प्राईस, रिचर्ड : (२३ फेब्रुवारी १७२३ – १९ एप्रिल १७९१) लंडनच्या वेल्समध्ये जन्मलेल्या प्राईस यांचे प्राथमिक शिक्षण वेल्समध्ये तर १७४०-४४ दरम्यानचे शिक्षण लंडनच्या टेंटर अकॅडमीत झाले. तिथे त्यांना धर्मशास्त्राबरोबर विद्युत, खगोलशास्त्र आणि गणित यांसारख्या शास्त्रीय विषयांतही रस निर्माण झाला. टेंटर अकॅडमीतून बाहेर पडल्यावर ते उत्तम धर्मप्रवचनकार म्हणूनही लोकप्रिय झाले. प्रतिष्ठीत कुटुंबाचे धर्माधिकारी म्हणून काम करताना मिळालेल्या वेळेत त्यांनी धर्मशास्त्र, नैतिक तत्त्वज्ञान आणि गणित अभ्यासले.

त्यांचे Review of the Principal Questions and Difficulties in Morals हे पुस्तक १७५८ साली प्रकाशित झाले. या महत्त्वाच्या पुस्तकाने तत्त्वज्ञ कांट यांच्या नीतिशास्त्राला आणि पुढे विसाव्या शतकातील त्याच्या विकासाला नवी दिशा दिली. सन १७६१ मध्ये सुप्रसिद्ध गणिती बेज यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियांच्या विनंतीवरून प्राईस त्यांच्या लिखाणाचे उत्तराधिकारी बनले. प्राईस यांनी बेज यांचे लिखाण जतन, वृद्धींगत आणि प्रकाशित केले. बेज यांच्या लिखाणातील सामान्य सांख्यिकीय अनुमान समस्यांचे गणिती प्रारूप आणि विश्लेषण लक्षात घेऊन प्राईस यांनी संभाव्यता सिद्धांतावर दोन शोधनिबंध लिहिले, जे Philosophical Transactions of the Royal Society मध्ये प्रकाशित झाले.

१७६४ मध्ये संभाव्यतेवरील पहिल्या शोधनिबंधांत प्राईस यांनी बेज यांचे लिखाण थोडेसे संपादित करून त्यावरील आपले नवीन विचार मांडले. १७६५ च्या दुसऱ्या शोधनिबंधांत, संभाव्यता प्रगणन करण्याची प्राईस यांची प्रमेये असून बेज यांच्या सिद्धांताचे गणित, मौलिकता, लक्षणीयता आणि विज्ञानातील उपयुक्ततेसंदर्भातील विवेचनही आहे. संभाव्यतेवरील या कामामुळे १७६५ मध्ये प्राईस यांना रॉयल सोसायटीचे अधिछ़ात्रत्व मिळाले. विज्ञानात वापरल्या जाणाऱ्या विगमन युक्तिवादाला ब्रिटीश तत्त्वज्ञ, डेव्हिड ह्यूम, यांचा विनातात्त्विक आधाराचा युक्तिवाद म्हणून आक्षेप होता. या संदर्भातील प्राईस यांच्या योगदानामुळे विगमन युक्तीवादाला तार्किक आधार असल्याचे स्पष्ट झाले. यासाठी त्यांनी व्युत्क्रम संभाव्यता (inverse probability) ही संकल्पना वापरली. आपले विचार त्यांनी १७६४च्या A Method of Calculating the Exact Probability of All Conclusions Founded on Induction शीर्षकाच्या पुरवणीतून मांडले होते.

ह्यूम यांनी १७४८ मध्ये चमत्कार (miracle) निसर्गनियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. त्यांच्या मते, आपले भौतिक-ज्ञान निरीक्षणांवर अवलंबून असल्याने चमत्कारासाठी पुरावा कुठून मिळणार? वीस वर्षांनंतर प्राईस यांनी आपल्या १७६८ च्या ‘On the Nature of Historical Evidence and Miracles’ या प्रकाशित प्रबंधातून ह्यूम यांना बेज-प्राईस शोधनिबंधाच्या आधारे उत्तर दिले. अनेक वर्षे सूर्य नित्यनेमाने उगवत राहिला असला तरी, पुढील खेपेस सूर्य न उगविणे (चमत्कार नसून) संभाव्यता लक्षांत घेता शक्य असल्याचे, प्राईस यांनी दाखवले.

घरीच उभारलेल्या प्रयोगशाळेत प्राईस प्रयोग करत. त्यांनी गणित, खगोलशास्त्र आणि विद्युतशास्त्रावरही लेखन केले. त्यांच्या नावावरील प्रकाशित लेखनकृतींची संख्या ४२ असून, त्यांत पुस्तके, शोधनिबंध, टांचणे आणि पुस्तिकांचा समावेश आहे. अठराव्या शतकांतील उपलब्ध विदा वापरून प्राईस यांनी उत्तरजीवित्वाच्या संभाव्यतेची, चक्रवाढ व्याजाची, मृत्युदराची कोष्टके तयार केली. त्याआधारे त्यांनी व्यावसायिकांनाही फायदेशीर ठरतील अशा निवृत्तीवेतन आणि विमा योजना तयार केल्या.

प्राईस १७६८ पासून सलग पंधरा वर्षे सोसायटी फॉर इक्विटेबल ॲश्युरन्स ऑन लाईव्हज ॲण्ड सरव्हायव्हरशिप (आजची इक्विटेबल लाईफ ॲश्युरन्स सोसायटी) यांच्या जमाखर्चाचे सल्लागार होते. त्यांच्या सूचनांची कार्यवाही केल्यामुळे सोसायटी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली.

प्राईस यांनी विम्यासंदर्भात १७७१ मध्ये Observations on Reversionary Payments, on Schemes for providing Annuities for Widows and Persons of Old Age; on the Method of Calculating the Values of Assurances on Lives; and on the National Debt  ही सर्वोत्कृष्ट लेखनकृती निर्माण केली. विम्यासंदर्भांतील सर्व बाबींचे तर्कनिष्ठ, सटीक आणि सर्वसमावेशक लिखाण यात होते. याच्या पुढील ४० वर्षांत सात आवृत्या निघाल्या आणि शतकभर तरी निवृत्तीवेतन, विमा आणि कर्ज यांवरील ते एक प्रमाण पुस्तक होते.

सन १७७२ मध्ये प्राईस यांनी An Appeal to the Public on the Subject of the National Debt हे दुसरे पुस्तक प्रकाशित केले. प्राईस यांच्या सदर पुस्तकांमुळे इंग्लंडला राष्ट्रीय कर्जातून मुक्त करण्यासाठी विलियम पिट्ट यांना पूर्वी टीकापात्र ठरलेला कर्जनिवारण निधी (sinking fund) पुनर्स्थापित करता आला.

नॉर्थहॅम्पटन शहरासाठी केलेली प्राईस यांची आयुर्मान कोष्टके Observations on Reversionary Payments या पुस्तकातून १७७२ मध्ये प्रथम प्रकाशित झाली. याच्या चौथ्या आवृत्तीत दिलेले स्विडीश विदेचे विश्लेषण प्राईस यांच्या सांख्यिकी पद्धतींची ताकद दाखविणारे होते. कोष्टकांतून प्रत्येक वयाच्या व्यक्तीच्या सरासरी उत्तरजीवित्वाची संभाव्यता मिळे. निवृत्तीवेतन आणि विमा यांच्या इतिहासातील अपूर्व योगदानाच्या स्मरणार्थ १९७४ मध्ये प्राईस यांचे नांव प्रतिष्ठीत इन्शुरन्स हॉल ऑफ फेममध्ये दाखल करण्यात आले.

प्राईस यांनी विलियम मॉर्गन यांच्या विम्यासंबंधीच्या १७७९ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या Essay on the Population of England and Wales या पुरवणीतून नोंदींचा पद्धतशीर साठा प्रस्थापित करण्यासंदर्भातील अनुभव मांडले. विदेच्या विश्लेषणाधारे प्राईस यांनी लंडन आणि वेल्समधील लोकसंख्या खालावली असल्याचे विधान केल्यावर जनतेत संताप उसळला. लोकमताने मूळ विदाच निकृष्ट आणि चुकीची ठरवली. तीव्र वाद झडून शेवटी लोकमत, नोंदी शिस्तबद्ध आणि परिपूर्ण करण्याकडे वळले. परिणामी नोंदींसंदर्भातील समस्या सोडविण्यास लंडनमध्ये १८०१ च्या पहिल्या जनगणनेतून सुरुवात झाली.

प्राईस यांनी १७७६ मध्ये Observations on the nature of Civil Liberty, the Principles of Government, and the Justice and Policy of the War with America हे पुस्तक प्रकाशित केले. या असामान्य कार्यासाठी त्यांना फ्रिडम ऑफ सिटी ऑफ लंडन हा जीवन-गौरव पुरस्कार बहाल झाला. १७८१ मध्ये अमेरिकेतील येल महाविद्यालयाने प्राईस यांना डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी दिली.

मृत्युपूर्वी, १७९१ मध्ये स्वतः स्थापन केलेल्या युनिटेरियन सोसायटीचे (Unitarian Society) प्राईस संस्थापक सदस्य बनले.

द रिचर्ड प्राईस सोसायटी स्थापन करून वेल्सने २०१४ मध्ये त्यांना मानवंदना दिली. पॉल फ्रेम या चरित्रकाराने लिहिलेले त्यांचे Liberty’s Apostle: Richard Price, His Life and Time हे चरित्र २०१५मध्ये प्रकाशित झाले.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर