महासागराच्या अनेक द्रोणी (Basin) यांमधील सर्वांत खोल भागातील सपाट व जवळजवळ समतल क्षेत्राला अगाधीय सागरी मैदान म्हणतात. ही मैदाने सामान्यपणे ३,००० ते ६,००० मी. खोलीच्या समुद्रतळावर आढळतात. असे मैदान सामान्यपणे खंडाशेजारी असतात. मध्य महासागरी रांगेपासून या मैदानापर्यंतचा समुद्रतळाचा उतार मंद असतो. या जवळजवळ क्षितिजसमांतर समुद्रतळाची खोली दर १ किमी. अंतरात १० ते १०० सेंमी. इतकी बदलते. या मैदानाची बाह्यरेखा अनियमित असून खंडाच्या सीमेलगत ती विस्तारलेली असते. अधिक मोठी मैदाने शेकडो किमी. रूंद आणि हजारो किमी. लांब असतात. उत्तर अटलांटिकमधील एकट्या सोहम मैदानाचे क्षेत्रफळ सु. ९,००,००० चौ. किमी. आहे. अशी मोठी मैदाने सामान्यपणे अटलांटिक महासागरात आढळतात व ती पृथ्वीवरील सर्वांत मोठी सपाट क्षेत्रे आहेत. हिंदी महासागरात कमी प्रमाणात, तर पॅसिफिक महासागरात याहून कमी प्रमाणात ही आढळतात. पॅसिफिकमध्ये सीमावर्ती समुद्राचे लहान सपाट प्रदेश अथवा महासागरी खंदकांतील अरुंद, लांबट तळ या रूपांत ही मैदाने आढळतात.

प्रत्यक्ष जमिनीवरून वाहत आलेला गाळ आणि सागरी जीव हे खोल सागरातील गाळाचे (अवसादाचे) मुख्य स्रोत आहेत. जमिनीवरील धूळ व गाळ हे नद्या व वारा यांद्वारे महासागरात नेली जाते. शिवाय ज्वालामुखी उद्रेकांतील राख महासागरावर मोठ्या प्रमाणात पसरली जाते. सागरी जैव गाळात मुख्यत: जीवांची अगदी लहान कवचे व मृत प्लवक जीवांचे सूक्ष्म अवशेष असतात. असे जैव द्रव्य गाळाचा मुख्य घटक असल्यास त्याला सिंधुजैव पंक (Marsh) किंवा ऊझ म्हणतात.

अगाधीय खळग्यांत किंवा गर्तिकांमध्ये जमिनीवरून आलेला गाळ साचत असतो. या गाळाचे वरील पृष्ठभाग म्हणजे ही मैदाने होत. अशा प्रकारे आधीचे खडबडीत वा टेकड्या असलेले भूमिस्वरूप सपाट होते. या मैदानांचे भूकंपीय पद्धतीने निरीक्षण केल्यावर उपलब्ध झालेल्या त्यांच्या काटच्छेदांवरून किंवा पार्श्वदृश्य (Profile) यांवरून खडबडीत पृष्ठावर साचलेल्या गाळाची सरासरी जाडी १ किमी. असल्याचे दिसते. पूर्वीचा चढउतार वा उठाव गाळाखाली पूर्णपणे गाडलेला नसल्यास अशा काही मैदानांत सुट्या ज्वालामुखी टेकड्या किंवा टेकड्यांचे गट वर आलेले आढळतात. खंडाच्या सीमेवरून आलेला गाळ सतत तीव्र खंडान्त उतारावर साचत असतो. भरड द्रव्य सागरात खाली जाऊन गाळाचा दाट राळा बनतो. त्याला पंकप्रवाह म्हणतात. पंकप्रवाह गुरुत्वाकर्षणमुळे खंडान्त उतारावरून खाली वाहत जातात. यापैकी काही गाळ सुटा होऊन खंडान्त उताराच्या पायथ्याच्या तळावर साचतो व कमी उतार असलेले खंडीय उंचवटे तयार होतात; पण काही भरड द्रव्य अगाधीय खळग्यांपर्यंत खाली जाते. गाळवटीचे, वाळूचे व रेतीचे (जाड रेवेचे) क्षितिजसमांतर थर तयार होतात. ते काही मिमी. ते अनेक मी. जाड असून या अगाधीय मैदानातील एकूण गाळाचा २% ते ९०% गाळ या थरांमध्ये असतो. असे अनेक थर उथळ पाण्यातील जीवांचे (उदा., फोरेमिनिफेरांसारख्या सूक्ष्म आदिजीवांचे) असतात. एखादा सुटा थर तळापासून माथ्यापर्यंत अधिकाधिक सूक्ष्म कणांचा बनलेला आढळू शकतो. कणांच्या अशा प्रतवारीमुळे हे निक्षेपण एका पंकप्रवाहाद्वारे झाल्याचे सूचित होते.

भरड गाळाच्या थरांमध्ये सूक्ष्मकणी मृत्तिका व या मैदानाच्या वरच्या भागातील पाण्यात राहणाऱ्या जीवांचे सूक्ष्म अवशेष यांचे समांग थर आढळतात. पंकप्रवाहांच्या आविष्कारांदरम्यान हे सूक्ष्मकणी गाळ कणाकणाने पाण्याच्या स्तंभामधून खाली जातात आणि अतिशय संथगतीने म्हणजे १,००० वर्षांत १ मिमी. ते अनेक सेंमी. या गतीने साचतात, असे मानले जाते. खोल सागरातील मृत्तिका निक्षेप मंदपणे वाहणाऱ्या अभिसारित मालिन्ययुक्त तळाच्या पाण्यातून अगाधीय मैदानात एकसारखे येत असतात. असे गढूळ पाणी संक्षुब्ध (खवळलेल्या), उथळ किनाऱ्यालगतच्या क्षेत्रांत निर्माण होते, असेही एक मत मांडले जाते.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा