खंडीय सीमाक्षेत्राचा हा संक्रमणाचा (स्थित्यंतराचा) भाग आहे. खंडीय उंचवट्याचा उतार सामान्यपणे ०.५° ते १° इतका कमी असून पृष्ठभाग सर्वसाधारणपणे सपाट असतो. खंडीय अवसाद (गाळ) साचून हा उंचवटा तयार होतो. तो खंडान्त उतार व अगाधीय सागरी मैदान यांच्या दरम्यान असतो. म्हणजे खंड-फळीचा तळ ते मैदान असा याचा व्याप असतो. हा भूविशेष म्हणजे खंड आणि महासागराचा सर्वाधिक खोलीचा भाग यांदरम्यानच्या सीमारेषेचा अंतिम टप्पा होय. महासागर आणि भूशात्रीय इतिहासाबाद्दलची अधिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने अनेक महासागरवैज्ञानिकांनी महासागराचा सखोल अभ्यास केला आहे. ब्रूस हेझेन आणि मॉरीस यूइंग यांनी इ. स. १९२९ च्या ग्रँड बँक भूकंपाविषयीच्या अभ्यासात पहिल्यांदा ‘खंडीय उंचवटा’ ही संज्ञा वापरली.

काही ठिकाणी खंडीय उताराच्या तळाजवळील खंडीय उंचवट्याच्या भागात फार मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन होऊन त्यापासून निर्माण झालेली टेकडी तेथे आढळते. काही सागरी कॅन्यनच्या मुखाशी अवसादाचे संचयन होऊन त्याला पंखाकार प्राप्त झालेला असतो. या सागरांतर्गत पंखाकृती भूमिस्वरूपाचा विस्तार खंडीय उतारावर आणि खंडीय उंचवट्यावर झालेला दिसतो. खंडीय उंचवट्याच्या पुढील सागरतळावर अतिशय खोल व सपाट गभीर सागरी मैदान आढळते. भूसांरचनिक पट्ट्यांच्या सीमारेषांवर आढळणाऱ्या अवाढव्य पर्वतमालांमुळे गभीर सागरी मैदानाची सपाटी खंडित झालेली दिसते. खंडीय उंचवट्यावरील अवसादामध्ये प्रामुख्याने वाळू आणि प्रवाळ किंवा खडकांचा समावेश असतो. अनेक ठिकाणी अधूनमधून आढळणाऱ्या स्थानिक भूमिस्वरूपांमुळे खंडीय उंचवट्याचा सामान्य उतार खंडित होतो. त्यामुळे खंडीय उंचवट्याची वरची किंवा खालची मर्यादा स्पष्टपणे दाखविता येत नाही. खंडीय उंचवट्याच्या भागातील पर्यावरण असाधारण स्वरूपाचे असते. तसेच तेथे वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी आढळते.

समीक्षक : वसंत चौधरी