काळात वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि सकस आहाराची जाणीव झाल्यामुळे या विकाराचे प्रमाण पूर्वीपेक्षा पुष्कळच कमी झाले आहे. हा आजार संसर्ग नावाने ओळखला जात असला तरी एका रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तीस होत नाही. म्हणजेच संसर्गजन्य रोगांच्या यादीत हा रोग मोडत नाही. कारण ज्या व्यक्ती स्वत:च्या तोंडाची स्वच्छता नीट पाळत नाहीत आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती काही कारणाने खूप कमी झालेली आहे, अशा लोकांना हा तोंडाचा व हिरड्यांचा आजार जडतो. हा रोग फ्युजोबॅक्टेरिया किंवा स्पायरोकीट प्रकारच्या जंतूंमुळे होतो. या प्रकारचे जंतू निर्जीव झालेल्या ऊतींचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना सॅप्रोफाइट या गटाचे जंतू म्हणतात. हे जंतू हवाविरहित (Anaerobic) वातावरणात वाढणाऱ्या प्रजातीचे आहेत. एरव्ही हे जंतू आपल्याला त्रास देत नसले, तरी शांतपणे तोंडात निवास करीत असतात. त्यामुळे निरोगी माणसामध्ये ते उपद्रवी नसतात.

हिरड्यांचा शोथ

जे लोक स्वत:च्या मुखाची आणि दातांची योग्य तऱ्हेने स्वच्छता ठेवत नाहीत आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती क्षीण झालेली आहे, अशा व्यक्ती या बॅसिलस फ्युजिफॉर्मिस  बोरेलिया विन्सेंटाय  (Bacillus Fusiformis & Borrelia Vincentii ) रोगजंतूंच्या भक्ष्य ठरतात. फ्युजिफॉर्मिस  हे लांबट सूक्ष्मजंतू किंवा बोरिलिया विन्सेंटाय  हे जंतू संधिसाधू (Opportunistic) गटात मोडतात. रोगप्रतिकारशक्ती क्षीण झालेल्या व्यक्तींच्या हिरड्या, दोन दातांमधील बाह्य आवरणाच्या (Periodontal tissue) आतील भाग आणि टाळा, घसा अशा भागांवर आक्रमण करू शकतात. त्यामुळे तीव्र वेदना, जखमा, रक्तस्राव ही लक्षणे रूग्णात दिसतात. हा आजार बळावला तर हिरड्यांच्या विनाशामुळे त्या निर्जीव (Necrose) होऊन त्याच्या खपल्या पडू लागतात. तसेच दातांच्या आवरणाचा ऱ्हास झाल्यामुळे दातही पडू लागतात. वेळीच सुधारणा केली नाही तर जबड्यांच्या हाडामध्येही हा संसर्ग मुरतो. आजाराच्या स्वरूपाची तीव्रता कमी झाली आणि तो जास्त रेंगाळणारा आजार झाला, तर त्याला हिरड्यांचा प्रलंबित आजार किंवा प्रलंबित शोथ (Chronic Gingivitis) म्हणतात.

रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती क्षीण होण्याची कारणे :

(१) मधुमेह.

(२) एचआयव्ही/एड्स (HIV/AIDS) या आजारात रूग्णाची रोगप्रतिकारशक्ती जवळजवळ संपुष्टात आलेली असते.

(३) ज्या रूग्णांना कर्करोग, क्रोहचा आजार, मोठ्या आतड्याचा अगणित सूक्ष्म जखमांचा आजार (Ulcerative Colitis) किंवा अन्य कारणाने कर्करोधक किंवा किरणोत्सर्गी (Radiation) किंवा रासायनिक (Chemo) उपचार चालू आहेत अशा लोकांची रोगप्रतिबंधात्मक शक्ती कमी झालेली असते.

(४) मानसिक ताण, तणाव आणि नैराश्य याही कारणांनी रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते.

(५) ज्यांना कुपोषणास तोंड द्यावे लागते, ज्यांचा आहार असमतोल व अपुरा असतो.

(६) धूम्रपान, तंबाखू सेवन किंवा इतर व्यसनाधीन व्यक्ती.

या व अशा सर्व कारणांनी माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेल्या असतात. त्यांच्यावर विन्सेंटच्या आजाराचे सूक्ष्मजंतू घाला घालतात. हा आजार अविकसित देशांतील कुपोषित बालक आणि विकसित देशांतील अस्वच्छ तरुणांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

लक्षणे : सुरुवातीस हिरड्या दातांभोवती घट्ट आवळल्याची भावना निर्माण होते. वेदना सुरू होतात आणि त्यांची तीव्रता वाढत जाते. हिरड्या लालभडक, सुजलेल्या दिसतात. त्यातून स्पर्शही न करता सहजपणे रक्त येणे सुरू होते. हिरड्यांमध्ये निर्जीवपणा येऊन (Necrosis) त्यांच्या खपल्या पडण्यास सुरुवात होते, त्यामुळे जखमा होतात. नंतर हिरड्यांच्या दातांभोवतीचे/परिदंत आवरण (Periodontal Tissue) सुजणे, प्रचंड वेदना आणि दात पडणे शक्य असते. गालांच्या आतील भागास, घशासही सूज येणे, जखमा आणि दाह होऊ लागतो. जिभेला विचित्र धातूसारखी (Metallic) चव येते. त्यानंतर अंगदुखी, गळाठा, ताप येणे, मानेवर अवधानाच्या गाठीही येतात.

निदान : (अ) रूग्णाच्या तोंडाची आणि हिरड्यांची नीट तपासणी करणे. सुजलेल्या हिरड्या किंवा जखमांवर असलेल्या जंतूंची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करणे.

(ब) रोगप्रतिकारक शक्ती कमी करणाऱ्या गोष्टींची माहिती घेणे किंवा तपासणी करणे. रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे, एचआयव्हीची तपासणी करणे.

(क) क्ष-किरण प्रतिमाचित्रण : यात दातांच्या परिदंत अस्थिरज्जूची (Periodontal ligament) झीज, दातांच्या मुळांची झीज आणि जबड्याच्या हाडांची झीज दिसू शकते.

उपचार : हायड्रोजन पेरॉक्साइड (H2O2) १:१० प्रमाणात किंवा क्लोरहेक्झिडीन अशा जंतुनाशक औषधांनी वरचेवर गुळण्या कराव्यात. तोंडाच्या व दातांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. हिरड्यांचा सुजलेला भाग निर्जीव होण्याच्या टप्प्यावर असेल किंवा निर्जीव झालेला असेल तर असा भाग शस्त्रक्रियेने काढून टाकावा लागतो (Gingivectomy). दुखणे सुसह्य व्हावे म्हणून किंवा ताप असेल तर वेदनाशामक औषधे आणि इतर जंतूंमुळे दुय्यम संसर्ग (Secondary Infection) झाला असेल, तर त्यासाठी योग्य ती प्रतिजैविके दिली जातात. मेट्रोनिडॅझॉल २५० मि.ग्रॅ. दर ८ तासांनी ७ दिवस दिले जाते. ताण-तणाव, नैराश्य असल्यास त्याचा इलाज करण्यात येतो. याच बरोबर इतर शारीरिक व्याधींचा उपाय देखील करावा लागतो.

हा संसर्ग प्रथम तीव्र स्वरूप धारण करतो. या वेळी योग्य उपचार केल्यास बऱ्यापैकी सुधारणा होते, परंतु उपचार व्यवस्थित केले नाहीत तर हा आजार (Chronic) बराच काळ रेंगाळणाऱ्या टप्प्यावर जातो.

संदर्भ :

• ANUG in Autoimmuno compromised young adult BMJ Case Reg 2015.

• Atout R.N., et.al. Managing patients with Necrotising Ulcerative Gingivits J. Can Dent Assoc 2013:79:d46.

• Karring, edited by Jan Lindhe, Niklaus P. Lang, Thorkild (2008), Clinical Periodontology and Implant Dentistry (5th Ed.) Oxford Black Well, Munksgaard.

• Marx, J.A., et.al., Rosen’s Emergency Medicine: Concepts and clinical Practice St, Louis: MOSBY

• Melio Frantz et.al., Upper Respiratory Tract Infection In Rosens Emergency Medicine, 8th Ed. Vol. 1 n.d.

• Nikalus Lang, et.al., Consensus report: Nectrotizing Periodontal Diseases, Annals of Periodontology. 1999; 4:78.

• Scully, Cryspian (2008), Oral and Maxillary Medicines The basis of diagnosis and treatment (2nd Ed.) Edinburgh, Churchil Livingstone. PP 101, 347.

• Tylor, F.E., McKinstry, WHC (1917), The Relation of Peridental Gingivitis to Vincent’s Angina, Proceedings of the Royal Society of Medicince, 10 (Laryngol Sect) 43-8